विज्ञानाने केलेल्या प्रगतीचा दुष्परिणाम म्हणजे पृथ्वीवर वाढलेले प्रदूषण होय ! त्यानेच मनुष्याचा आणि पृथ्वीचा विनाश होत आहे. दळणवळण बंदी झाल्याने या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. यातून तरी आता तथाकथित विज्ञानवादी मनुष्याने याचा विचार केला पाहिजे !
वॉशिंग्टन (अमेरिका) : कोरोनामुळे जगातील अनेक देशांनी दळणवळण बंदी केल्याने प्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे समोर येत आहे; मात्र सर्वाधिक प्रदूषित भागांत कोरोनाच्या संसर्गामुळे होणार्या मृत्यूंचे प्रमाण अधिक आहे, तर प्रदूषण अल्प असलेल्या भागांतील संसर्गही अल्प आहे. त्यामुळे मृत्यूही अल्प झाले आहेत, असा निष्कर्ष अमेरिकेतील हार्वर्ड विश्वविद्यालयाने केलेल्या एका संशेधनाअंती काढण्यात आला. या संशोधनामुळे आरोग्य अधिकार्यांना कोरोनाबाधित रुग्णांवर व्हेंटिलेटर्स आणि अन्य श्वसनाविषयीच्या साधनांचा वापर कशा प्रकारे करावा ?, हे ठरवण्यासही साहाय्य होणार आहे.
१. हार्वर्डचे डेटा सायन्स इनिशिएटिव्हचे संचालक फ्रान्सेस्का डॉमिनिकी म्हणाले की, प्रदीर्घ काळ प्रदूषण वाढल्यास कोरोना होण्याचा धोका वाढू शकतो. उदा. एखादी व्यक्ती १५ ते २० वर्षांहून अधिक काळ प्रदूषणाचा सामना करत असेल, तर अल्प प्रदूषित भागांत रहाणार्यांच्या तुलनेत तिच्या मृत्यूची शक्यता १५ टक्क्यांनी अधिक असेल.
२. हवेच्या गुणवत्तेची तपासणी करणार्या स्विस एअर मॉनिटरिंग प्लॅटफॉर्म आय.क्यू. एअरने दिलेल्या माहितीनुसार, युरोपातील सर्वांत प्रदूषित शहरांत २४ शहरे इटलीतील आहेत. त्यामुळेच संसर्ग वाढणे आणि मृत्यूदर वाढणे, यांमागे हवेतील प्रदूषण कारणीभूत ठरू शकते, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात