संपादकीय
आज जगात कोरोना विषाणूंमुळे हाहा:कार उडाला आहे. प्रतिदिन सहस्रोंच्या संख्येने माणसे मरत आहेत, तर लाखोंना कोरोनाची बाधा होत आहे. कोरोनावर आजतागायत काही उपचार न सापडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनीही पत्रकारांना संबोधित करतांना याविषयी हतबलता दर्शवली होती. शास्त्रज्ञ आणि वैद्यकीय तज्ञ ‘या विषाणूला कशा प्रकारे आटोक्यात आणता येईल’, यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. असे असतांना दुसरीकडे ज्या चीनमधून हा विषाणू जगभर पसरला, तेथे नागरिकांसाठी काही मास बंद असलेली चित्रपटगृहे चालू झाली आहेत. ज्या वुहान शहरातून विषाणूचा प्रादुर्भाव झाला, तेथील दळणवळण बंदी (लॉकडाऊन) टप्प्याटप्प्याने उठवण्यात येत आहे आणि परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. चीनमधील परिस्थिती पूर्वपदावर आल्यामुळे कुणाला वाईट वाटण्याचे कारण नाही; मात्र यानिमित्ताने अनेक सूत्रे जगभरातील विचारवंत आणि राजकीय विश्लेषक यांना सतावत आहेत.
चीनची जीवघेणी गुप्तता
चीनच्या वुहान शहरात या विषाणूचा पुष्कळ प्रादुर्भाव झाला; मात्र त्याच्याच देशात काही किलोमीटर अंतरावरील शांघाय, बीजिंग या मोठ्या शहरांना आणि चीनच्या अन्य भागांमध्ये याचा नगण्य परिणाम झाला. याउलट सहस्रो किलोमीटर दूर असलेले युरोपातील देश, अमेरिका येथे विषाणूंचा भयावह प्रादुर्भाव झाला. अमेरिकेसारख्या खंडप्राय देशातील बर्याच शहरांमध्ये विषाणू झपाट्याने पसरला. चीनविषयी आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या होणारी महत्त्वाची टीका म्हणजे कोरोना विषाणूविषयी माहिती, कोणती काळजी घ्यावी ? त्या सूचना, चीनमध्ये होणार्या घडामोडी यांविषयी जगाला अंधारात ठेवण्यात आले. चीनमध्ये काहीतरी विपरीत घडते आहे, एवढीच जगाला कल्पना होती; मात्र ते एवढे भयंकर आहे, याची सुतराम कल्पना आली नाही. जागतिक आरोग्य संघटनेलाही या विषाणूची माहिती चीनकडून काही दिवस विलंबाने मिळाली, असे तिचे म्हणणे आहे. चीनच्या जवळ असलेले उत्तर कोरिया आणि रशिया येथे या विषाणूचा विशेष प्रादुर्भाव झाला नाही. ‘चीनच्या वुहान येथील समुद्री प्राणी आणि अन्य प्राणी यांचे मांस मिळणार्या बाजारातून या विषाणूचा उगम झाला आहे’, असे आधी सांगितले जात होते; मात्र चीनच्या वैद्यकीय अधिकार्यांनीच हा दावा खोडून काढला आहे. वुहान शहरातील प्रयोगशाळेतच या विषाणूचा पहिल्यांदा प्रादुर्भाव झाला आहे, असे काही जाणकार सांगतात.
कोरोना जैविक अस्त्र ?
अमेरिकेतील जैविक अस्त्रांचे तज्ञ डॉ. फ्रान्सिस बॉयले यांनी दिलेल्या एका स्फोटक मुलाखतीत ‘हा विषाणू म्हणजे जैविक अस्त्रांचाच एक भाग आहे’, असे सांगितले आहे. अमेरिकेच्या जैविक अस्त्रांचे धोरण आखणारे डॉ. बॉयले सांगतात की, चीनच्या वुहान येथील ‘वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी’ या प्रयोगशाळेतूनच हा विषाणू सुटला आहे. विषाणूच्या कार्य करण्याच्या प्रक्रिया नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने त्यात काही पालट करण्यात आले. तेव्हा तो अनियंत्रित झाला. नंतर त्याला नियंत्रणात आणण्यासाठी चीनला पुष्कळ खटपट करावी लागली. त्यामुळे प्रारंभी काही दिवस चीनने याविषयी जगाला कोणतीही माहिती दिली नाही. इस्रायलच्या माजी गुप्तचर अधिकार्यानेही असाच दावा केला आहे; मात्र चीनकडून इस्रायलच्या या दाव्यावर टीका करण्यात आली आहे.
चीनची क्रूर वृत्ती आणि स्वत:च्या देशातील नागरिकांचाही स्वत:च्या धोरणांसाठी बळी देण्याची सिद्धता यांमुळे ‘नक्कीच काहीतरी काळेबेरे आहे’, असे लक्षात येते. या विषाणूमुळे जगभरात अनेक देशांमध्ये दळणवळण बंदी लागू आहे. अनेकांचे व्यापार-उदीम ठप्प झाले आहेत. अत्यावश्यक सेवांच्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही दुकाने चालू नाहीत. अनेक आस्थापनांनी त्यांच्या साहित्याचे उत्पादन थांबवले आहे. परिणामी त्यांची आर्थिक हानी होत आहे. जगभरात अनेक प्रख्यात आस्थापनांच्या समभागाचे मूल्य उत्पादन थंडावल्यामुळे खाली आले आहे. नेमक्या या परिस्थितीचा (अप)लाभ चीन घेत आहे, असे म्हणण्यास वाव निर्माण झाला आहे. चीनचे व्यापारी संपूर्ण जगातील आस्थापनांचे समभाग लपूनछपून विकत घेत आहेत. चीनचे सर्वांत मोठे आस्थापन ‘अलीबाबा हाँगकाँग लिस्टिंग’ने एका आठवड्यात १.५४ टक्के आणि टेनसेंटने ०.३९ टक्के लाभ मिळवला आहे. मागच्या आठवड्यात चीनच्या शांघाय आणि शेनजेन ‘शेअर बाजारा’ने मागच्या २ वर्षांतली सर्वोत्तम कामगिरी केली. या ‘शेयर मार्केट’मध्ये ५ टक्क्यांची वाढ पहायला मिळाली, असे प्रतिष्ठित उद्योगविषयीचे नियतकालिक ‘ब्लूमबर्ग’चे स्तंभलेखक माक्सि यिंग यांनी लिहिले आहे. जगातल्या अनेक आस्थापनांचे मालकी हक्क चीनच्या हातात जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे चीनने जगाच्या अर्थव्यवस्थेवर ताबा मिळवण्यासाठी कोरोना विषाणूचा हत्यार म्हणून वापर केला का ?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चीनने कोरोनाबाधित असलेल्या स्वत:च्या देशातील प्रदेशांमध्ये जागतिक आरोग्य संघटनेला, तसेच अन्य संस्थांना शिरकावही करू दिला नाही. सत्य जगापासून लपवण्यासाठी चीनने हे पाऊल उचलले का ?, अशा शंका उपस्थित केल्या जात आहेत. इटलीनंतर विषाणूचा सर्वाधिक मोठा फटका बसलेल्या स्पेनने नुकतेच चीनकडून अब्जावधी रुपयांचे वैद्यकीय साहित्य खरेदी केले आहे. कोरोनाला सातत्याने ‘चिनी व्हायरस’ म्हणून संबोधणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र २ दिवसांपूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील संवादानंतर त्यांनी ‘चीनने विषाणूला अटकाव करण्यासाठी प्रयत्न केले आहेत’, असे सांगितले आहे. हे सर्व गोलमाल असल्यामुळे नेमके सत्य काय आहे, हे जग शोधत आहे. या जीवघेण्या विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती पहाता असत्याचा भांडाफोड व्हायलाच हवा !