धार्मिक विषयांत शासन आणि न्यायालय यांचा हस्तक्षेप अमान्य !
यावरून तरी श्री शनैश्वर देवस्थान त्यांचा निर्णय पालटेल का ?
नगर : श्री शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाच्या चौथर्यावर महिलांच्या प्रवेशाची घटना, हा अधर्मच आहे. या अधर्माचे फळ ज्याचे त्याला मिळेल, असे मार्गदर्शनपर उद्गार करवीरपिठाचे जगद्गुरू शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी येथे काढले. नगरमधील एका कार्यक्रमासाठी ते आले असता त्यांनी श्री शनिशिंगणापूरच्या प्रकरणाविषयी पत्रकारांशी बोलतांना उपरोक्त मार्गदर्शन केले.
शंकराचार्य पुढे म्हणाले की, केवळ अधर्म वाढवण्यासाठी असे काही होत असेल, तर ते चुकीचे आहे. धार्मिक विषयांवर निर्णय घेण्यास धर्मपिठे असतांना शासन वा न्यायालय यांनी त्यात हस्तक्षेप करणे चुकीचे आहे. (राज्यशासनाला सणसणीत चपराक ! यावरून तरी राज्यशासन आपली भूमिका पालटून ती नव्याने उच्च न्यायालयात मांडेल का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात ). अर्थमंत्र्यांच्या धनादेशावर महसूल मंत्र्यांची स्वाक्षरी असेल, तर धनादेश वटेल का ? धर्मात हस्तक्षेप नसावा; पण राजावर धर्माचा अंकुश असावा, धर्मात राजकारण नसले पाहिजे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात