हिंदु राष्ट्र स्थापनेमध्ये अधिवक्त्यांचा मोठा सहभाग असेल ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर
प्रयागराज (उत्तरप्रदेश) : अधिवक्ता हा समाजातील प्रबुद्ध वर्ग आहे. एखाद्या समस्येचे निराकरण करण्याची क्षमता समाजातील सामान्य व्यक्तीपेक्षा अधिवक्त्यात अधिक असते. कारण अधिवक्त्यांना केवळ समस्येचेच नाही, तर राज्यघटनेचेही ज्ञान असते. यामुळे ते प्रभावी लढा देऊ शकतात आणि यश प्राप्त करू शकतात. हिंदु विधीज्ञ परिषदेने माहिती अधिकाराचा वापर करून समाजातील दुष्प्रवृत्तींच्या विरुद्ध लढा दिला आहे. आपणही सामाजिक आणि लोकशाही यांतील दुष्प्रवृत्तींच्या विरोधात अधिवक्ता या नात्याने वैधानिक मार्गाने संघर्ष करू शकता. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील हा तुमचा मोठा सहभाग असेल, असे मार्गदर्शन हिंदु विधीज्ञ परिषदेचे संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी येथे केले. ते अधिवक्त्यांच्या कार्यशाळेत बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस हेही उपस्थित होते. या वेळी हलाल अर्थव्यवस्थेच्या संकटाविषयी अधिवक्त्यांमध्ये जागृती करण्यात आली.
१. श्री. चेतन राजहंस म्हणाले की, स्वातंत्र्याच्या आंदोलनात अधिवक्त्यांचे पुष्कळ मोठे योगदान होते. तसेच योगदान हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आजही हवे आहे त्यासाठी अधिवक्त्यांनी कृतीशील होणे महत्त्वाचे आहे.
२. पू. नीलेश सिंगबाळ यांनी उपस्थितांना साधनेविषयी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात ईश्वरी अधिष्ठानाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण ही एक चळवळ आहे आणि या चळवळीला ईश्वरी अधिष्ठान असेल, तरच यश मिळते. अपयश आल्यास आपण खचून न जाता आत्मचिंतन करून पुन्हा लढण्यास सिद्ध होतो. वर्तमान काळ धर्मसंस्थापनेचा आहे आणि यामुळे श्रीकृष्णाचे तत्त्व वातावरणात अधिक प्रमाणात कार्यरत आहे. यामुळे धर्मकार्य करत असतांना ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय।’ हा श्रीकृष्णाचा जप करावा’’, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
क्षणचित्रे
१. हलाल अर्थव्यवस्थेविषयी स्तब्ध करणारी नवीन माहिती मिळाली, असे उपस्थित अधिवक्त्यांनी सांगितले.
२. कार्यशाळेतील मार्गदर्शन ऐकून उपस्थित अधिवक्त्यांनी मासिक बैठक घेण्याची मागणी केली.