सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्या पाठपुराव्याचा परिणाम !
फोंडा : शहापूर, फोंडा येथे अडकून पडलेल्या सुमारे दीडशे लोकांना संचारबंदीच्या काळात विनामूल्य अन्नपुरवठा करणार आहे. विशेेष म्हणजे सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर शासनाच्या वतीने लोकांना अन्नपुरवठ्यासंबंधी आश्वस्त करण्यात आले आहे.
शहापूर, फोंडा येथे सुमारे दीडशे लोक अडकून पडल्याचे आणि त्यांच्या अन्नपुरवठ्याची सोय नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी येणार असल्याची माहिती सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना मिळाली. एका चलचित्राद्वारे ही माहिती मिळाल्यावर त्यांनी घटनेची सत्यता पडताळली. या लोकांमध्ये लहान मुलांचाही सहभाग होता. त्यांच्याकडे अन्नधान्याचा साठा नव्हता, तसेच पैसे देऊन साहित्य खरेदी करण्याचीही त्यांची ऐपत नव्हती. त्यांना तातडीने सहकार्याची आवश्यकता होती. साधक आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते यांनी याविषयीची माहिती पोलीस यंत्रणा आणि फोंडा येथील उपजिल्हाधिकारी कार्यालय यांना दिली. माहिती मिळाल्यानंतर फोंडा येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयातून शासकीय अधिकारी प्रणव भट, शासकीय अधिकारी सेबेस्टीयन त्वरित घटनास्थळी उपस्थित झाले. शासकीय अधिकार्यांनी अन्नधान्याच्या मागणीचा आढावा घेऊन २९ मार्च या दिवशी सकाळपासून अन्नपुरवठा करणार असल्याचे संबंधित लोकांना सांगून आश्वस्त केले.