मद्रास उच्च न्यायालयाकडून ६० एकर भूमीवरील अतिक्रमणाची चौकशी करण्याचा आदेश
- धर्मांधांकडून हिंदूंची मंदिरे कह्यात घेण्यात आल्याच्या शेकडो घटना या देशात घडल्या आहेत. आता कट्टरतावादी ख्रिस्त्यांकडूनही तोच प्रकार केला जात असल्याचे यातून उघड होत आहे. याविरोधात धर्मनिरपेक्षतावादी काहीच बोलणार नाहीत; कारण त्यांच्या मते हीच धर्मनिरपेक्षता आहे !
- काही वर्षांपूर्वी तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांनी शंकराचार्यांना खोट्या आरोपाखाली अटक केली होती. आज त्यांचाच अण्णाद्रमुक पक्ष राज्यात सत्तेत आहे. हा पक्ष अशा हिंदुविरोधी कारवाया रोखेल, अशी अपेक्षाच नाही ! आता हिंदूंनीच संघटित होऊन वैध मार्गाने याविरोधात लढा देणे अपेक्षित आहे !
चेन्नई (तमिळनाडू) : शहरापासून ९५ किलोमीटर अंतरावरील मेलमारूवथूरच्या पुढे असलेल्या अचिरूपक्कम् या गावात वज्रगिरी पर्वतावर अनुमाने १ सहस्र ५०० वर्षांपूर्वीचे शिवमंदिर आहे. हे मंदिर एका लहान टेकडीवर आहे. भगवान श्री पशुपथेश्वर आणि देवी श्री मरागधांबिकाई यांच्या मूर्ती असलेले हे प्राचीन मंदिर अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. या टेकडीच्या वरच्या आणि खालच्या बाजूला अनेक चर्च बांधण्यात आले आहेत. ही भूमी ख्रिस्त्यांना ९९ वर्षांच्या भाडेपट्टीवर देण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. येथील ६० एकर भूमीवर अतिक्रमण झाले असून याची चौकशी करण्याचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे.
ऐतिहासिक माहितीनुसार ‘टेकडीवर असलेले श्री पशुपथेश्वर मंदिर आणि शहरातील श्री आतचीश्वर मंदिर, ही मंदिरेही १ सहस्र ५०० वर्षांपूर्वी बांधण्यात आली आहेत. वज्रगिरी येथे तिरुवन्नमलाईप्रमाणे ‘गिरीवलम्’, म्हणजेच वज्रगिरी या पवित्र टेकडीची प्रदक्षिणा करण्याची परंपरा अजूनही अस्तित्वात आहे. या मंदिरात जाण्यासाठी काही शतकांपूर्वी २ मार्ग बनवण्यात आले आहेत. पहिला मार्ग पायर्या असलेला आणि दुसरा वाहनांसाठी उपयुक्त असा रस्ता आहे.
वर्ष १९६० पासून ख्रिस्त्यांकडून अतिक्रमण !
वर्ष १९६० पासून ख्रिस्त्यांनी वज्रगिरी टेकडीवर अतिक्रमण करण्यास प्रारंभ केला. वर्ष १९६५ मध्ये पुष्पम् अडिगलार नावाच्या ख्रिस्ती धर्मगुरूंनी टेकडीच्या पायथ्याशी ‘सुसायप्पर चर्च’ बांधले आणि टेकडीच्या माथ्यावर मदर मेरीची मूर्ती स्थापन केली. त्यानंतर वर्ष २००० मध्ये या टेकडीवर प्रचंड मोठे चर्च बांधले गेले. आता ख्रिस्त्यांनी टेकडीच्या माथ्यावर एक आणि टेकडीच्या पायथ्याशी दुसरे, असे २ चर्च बांधले आहेत. या व्यतिरिक्त त्यांनी अन्य विविध ठिकाणी अनेक ‘क्रॉस’ उभारले आहेत. या माध्यमातून त्यांचा संपूर्ण टेकडी बळकावण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. टेकडीच्या शिखरापर्यंत जातांना विविध ठिकाणी बायबलमधील प्रसंग दाखवणारी शिल्पे उभारण्यात आली आहेत. टेकडीवर तमिळ भाषेतील ‘हेल मेरी’चा ‘निऑन साइन बोर्ड’ (इलेक्ट्रिक बल्ब असलेला फलक. असे फलक फार दूरवरूनही ठळकपणे दिसतात.) टेकडीपासून काही किलोमीटर अंतरावरून दिसेल, असा ठळकपणे लावला आहे.
मंदिराकडे जाणार्या मार्गाच्या प्रारंभी चर्चकडून प्रवेशद्वाराची उभारणी !
भगवान पशुपथेश्वर मंदिराकडे वाहनाद्वारे जाणार्या मार्गाच्या प्रवेशद्वाराजवळ चर्च अधिकार्यांनी एक सुशोभित प्रवेशद्वाराची रचना केली आहे. त्यामुळे भगवान शिवाचे दर्शन घेण्यासाठी वाहनांवरून जाणार्या भाविकांना या ख्रिस्ती प्रवेशद्वाराच्या खालून जावे लागते. यासह ख्रिस्त्यांनी या मार्गावर कुंपण घातले असून परिणामी भाविकांना लांबच्या मार्गानेे जावे लागते. भाविकांना त्रास देण्यासाठी याही मार्गावर ख्रिस्ती कचरा टाकतात.
हिंदूंकडून मंदिराची डागडुजी करण्याचा प्रयत्न !
या सर्व प्रकारांमुळे अचिरूपक्कम् आणि मधुरानंथकम् या परिसरांत रहाणारे हिंदू उद्वीग्न झाले आहेत. ‘भक्कम आर्थिक साहाय्य मिळणार्या ख्रिस्त्यांच्या विरोधात आम्ही लढू शकतो का ?’, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. अशा परिस्थितीतही मंदिराकडे जाणारा मार्ग आणि मंदिराची दुरुस्ती, तसेच पुनर्बांधणी करण्यासाठी हिंदू एकत्र आले आहेत. बराच काळ मंदिराकडे जाणारा मार्ग अंधारमय होता. अलीकडेच हिंदु भाविकांनी या मार्गावर लावण्यासाठी विजेचे दिवे सिद्ध केले असून टेकडीच्या माथ्यावर ‘शिवा-शिवा’ असे लिहिलेला ‘निऑन साइन बोर्ड’ही लावला आहे. याशिवाय मंदिराकडे जाणार्या पायर्या पुन्हा बांधण्यात आल्या.
हिंदूंना कूपनलिका बांधायला वनविभागाकडून विरोध !
या भाविकांना टेकडीवर एक नवीन कूपनलिका (बोअरवेल) बांधायची होती; परंतु वनविभागाच्या अधिकार्यांनी ‘ती जागा वनविभागाची आहे’, असे सांगत कूपनलिका बांधण्याचे काम थांबवले. यावर भक्तांनी वनविभागाच्या अधिकार्यांना ‘ख्रिस्त्यांना अनुमती कशी दिली ?’ असे विचारल्यावर अधिकार्यांनी ‘ख्रिस्ती लोकांनी शासनाकडून या टेकडीवरची भूमी ९९ वर्षांच्या भाडेपट्टीवर (लीज्) घेतली आहे’, असे सांगितले.
६० एकरवर अतिक्रमण असतांना केवळ ६ एकरवर अतिक्रमण झाल्याचे दाखवले
वज्रगिरी टेकडीवर ख्रिस्त्यांच्या अतिक्रमणाच्या व्याप्तीची माहिती मिळवण्यासाठी श्री. राजा नावाच्या व्यक्तीने माहिती अधिकाराच्या कायद्यांतर्गत माहिती मागवली. त्यात ‘अतिक्रमण केवळ ६ एकर भूमीवर आहे’, अशी माहिती दिली. या प्रकरणी श्री. राजा यांनी मद्रास उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट केली. स्थानिक वनविभाग, महसूल विभाग इत्यादींच्या मते ख्रिस्त्यांनी अनुमाने ६० एकर भूमीवर अतिक्रमण करून ती कह्यात घेतल्याचे न्यायालयात उघड झाले. या प्रकरणी न्यायाधिशांनी ‘ख्रिस्त्यांनी किती भूमीवर अतिक्रमण केले आहे ?, याचे सखोल अन्वेषण करून त्याचा तपशील देण्याचा आदेश दिला.
अचिरूपक्कम् येथील हिंदु भाविकांच्या मागण्या
१. पशुपथेश्वर मंदिरात जाण्यासाठीचा प्राचीन मार्ग दुरुस्त करावा. या मार्गाच्या प्रारंभी ख्रिस्त्यांनी उभे केलेले प्रवेशद्वार काढून त्या जागेवर मंदिराकडे जाण्यासाठीचे प्रवेशद्वार बांधावे.
२. पशुपथेश्वर मंदिराची मालकी असलेली वज्रगिरी टेकडी ख्रिस्त्यांच्या तावडीतून परत घ्यावी.
३. बांधकामासाठी वज्रगिरी टेकडीवरील दगड फोडणे तातडीने थांबवावे.
४. हिंदूंना आमीष दाखवून आणि अयोग्य पद्धतींचा वापर करून हिंदूंचे धर्मांतर करण्यावर बंदी घालावी.
५. टेकडीच्या शिखरावर असलेले विजेचे दिवे आणि ‘निऑन साइन बोर्ड’ यांची तोडफोड करणार्यांवर कडक कारवाई करावी.
६. ‘ख्रिस्त्यांनी ही टेकडी ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर घेतली आहे’, अशा त्यांच्या दाव्याविषयी वनविभागाने स्पष्टीकरण द्यावे.
७. चर्चच्या आजूबाजूच्या डोंगरांवर करण्यात आलेल्या अतिक्रमणांची चौकशी करावी.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात