सध्या ‘कोरोना’च्या रूपात आलेले संकट हे वैश्विक संकट म्हणून भारतियांसमोर आहे. ‘दातृत्व’ हा विशेष गुण भारतियांमध्ये आहे. तो या निमित्ताने पुन्हा एकदा पहायला मिळत आहे. या सदरात पोलिसांसह विविध ठिकाणी नागरिक, संस्था आणि संघटना कसे साहाय्य करत आहेत, याचा वृत्तांत पाहूया !
कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने गरजूंना अन्नदान
नगर : कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने दळणवळण बंदीच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब, बंदोबस्ताचे कार्य करत असलेले पोलीस बांधव, रुग्णालयातील रुग्ण, त्यांचे नातेवाईक, रस्त्याच्या कडेला आसरा घेणारे निराधार, प्रवासी, तसेच पाथर्डी तालुक्यात परतणारे ऊसतोडणी कामगार यांंना अन्नदान करण्यात आले. (श्रीकान्होबा) कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या कार्यरत विश्वस्त मंडळामधील अध्यक्ष शिवशंकर राजळे, उपाध्यक्ष सुनीलराव सानप, विश्वस्त आप्पासाहेब मरकड आणि मिलिंद चवंडके यांनी देवस्थानची सामाजिक बांधिलकी या सद्भावनेतून हे कार्य पार पडले. श्री कानिफनाथ देवस्थानकडे येणारे रस्ते आणि मढी गाव येथील रस्ते यांवर देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोकराव पवार, व्यवस्थापक बाबासाहेब मरकड यांनी देवस्थानमधील कर्मचार्यांच्या सहकार्याने औषध फवारणी केली. त्यानंतर भुकेलेल्यांसाठी माध्यान्ह भोजनाचे नियोजन करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव गावात अन् परिसरात होऊ नये; म्हणून श्रीक्षेत्र मढी येथील प.पू. कानिफनाथांचे संजीवन समाधी मंदिर दैनंदिन पूजाविधीव्यतिरिक्त दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेले आहे. गुढीपाडव्याच्या पहाटे होणारा महापूजा सोहळा शासकीय आदेशान्वये रहित करण्याचाही निर्णय झाला होता. देवस्थानकडून अत्यंत प्रभावीपणे कोरोनाविषयी जनजागृतीही करण्यात येत आहे.
‘व्हाईट आर्मी’च्या सदस्यांकडून राजस्थानला जाणारे ट्रकचालक, कामगार, तसेच अन्य लोक यांसाठी पाणी आणि भोजन यांची सोय !
कोल्हापूर : सातारा येथून निघालेले काही युवक, राजस्थानला जाणारे काही ट्रकचालक, तसेच अन्य काही कामगार २९ मार्चच्या रात्री बेळगावच्या दिशेने चालत निघाले होते. सांगली फाटा, गांधीनगर, तसेच शहरातील विविध ठिकाणी ते थांबले होते. विना अन्नपाण्याचे हे सर्व असाहाय्य अवस्थेत असल्याचे ‘व्हाईट आर्मी’चे श्री. अशोक रोकडे आणि त्यांच्या सदस्यांना समजले. लगेचच अन्य काही संघटनांच्या साहाय्याने ‘व्हाईट आर्मी’च्या सदस्यांनी या सर्वांची रात्री १० वाजता पिण्याचे पाणी आणि भोजन यांची सोय केली.
या उपक्रमात गजेंद्र प्रतिष्ठानचे श्री. अरविंद देशपांडे, सर्वश्री प्रशांत शेंडे, हनुमंत कुलकर्णी, विनायक भाट, ओंकार पवार, रवी बावडेकर यांसह अन्य कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे या उपक्रमात वानप्रस्थ वृद्धाश्रम येथील महिलावर्गाने भोजन सिद्ध करण्यासाठी योगदान दिले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात