चर्च बंद ठेवण्याचा निर्णय
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व प्रमुख देवस्थानांना स्वत:हून दर्शन, प्रार्थना आणि धार्मिक कार्यक्रम रहित करावेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. शासनाच्या निर्देशाला धाब्यावर बसून मरीन लाईन्स येथील एका चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना घेण्यात येत होती. याविषयी मुंबई उच्च न्यायालयाने असंतोष व्यक्त केला आहे. यानंतर चर्चमधील आर्च बिशप यांनी ४ एप्रिलपर्यंत हे चर्च बंद ठेवण्याची ग्वाही दिली.
अधिवक्ता सेविना क्रेस्टो यांनी पत्राद्वारे न्यायालयाला याविषयी माहिती दिली होती. तसेच चर्चमधील गर्दीची छायाचित्रेही पाठवली होती. २० मार्च या दिवशी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपिठाच्या समोर या प्रकरणाची सुनावणी झाली. १९ मार्च या दिवशी निश्चिती करण्यासाठी पोलीस चर्चमध्ये गेले असतांना तेथे सामूहिक प्रार्थना चालू असल्याचे आढळून आले. या वेळी पोलिसांनी आर्च बिशप यांना दूरभाष केल्यावर सामूहिक प्रार्थना बंद करण्यात आली.
मुख्य शासकीय अधिवक्ता प्रियभूषण काकडे यांनी याविषयीची माहिती न्यायालयाला दिली. चर्चकडून चर्च बंद ठेवण्याची ग्वाही दिल्यानंतर अशा प्रकारे अन्य कुठे सामूहिक प्रार्थना चालू असल्यास न्यायालयाने पोलिसांना न्यायालयात माहिती देण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ एप्रिल या दिवशी होणार आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात