शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांची पत्राद्वारे, तर हिंदु जनजागृती समितीची निवेदनाद्वारे परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडेे मागणी
मुंबई : उन्हाळी सुट्टी, तसेच लग्नसराई यांच्या निमित्ताने चालू होणार्या प्रवासी हंगामात खासगी वाहतूकदारांकडून प्रचंड भाडेवाढ करून प्रवाशांची लूटमार केली जाते. ही लूटमार रोखण्यासाठी शासनाच्या निर्णयात सुधारणा करून त्याची प्रवासी हंगाम चालू होण्यापूर्वी परिणामकारक आणि कठोर कार्यवाही करावी, अशी मागणी परिवहनमंत्री श्री. अनिल परब यांच्याकडे १४ मार्च या दिवशी महाड (जिल्हा रायगड) येथील शिवसेनेचे आमदार श्री. भरतशेठ गोगावले यांनी पत्राद्वारे, तर हिंदु जनजागृती समितीने निवेदनाद्वारे केली आहे. या संदर्भात समितीने आमदार श्री. गोगावले यांना निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले होते. त्याची तत्परतेने नोंद घेत आमदार श्री. गोगावले यांनी स्वतः मंत्री अनिल परब आणि परिवहन विभागाचे प्रधान सचिव यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पत्र आणि निवेदन यांमध्ये म्हटले आहे की,
१. शाळांना सुट्टी लागल्यावर, श्री गणेश चतुर्थी, दिवाळी आदी सण-उत्सव यांच्या काळात गावी, परगावी, पर्यटन, तीर्थयात्रा यांसाठी जाणार्यांची संख्या लक्षणीय असते. या काळात शासकीय बसव्यवस्था पुरेशी नसल्याने, तसेच काहींना ती सोयीची वाटत नसल्याने बहुतांश लोक खासगी आरामदायी बसगाडीमधून प्रवास करतात; मात्र या खासगी वाहतूकदारांकडून दुप्पट, तिप्पट, चौपट शुल्क आकारणी करून प्रवाशांची लूटमार केली जाते.
२. हे प्रकार रोखण्यासाठी शासनाच्या २७ एप्रिल २०१८ च्या निर्णयानुसार शासकीय प्रवासभाड्यापेक्षा अधिकाधिक दीडपट भाडेवाढ करण्याची खासगी वाहतूकदारांना मुभा आहे; मात्र खासगी वाहतूकदार हा नियम धाब्यावर बसवून आजही मनमानी पद्धतीने प्रवाशांकडून पैसे वसूल करत आहेत.
३. शासनाच्या निर्णयात शुल्क ठरवण्याविषयी जी आकडेवारी दिली आहे, त्याचा अभ्यास करून आपल्या प्रवासाच्या क्षेत्राचे शुल्क काढणे, हे जनतेसाठी पुष्कळ कठीण आहे. ते जनतेच्या लक्षात येत नाही.
४. त्यापेक्षा खासगी बस वाहतूक कार्यालयात वा संकेतस्थळावर वा प्रवासी ‘अॅप’वर प्रवासाचे भाडे शासकीय शुल्काच्या दीडपटपेक्षा अधिक आहे कि नाही, हे सहज कळायला हवे. यासाठी प्रत्येक खासगी प्रवासी वाहतूकदाराने त्या त्या मार्गावरील शासकीय परिवहन सेवेचे दरपत्रक आणि खासगी दरपत्रक दर्शनी भागात, संकेतस्थळावर, ‘अॅप’वर, तसेच खासगी बसतिकिटाच्या पुढील वा मागील बाजूस प्रसिद्ध करणे कायद्याने बंधनकारक करावे.
५. परिवहन विभागानेही सर्व मार्गांवरील शासकीय बससेवेचे शुल्क आणि खासगी प्रवासी वाहतुकीचे दरपत्रक स्वतःच्या संकेतस्थळावर आणि परिवहन विभागाच्या ‘अॅप’वर प्रसिद्ध करावे.
६. कोणत्याही प्रवाशाला शासनाकडे ऑनलाईन वा ‘अॅप’च्या माध्यमातून तक्रार करण्याची सोपी आणि परिणामकारक सोय उपलब्ध करून देण्यात यावी. ही कार्यवाही हंगाम चालू होण्यापूर्वी करावी.