संपादकीय
तिसरे महायुद्ध पहिल्या दोन महायुद्धांच्या तुलनेत प्रचंड संहारक असणार आहे, हे आतापर्यंत अनेक द्रष्ट्यांनी सांगितले आहे. ते लवकरच होणार आहे, असेही अनेक तज्ञांनी यापूर्वी सांगितले होते. त्यामुळे जगातील अनेक देशांनी स्वतःचे सामरिक बळ वाढवण्यासाठी अब्जावधी रुपये व्यय केले आहेत. तिसरे महायुद्ध समोरासमोर होईल, अशी अनेकांची कल्पना आहे. प्रत्यक्षात मात्र तिसरे महायुद्ध चालू झाले असून कुणाची इच्छा असो वा नसो, त्यात उतरावेच लागणार आहे. आपण सारे जण आपल्याही नकळत या महायुद्धात ओढले गेलो आहोत. सध्या सार्या विश्वाला कोरोना विषाणूने जखडले आहे. हा एकच विषाणू सार्या जगाला भारी ठरला आहे. त्यामुळे हा केवळ ‘साथीचा रोग’ नक्कीच नाही, तर हे एक जैविक युद्ध असल्याचा आता जगाला संशय येऊ लागला आहे.
आजच्या घडीला कोणत्याच राष्ट्राची इतर राष्ट्रांशी समोरासमोर युद्ध करण्याची सिद्धता नाही. बहुतांश राष्ट्रांकडे संहारक शस्त्रास्त्रे असल्याने आणि युद्धतंत्रात अत्यंत प्रगत तंत्रज्ञान आल्यामुळे समोरासमोरील युद्धात शत्रूचा प्रतिकार करणे किंवा अधिकाधिक हानी करणे शत्रूराष्ट्राला शक्य आहे. त्यामुळेच अगदी अपरिहार्यतेनेही स्वतःचे सामरिक बळ कितीही वाढवले, तरी तसे युद्ध व्हावे, अशा मानसिकतेत कोणताही देश नाही. पहिल्या आणि दुसर्या महायुद्धानंतर सर्वच देशांची प्रचंड हानी झाली, हे कुणी विसरलेले नाही. असे जरी असले, तरी चीन हा काही शांत रहाणारा देश नव्हताच. त्यामुळेच ‘चीननेच कोरोना विषाणू बनवला आहे’, याविषयी अनेक माध्यमांतून चर्चा चालू आहेत. अर्थात या चर्चांना शेवट नसतो; कारण असे छुपे युद्ध पुकारणारा देश कधी प्रतिद्वंद्वीला ‘मीच तो वार केला होता’, असे सांगत नसतो. चीनचे काय म्हणणे आहे, हे तसे जाणून घेण्याचे कारणच नाही. परिस्थितीजन्य दाखले सांगत आहेत की, हे चीनने पुकारलेले जैविक युद्धच आहे. प्रत्यक्ष युद्धात अनेक सैनिक मारले जातात, युद्धसामुग्री खर्ची पडते. त्या मानाने या युद्धात चीनची अत्यल्प हानी झाली आहे.
चीनची संशयास्पद भूमिका !
जर कोरोना हे चीनचे अपत्य नाही, तर कोरोनाला जगासमोर आणणार्या आधुनिक वैद्यांना चीन सरकारने शिक्षा का केली होती ? चीनने कोरोनाविषयी जागतिक आरोग्य संघटनेला सांगितल्यानंतरही कोरोनाबाधित वुहान प्रांतातील दळणवळण अनेक आठवडे चालू होते. ‘ते तात्काळ थांबवायला हवे होते’, हेही चिनी सरकारला कळत नाही, यावर जगाने विश्वास कसा ठेवावा ? चीनच्या वुहान प्रांतात या विषाणूमुळे अनेकांचे बळी गेले. त्यापासून केवळ ८४० किलोमीटर अंतरावर असलेले शांघाय आणि १ सहस्र १५२ किलोमीटरवर असलेले बिजींग या चीनच्या महत्त्वाच्या शहरांत त्याचा प्रभाव नगण्य आहे, तर ११ सहस्र ८५९ किलोमीटर इतक्या अंतरावर असलेल्या अमेरिकेला मात्र आज कोरोनाने जेरीस आणले आहे. इटली, स्पेन आदी देशांत या विषाणूने हाहाःकार माजवला आहे. चीनची विस्तारवादी मनीषा पूर्ण होऊ न देणारा भारतही याच्या विरोधात निकराचा लढा देत आहे. अशी जगभर स्थिती असतांना या विषाणूचे मूळ स्रोत असलेला चीन आज काय करत आहे, तर या सर्व देशांना मास्क आणि सॅनिटायझर यांची निर्यात करत आहे. ‘चीन कोरोना संकटातून फार लवकर सावरला आहे’, असेच यातून दिसते. जर कोरोनाची उत्पत्ती नैसर्गिक आहे आणि ते चीनचे शस्त्र नाही, तर चीनचा व्यापार-उदिम इतक्या लवकर सावरणे, हे सामान्य नाही.
जागतिक आरोग्य संघटनेनेही कोरोनाच्या विरोधात अधिक प्रभावी लढा द्यायला हवा होता. एवढे प्रगत तंत्रज्ञान हाताशी असूनही सारे जग हादरले आहे, याचाच अर्थ कुठेतरी पाणी मुरले आहे. चीनच्या या सगळ्या सावळ्या गोंधळाकडे जागतिक आरोग्य संघटनेने थोडी डोळेझाक केली आहे का ?, याची सार्या विश्वाने नोंद घ्यायला हवी. जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. टेड्रेस अधॉनोम घेब्रेयेसस यांना त्या काळी पाठिंबा देणारा चीनच आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची पत्नी पेंग लियुआन या अनेक वर्षे जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘गुडविल प्रसारदूत’ (गुडविल अँबेसिडर) राहिलेल्या आहेत. हे सारे पहाता कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता येते.
घटनाक्रम डोळसपणे पाहिल्यास ‘चीनने जाणीवपूर्वक सार्या विश्वाशी हा खेळ केला आहे’, असे नक्कीच म्हणता येते.
हीच योग्य वेळ !
सध्या भारत सरकार सामाजिक स्तरावर अनेक उपाययोजना करत आहे. त्या सरकारने अवश्य कराव्या. नक्कीच बाहेर जेवढी अंदाधुंदी माजली आहे, तेवढी भारतात माजलेली नाही. असे असले, तरी हे संकट कुणामुळे ओढवले, त्याचाही मागोवा सरकारने नक्की घ्यावा. ज्या चीनची आसुरी मानसिकता आणि निष्काळजीपणा यांमुळे हे संकट ओढवले, त्याच्या विरोधात आता जनतेत संताप अन् असुरक्षिततेची भावना आहे. याचा लाभ घेऊन भारत सरकारने चीनकडून आयात होणार्या वस्तूंना देशांतर्गत पर्याय निर्माण करावा. गेल्या काही दिवसांत भारतीय जनतेने संघटितपणे लढा दिला आहे. योग्य प्रबोधन केले, तर जनताही स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य देईल. चीनच्या उत्पादनांची आयात पूर्णत: बंद केली, तरी देश सरकारच्या पाठीशी उभा राहील. भारत ही चीनची मोठी बाजारपेठ आहे. चीनला आर्थिक युद्धाचीच भाषा कळते. भारत सरकारने चीनशी आर्थिक पातळीवर लढा द्यायचा ठरवला, तर दोन गोष्टी होतील. चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का देता येईल आणि तेच उद्योग चालू करण्यास भारतियांना प्रोत्साहन दिल्यामुळे भारतात रोजगार निर्माण होतील. चीनला धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ आहे. सरकारने हे हेरलेही असेल. त्यावर योग्य कार्यवाही करून चीनने पुकारलेल्या या युद्धात त्याला जशास तसे उत्तर दिले, तर भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा उजळेल, हे वेगळे सांगायला नको !