Menu Close

चीनमधील यूनान प्रांतात ‘हंता’ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे एकाचा मृत्यू

  • चीनपुढे ‘कोरोना’ नंतर नव्या विषाणूचे संकट
  • ३२ जणांची करण्यात आली चाचणी !

बीजिंग – चीनमधून कोरोनाचे संकट न्यून होत असतांनाच येथील यूनान प्रांतामधील एका व्यक्तीचा ‘हंता’ विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. मृत झालेली व्यक्ती बसमधून कामावरून शाडोंग प्रांतामधून परत येत असतांना तिचा मृत्यू झाला. त्यामुळे बसमधील इतर ३२ प्रवाशांचीही चाचणी करण्यात आली आहे, असे वृत्त चीनचे सरकारी वृत्तपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने दिले आहे.

‘हंता’ विषाणू म्हणजे काय ?

तज्ञांच्या मते ‘हंता’ विषाणू हा कोरोनाइतका घातक विषाणू नाही. हा विषाणू संसर्गाने पसरत नसून तो उंदीर किंवा खार यांच्या थेट संपर्कात आल्यास पसरतो. ‘सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन’ (सीडीसी) या अमेरिकन संस्थेच्या माहितीनुसार घरामध्ये उंदीर असतील, तर हंता विषाणूंचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. अगदी ठणठणीत व्यक्तीही उंदरांच्या संपर्कात आल्यास त्याला या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. उंदराच्या विष्ठेला किंवा मृत शरीराला हात लावून एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या डोळे, नाक किंवा तोंड यांना स्पर्श केल्यास त्याला हंताचा संसर्ग होण्याचा धोका असतो. ‘सीडीसी’च्या माहितीनुसार हंतामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो, इतका हा विषाणू धोकादायक आहे. हंताची लागण झालेल्यांचा मृत्यूदर ३८ टक्के इतका आहे.

हंताची लक्षणे काय ?

हंताचा संसर्ग झाल्यास व्यक्तीला ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी, पोटदुखी, उलट्या होणे अशी लक्षणे आढळतात. उपचार करण्यास उशीर झाला, तर या विषाणूमुळे फुफ्फुसांमध्ये पाणी साचून श्‍वास घेण्यास त्रास होतो.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *