भारत अमेरिकाला हायड्रोक्सीक्लोरोक्वीन पुरवणार !
- अमेरिकेने गुजरात दंगलीवरून पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व्हिसा नाकारला होता; मात्र आज तेच मोदी अमेरिकेला साहाय्य करत आहेत, हे अमेरिकेने लक्षात ठेवावे !
- अमेरिकेने सातत्याने ज्या पाकला साहाय्य केले, त्या पाकने अमेरिकेला संकटसमयी कोणतेही साहाय्य केलेले नाही. अमेरिकाही त्याच्याकडे साहाय्याची अपेक्षा करू शकली नाही, याची जाणीव अमेरिकेला करून देणे आवश्यक !
वॉशिंग्टन (अमेरिका) : कठीण काळात मित्रांकडून अधिकाधिक साहाय्याची आवश्यकता असते. हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषध अमेरिकेला निर्यात करण्याच्या घेतलेल्या निर्णयासाठी भारत आणि भारतीय नागरिक यांचे आभार मानतो. हे उपकार आम्ही कधीही विसरू शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो; कारण त्यांचे भक्कम नेतृत्व केवळ भारतालाच साहाय्यभूत ठरत आहे असे नाही, तर त्यामुळे मानवतेच्या शत्रूविरोधात लढणेही शक्य होत आहे, अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट केले. ट्रम्प यांनी केलेल्या मागणीनुसार भारताने अमेरिकेला हायड्रोक्सीक्लोरोक्वीन पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर ट्रम्प यांनी हे आभार मानले आहेत. यापूर्वी ट्रम्प यांनी जर हे औषध दिले नाही, तर जशास तसे उत्तर दिले जाईल, अशी धमकीही दिली होती; मात्र दुसर्याच दिवशी त्यांनी मोदी महान नेते आहेत, असेही म्हटले होते.
अमेरिकेत सलग दुसर्या दिवशी २ सहस्र लोकांचा मृत्यू
अमेरिकेत कोरोनामुळे सलग दुसर्या दिवशी २ सहस्र लोकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीकडून ही माहिती देण्यात आली. अमेरिकेतील मृतांची संख्या १४ सहस्र ६९५ वर पोचली आहे. मृतांच्या संख्येत अमेरिकेने स्पेनला मागे टाकले आहे. स्पेनमध्ये १४ सहस्र ५५५, तर इटलीत १७ सहस्र ६६९ मृत्यूंची नोंद झाली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात