विश्वस्तांच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर – श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभार्यात केवळ सोवळे नेसलेल्या पुरुषांनाच प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त अधिवक्ता श्रीकांत गायधनी यांनी दिली.
१. मुंबई उच्च न्यायालयाने १ एप्रिलला राज्यशासनाला धार्मिक स्थळी कोणताही भेदभाव करता येणार नाही, असे निर्देश दिले होते.
२. या पार्श्वभूमीवर श्री त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाच्या विश्वस्तांची ३ एप्रिल या दिवशी बैठक झाली. यात विश्वस्तांनी मंदिराच्या गर्भगृहात महिलांसह पुरुषांच्या प्रवेशावरही बंदी आणली होती.
३. या निर्णयाच्या विरोधात त्र्यंबकेश्वर येथील ग्रामस्थ आणि पुरोहित महासंघ यांनी ४ एप्रिल या दिवशी मोर्चा काढून तीव्र विरोध दर्शवला होता.
४. हा निर्णय विश्वस्तांनी १० एप्रिल या दिवशी झालेल्या त्यांच्या बैठकीत पालटला. या बैठकीत गर्भगृहात पूर्वीप्रमाणेच केवळ सोवळे नेसलेल्या पुरुषांना प्रवेश दिला जाणार असून महिलांना गर्भगृहात प्रवेश देण्यात येणार नाही, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.
५. मंदिराच्या गाभार्यामध्ये प्रवेश देण्याविषयीची मार्गदर्शक सूचना मागवण्याविषयी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात येणार असल्याचेही गायधनी यांनी स्पष्ट केले.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात