संस्कृतचे महत्त्व विदेशींना कळते; मात्र भारतात काँग्रेससारख्या हिंदुद्वेषी पक्षांकडून तिला ‘मृत भाषा’ संबोधून तिची हेटाळणी केली जाते. हे लक्षात घेऊन संस्कृतचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आता केंद्र सरकारने पावले उचलणे आवश्यक !
नवी देहली : अमेरिकेच्या ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेकडून ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’साठी ( सामान्यत: दृश्यज्ञान, निर्णय घेणे किंवा भाषांतर करणे यांसारख्या गोष्टींसाठी मानवी बुद्धीची आवश्यकता असते. याच सर्व गोष्टी करण्यासाठी संगणकीय प्रणालींचा विकास करणे याला ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ किंवा कृत्रिम बुद्धीमत्ता असेही म्हणतात.) संस्कृत भाषा अनिवार्य करण्यात आली आहे, असे भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी राज्यसभेत सांगितले. डॉ. स्वामी यांनी ‘संस्कृत भाषेचे महत्त्व’ याविषयीचे सूत्र राज्यसभेत उपस्थित केले होते.
या वेळी देवभाषा संस्कृतच्या सूत्रावर बरीच चर्चा झाली. डॉ. स्वामी यांनी संस्कृत भाषेची शब्दावली, लिपी, उच्चार, व्याकरण आणि उपयुक्तता यांविषयी संसदेत सूत्रे मांडली आणि त्यावर चर्चा घडवून आणली. या सूत्रावर द्रमुकच्या खासदारांनी डॉ. स्वामी यांच्यावर टीका केली. (संस्कृतद्रोही द्रमुक ! तमिळी अस्मितेच्या नावाखाली आणि ब्राह्मणद्वेषापायी तमिळनाडूतील द्रमुकसारख्या अनेक पक्षांनी संस्कृतला झिडकारले. अशा संस्कृतद्वेष्ट्यांना आता हिंदूंनीच वैध मार्गाने जाब विचारणे आवश्यक ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
१. डॉ. स्वामी यांनी ‘नासा’शी संबंधित एक शास्त्रज्ञ ब्रिग्स यांच्या संशोधन प्रबंधांचा संदर्भ दिला. ‘नासा’ने ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’साठी संस्कृत भाषा अनिवार्य केल्याचे या कागदपत्रांच्या आधारे स्पष्ट होते, असा दावा डॉ. स्वामी यांनी या वेळी केला.
२. या व्यतिरिक्त लंडनच्या सेंट जाईम स्कूलमध्ये ६ ते ११ वर्षांच्या मुलांसाठी संस्कृत भाषा शिकणे अनिवार्य करण्यात आले आहे. ‘संस्कृत श्लोकांचे पठण केल्याने मुलांचा बौद्धिक विकास होतो’, असे तेथील प्राचार्यांचे मत आहे, असे डॉ. स्वामी यांनी सांगितले.
३. डॉ. स्वामी यांनी राज्यघटनेचा संदर्भ देतांना सांगितले की, देवनागरी लिपीसह हिंदी ही भारताची ‘राजभाषा’ झाली पाहिजे. देवनागरी ही संस्कृतची लिपी आहे. देवनागरी लिपीचा हिंदीच्या व्यतिरिक्त मराठी, कोकणी आणि नेपाळी भाषांसाठीही वापर केला जातो.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात