Menu Close

पंतप्रधानांच्या आवाहनाला संपूर्ण भारतातील जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद !

पाचचा ठोका झाला अन् सर्वत्र कृतज्ञतारूपी नाद निनादला !

कोरोनाचे गहन संकट देशासमोर असतांना त्याचा सामना करण्यासाठी वैद्यकीय विभाग, पोलीस, तसेच अन्य अत्यावश्यक सेवा पुरवणारे घटक अहोरात्र कार्यरत आहेत. आपत्कालीन स्थितीतही सेवारत असणार्‍या या घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी २२ मार्चला सायंकाळी ५ वाजता दरवाजा, गच्ची अथवा आगाशी येथे उभे राहून टाळ्या वाजवून अथवा घंटानाद किंवा अन्य कोणताही नाद करून कृतज्ञता व्यक्त करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले होते. त्याला अनुसरून महाराष्ट्रात सर्वत्र सायंकाळी ५ वाजता ५ मिनिटांसाठी विविध नाद करण्यात आला. कुणी मंदिरांमधून घंटानाद केला, तर काहींनी आगाशीत उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला. काही जणांनी गच्चीवर जाऊन ताटल्या आणि चमचे वाजवले, तर काही ठिकाणी ढोल वाजवण्यात आला. नाद कोणताही असला, तरी त्या माध्यमातून आपत्कालीन सेवा पुरवणार्‍या घटकांप्रती सर्वांच्याच तोंडवळ्यावर कृतज्ञताच दिसून येत होती. या ५ ते १० मिनिटांच्या कालावधीत एकप्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याचे अनुभवायला मिळाले. देशव्यापी करण्यात आलेल्या या ५ मिनिटांच्या एकत्रित कृतीतून सर्वांमध्ये संघटनाची आणि एकात्मतेची भावना दिसून आली. प्रत्येक जण कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी सिद्ध झाला होता.

पुणे – सायंकाळी ५ वाजता सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी विविध सात्त्विक नादांद्वारे कृतज्ञतापुष्पे अर्पण केली.

यवतमाळ – सायंकाळी ५ वाजता नागरिकांनी टाळ्या वाजवणे, थाळी वाजवणे, शंखनाद, टाळ-मृदुंग यांच्या ध्वनीने अभिवादन केले.

सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली येथे शंखनाद, घंटानाद, बासरीवादन करून, तसेच टाळ्या वाजवून नागरिकांचा पाठिंबा

सोलापूर – कोरोनाच्या संकटात अत्यावश्यक सेवांमधील सर्व कर्मचार्‍यांना सायंकाळी ५ वाजता घराच्या खिडकीमध्ये थांबून, गच्चीवर उभे राहून लोकांनी टाळ्या, थाळी आणि घंटा वाजवून प्रोत्साहन देत आभार मानले. येथील बसस्थानकाजवळ असलेल्या नाकोडा इमारतीमध्ये काही महिलांनी बासरीवादनही केले, तर काहींनी शंखवादन केले.

कोल्हापूर/सांगली – येथे शंखनाद, घंटानाद, थाळीनाद करून, तसेच टाळ्या वाजवून नागरिकांनी पाठिंबा दिला. कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिरात घंटानाद करण्यात आला. विविध ठिकाणी लोकांनी पोलिसांना पाहून टाळ्या वाजवून त्यांना पाठिंबा दिला. काही ठिकाणी तरुणांनी ‘जय भवानी-जय शिवाजी’च्या घोषणा दिल्यामुळे वातावरणात उत्साह जाणवत होता.

राज्यात विविध ठिकाणी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने सात्त्विक नाद !

कोरोना विषाणूच्या संकटात अहोरात्र सेवा देत असलेले डॉक्टर आणि कर्मचारी यांना अभिवादन

दादर येथे अभिवादन करतांना सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

मुंबई : राज्यात विविध ठिकाणी सात्त्विक घंटानाद आणि शंखनाद करून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने शासकीय आणि वैद्यकीय कर्मचारी यांना अभिवादन करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून प्रयत्न करणारे शासकीय आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्या प्रती सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी अभिवादन करून कृतज्ञता व्यक्त केली. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हा नाद करण्यात आला.

मुंबई, ठाणे, रायगड येथे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने सात्त्विक नाद

२२ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता दादर येथे घंटानाद आणि शंखनाद करण्यात आला. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते श्री. अरविंद पानसरे, मुंबई समन्वयक श्री. बळवंत पाठक, सनातन संस्थेच्या सौ. शर्मिला बांगर यांसह सनातन संस्थेचे साधक आणि समितीचे कार्यकर्ते यांसह ९ जण सहभागी झाले होते. या वेळी आजूबाजूच्या सर्व इमारतींमधील नागरिकांनीही टाळ्या वाजवून स्वत:चे कर्तव्य बजावले.

मुंबई येथे भांडुप, वडाळा, शीव, परळ, शिवडी आदी २५ ठिकाणी अभिवादन करण्यात आले. ठाणे येथे बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, वर्तकनगर, उल्हासनगर, कोलशेत अशा १५ ठिकाणी अभिवादन करण्यात आले. तसेच रायगड येथे सनातन संकुल (देवद), उरण, अलिबाग, कळंबोली आदी १२ ठिकाणी अशा प्रकारे अभिवादन करण्यात आले.

सोलापूरसह अकलूज, पंढरपूर, सांगोला, बारामती, धाराशिव, परळी, बीड, लातूर, अंबाजोगाई येथील साधक आणि कार्यकर्ते यांनीही अशाच प्रकारे अभिवादन केले.

सोलापूर येथील सनातनच्या सेवाकेंद्राच्या इमारतीच्या दारात सनातनच्या साधकांनी केले अभिवादन

सोलापूर – येथील सनातनच्या सेवाकेंद्राच्या इमारतीच्या खाली हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने सात्त्विक वाद्य संगीत वाजवण्यात आले. हे संगीत ऐकून इमारतीतील नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत टाळ्या वाजवल्या आणि पुन्हा तो ‘ऑडिओ’ लावण्यास सांगून इमारतीतील सुरक्षारक्षकासह अनेक नागरिकांनी हात जोडून अभिवादन केले. या वेळी ‘भारतमाता की जय’, ‘वन्दे मातरम् ।’ अशा घोषणाही दिल्या. या संगीताने सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि इमारतीतील नागरिक यांनी कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी बळ प्राप्त झाल्याचा अनुभव घेतला. या वेळी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वाजवण्यात आलेले वाद्य ऐकून मंदिरात असल्याचा अनुभव आला ! – नागरिकांची प्रतिक्रिया

‘हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वाजवण्यात आलेले वाद्य संगीत ऐकून आम्हाला मंदिरात असल्यासारखे वाटले, त्यासाठी पुन्हा एकदा संगीत वाजवण्यास सांगितले’, असे इमारतीतील नागरिकांनी सांगितले.

कोल्हापूर येथील सनातनच्या सेवाकेंद्रासमोर विविध सात्त्विक नादांद्वारे पाठिंबा

कोल्हापूर – शहरातील शाहुपुरी येथील सनातनच्या सेवाकेंद्राच्या इमारतीच्या प्रवेशद्वारात हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, तसेच सनातन संस्थेचे साधक सहभागी झाले होते. या वेळी त्यांनीही विविध सात्त्विक नादांद्वारे पाठिंबा व्यक्त केला.

सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्याकडून देशभरात शंखनाद करून शासकीय आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त !

संबळ, मृदुंग, तुतारी आणि घंटा या सात्त्विक वाद्यांचाही नाद

मुंबई : पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाच्या विरोधात ‘स्वतःचा जीव धोक्यात घालून लढा देत असलेल्या आपत्कालीन यत्रंणेत सहभागी असलेल्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सायकांळी ५ वाजता नागरिकांनी स्वतःच्या घरात थांबून ‘टाळ्या वाजवणे’, ‘घंटानाद करणे’ आदी कृती करा’, असे आवाहन केले होते. या आवाहनाला गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक यांसह देशभरातील विविध राज्यांत सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनीही कृतीशील प्रतिसाद देत कृतज्ञता व्यक्त केली. सायंकाळी ५ वाजता साधक आणि कार्यकर्ते यांनी देशभरातील अनेक ठिकाणी शंखनादासह संबळ, मृदुंग, तुतारी आणि घंटा या सात्त्विक वाद्यांचा नाद केला.

रामनाथी (गोवा) आणि देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमांच्या प्रवेशद्वारावर उभे राहून साधकांनी व्यक्त केली कृतज्ञता !

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाच्या प्रवेशद्वारासमोर कृतज्ञता व्यक्त करणारे साधक

रामनाथी (गोवा) : ‘कोरोनाविरुद्धच्या लढाईत सनातन संस्था नेहमीच शासनाच्या समवेत आहे’, असे सनातनचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी घोषित केले आहे. या पार्श्‍वभूमीवर २२ मार्च या दिवशी सायंकाळी ५ वाजता रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाच्या प्रवेशद्वारावर साधकांनी उभे राहून आपत्कालीन यंत्रणेत सहभागी असलेल्यांविषयी कृतज्ञता म्हणून शंखनादासह संबळ, मृदुंग आणि घंटा या सात्त्विक वाद्यांचा नाद करण्यात आला.

सनातनच्या देवद येथील आश्रमाच्या प्रवेशद्वारावर साधकांनी शंखनाद करून आणि कृतज्ञता व्यक्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *