संपादकीय
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताकडे कोरोनावर उपचार करण्यासाठी ‘हायड्रोक्सीक्लोरोक्वीन’ या औषधाची मागणी केली आणि ‘ती न पुरवल्यास जशास तसे उत्तर देऊ’, अशी धमकीही दिली. त्याला भारताने योग्य प्रत्युत्तर दिल्यावर लगेच दुसर्याच दिवशी ट्रम्प यांनी ‘पंतप्रधान मोदी महान नेते आहेत’, असे विधान केले. ट्रम्प यांना त्यांची चूक लक्षात आली असणार किंवा त्यांच्या सल्लागारांनी त्यांना ती लक्षात आणून दिली असणार, यामुळेच त्यांच्यात हा पालट झाला, असे म्हणता येईल. त्याच वेळेस ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर गंभीर आरोप केला आहे. ‘जागतिक आरोग्य संघटना केवळ चीनकडेच सर्वाधिक लक्ष केंद्रित करते’, असा आरोप करत या संघटनेला अमेरिकेकडून देण्यात येणारा निधी रोखण्याचेही त्यांनी घोषित केले. ‘ट्रम्प वाचाळ आहेत आणि ते काहीही म्हणतात’, असे सांगत ट्रम्प यांच्या या आरोपाकडे मात्र दुर्लक्ष करता येणार नाही. ‘ट्रम्प यांनी केलेला आरोप चुकीचा आहे’, असे म्हणता येणार नाही. ‘कोरोनाविषयी जागतिक आरोग्य संघटनेची ध्येयधोरणे किंवा कार्यपद्धत पाहिली, तर ट्रम्प यांच्या आरोपात तथ्य आहे’, असे म्हणावे लागेल. ट्रम्प यांच्यापूर्वी त्यांचे राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भातील माजी सल्लागार जॉन बोल्टन यांनीही आरोप केला होता की, कोरोना विषाणूविषयीची माहिती जगापासून लपवणार्या चीनसमवेत जागतिक आरोग्य संघटना मिळालेली आहे. तसेच त्यांनी या संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस एडहॅनम घेब्रेयसस यांच्या त्यागपत्राचीही मागणी केली होती. या आरोपांवरून असेही वाटण्याची शक्यता आहे की, चीन आणि अमेरिका यांच्यातील शीतयुद्धामुळे अमेरिका असा आरोप करत असेल; मात्र आतापर्यंत कोरोनाच्या जगभरातील प्रादुर्भावाविषयी पाहिल्यास चीनने जगापासून याविषयी माहिती लपवून ठेवली, असे दिसून येते. आज चीन कोरोनाच्या प्रादुर्भावापासून अल्प हानी होऊन मुक्त होत आहे, तर दुसरीकडे युरोपमधील काही देश आणि अमेरिका यांची चीनच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात हानी होत आहे, हे दिसत आहे. यावरून चीनवर संशय घ्यायला जागा आहे.
चीनची बटिक झालेली संघटना !
जागतिक आरोग्य संघटना संयुक्त राष्ट्रांची एक शाखा आहे. सध्या चीनकडे संयुक्त राष्ट्रांचे अध्यक्षपद आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे सध्याचे महासंचालक डॉ. टेड्रोस एडहॅनम घेब्रेयसस हे आफ्रिका खंडातील इथियोपिया देशातील आहेत. ते पूर्वी काही काळ चीनमध्ये इथियोपियाचे अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांचे तेव्हापासून चीनशी सख्य आहे. चीननेच डॉ. टेड्रोस यांची या संघटनेच्या महासंचालकपदावर नियुक्ती केलेली आहे. चीनने आफ्रिका खंडातील काही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक केली आहे. जागतिक आरोग्य संघटना जगभरातील देशांना आरोग्याविषयी साहाय्य आणि मार्गदर्शन करत असते. विविध योजना राबवत असते. धोरणे ठरवत असते. जगात विविध रोगांची साथ पसरते, तेव्हा मार्गदर्शक सूत्रे लागू करते. या संदर्भात संयुक्त राष्ट्रांत चर्चा घडवून आणते; मात्र कोरोनाविषयी या संघटनेने विलंबाने पावले उचलली. चीनमध्ये कोरोनाविषयीचे पहिले लक्षण नोव्हेंबर २०१९ मध्ये समोर आले होते, ते त्याने लपवले आणि डिसेंबरमध्ये ते जगासमोर ठेवले. तेव्हा या संघटनेने तातडीने पावले उचलून मार्गदशक सूत्रे, धोरणे सांगितली पाहिजे होती; पण संयुक्त राष्ट्रांत चर्चा घडवून आणली पाहिजे होती, या गोष्टी करण्यात आल्या नाहीत. संयुक्त राष्ट्रांत चर्चा करण्याला चीन आणि आफ्रिका खंडातील काही देश यांनी (जे चीनच्या पैशांमुळे दबले गेलेले आहेत) विरोध केला. वास्तविक इतकी मोठी समस्या जगात पहिल्यांदाच आली असतांना तसे करणे आवश्यकच होते; मात्र ते टाळण्यात आले. चीनमधील परिस्थितीवर कोणतीही चर्चा करणे चीनला नको होते, त्यामुळे त्याला विरोध झाला. ‘यामागे चीनचे मोठे षड्यंत्र आहे’, असा आरोपही होत आहे आणि तसा होणे अयोग्यही म्हणता येणार नाही. ‘चीनच्या या षड्यंत्राला या संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस पाठिंबा देत आहेत किंवा चीनच्या आदेशानुसार काम करत आहेत’, असा आरोपही होत आहे. ही संघटना त्यामुळेच चीनकडे अधिक लक्ष देत आहेत. जॉन बोल्टन यांनी असाही आरोप केला होता की, डॉ. टेड्रोस यांनी चीनकडून कोरोनाविषयी सांगण्यात येणार्या माहितीवर डोळे मिटून विश्वास ठेवत संपूर्ण जगाची दिशाभूल केली. बोल्टन यांच्या आरोपाला खोटे म्हणता येणार नाही; कारण यामुळेच इटली, स्पेन या देशांत कोरोना थैमान घालत आहे. डॉ. टेड्रोस यांनी माहिती दिली असती, तर ही हानी टाळता आली असती. आता अमेरिकेत त्याच्याही पुढची स्थिती निर्माण झाली आहे, हेही रोखता आले असते. चीनला हेच होऊ द्यायचे होते; म्हणूनच त्याने कोरोनाची वस्तूस्थिती जगापासून लपवली आणि जागतिक आरोग्य संघटनेने त्याला ‘मम’ म्हटले, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये.
चीनवर जागतिक बहिष्कार घाला !
चीन कोरोनाच्या काळात त्याच्या शेजारी असणार्या तैवानवर आक्रमण करू शकतो, या शक्यतेमुळे तैवान आणि जपान यांनी युद्धसिद्धता चालू केलेली आहे, असे यापूर्वीच समोर आले आहे. त्यामुळे यातून तिसर्या महायुद्धाचीही शक्यता नाकारता येत नाही. चीनचे हे मोठे षड्यंत्र असू शकते, त्याचा थांगपत्ता कुणालाच लागलेला नाही, असेही म्हणता येईल. युरोपातील काही देश चीनच्या षड्यंत्राची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे हेर कामाला लागले आहेत. कोणत्याही शस्त्राचा वापर न करता युरोप आणि अमेरिका यांची होत असलेली हानी चीनचा विजय म्हणावा लागेल. युरोप आणि अमेरिका आज ना उद्या चीनवर सूड उगवणारच, यात शंका नाही; मात्र त्यापूर्वीच चीनला एकटे पाडून त्याची आर्थिक नाकाबंदी करण्यास चालू केले पाहिजे. दुसरीकडे युरोप आणि भारत यांनी चीनला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.