अमेरिकेला औषधांचा पुरवठा करण्याचा पुनरुच्चार
नवी देहली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘हायड्रोक्सीक्लोरोक्वीन’ या औषधावरून भारताला ‘जशास तसे’ उत्तर देण्याची भाषा केल्यानंतर भारतानेही अमेरिकेची ‘या विषयावरून राजकारण करू नका’, अशा शब्दांत कानउघाडणी केली. ‘भारतावर अवलंबून असलेल्या शेजारी देशांना, तसेच कोरोनामुळे सर्वाधिक त्रस्त असलेल्या अन्य देशांना हायड्रोक्सीक्लोरोक्वीन आणि पॅरासिटामोल या औषधांचा आम्ही पुरवठा करू. त्यामुळे यावरून कुठलेही अंदाज बांधू नका’, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले.
श्रीवास्तव पुढे म्हणाले, ‘‘कोरोनाचे संकट लक्षात घेता आंतरराष्ट्रीय समुदायाने मानवतेच्या दृष्टीकोनातून एकजूट दाखवून एकमेकांना सहकार्य केले पाहिजे’, ही भारताची आरंभीपासूनची भूमिका आहे. त्यानुसार देशांतर्गत आवश्यकता पूर्ण झाल्यानंतर अन्य देशांना औषधांचा पुरवठा करण्यात येईल. त्यामुळे अमेरिकेने अनावश्यक वाद निर्माण करू नयेत.’’
…म्हणून भारताने हायड्रोक्सीक्लोरोक्वीन निर्यातीवर बंदी घातली !
भारताने हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या निर्यातीवर घातलेल्या बंदीमागची भूमिका स्पष्ट करतांना श्रीवास्तव म्हणाले, ‘‘सर्वप्रथम स्वतःच्या देशातील जनतेसाठी औषधांचा पुरेसा साठा करून ठेवणे, हे कुठल्याही उत्तरदायी सरकारचे पहिले कर्तव्य आहे.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात