कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत कर्मचार्यांना साहाय्य
राजापूर : सध्या देशात आणि जगभरात आलेल्या वैश्विक महामारी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशभरात दळणवळण बंदी लागू करण्यात आली आहे. या बंदीच्या काळात प्रारंभीपासूनच राजापूरकरांच्या सुरक्षिततेसाठी स्वत:च्या जिवावर उधार होऊन दिवस-रात्र झटत असलेले पोलीस बांधव, राजापूर रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी, नगर परिषदेचे कर्मचारी आणि स्वच्छता कामगार यांना येथील हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने एक सामाजिक भान राखून अन् एक कृतज्ञता म्हणून सकाळी आणि संध्याकाळी चहा, बिस्किटे अन् अल्पोपहार देण्याचे सेवाकार्य बंदी लागू झाल्यापासून चालू आहे. या कार्यामध्ये वेळ प्रसंगी प्रतिष्ठानच्या समाजसेवी हितचिंतकाच्या वतीने आवश्यकतेनुसार जेवणही उपलब्ध करून देण्याची सेवा चालू आहे.
राजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि नगरपरिषद प्रशासन अन् पोलीस बांधव यांच्याकडून या सेवाकार्याचे विशेष कौतुक केले जात आहे.
आंबेवाडी येथे बंजारा समाजातील कामगारांनाही न्याहारी आणि जेवणाचे वाटप
शहरातील आंबेवाडी येथे उदरनिर्वाहासाठी मुलाबाळांसहित आलेल्या बंजारा समाजातील कामगार आणि सध्या काम नसल्यामुळे त्यांची होणारी उपासमार निदर्शनास आल्यानंतर या कामगारांनाही न्याहारी आणि प्रसंगी जेवण देण्याची सेवा प्रतिष्ठानचे शिलेदार सेवाभावी वृत्तीने करत आहेत.
देशासह सर्वच व्यवहार ठप्प असतांना एक सामाजिक भान राखून हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान आणि प्रतिष्ठानच्या हितचिंतकांच्या माध्यमातून ही सेवा प्रतिष्ठानचे शिलेदार अध्यक्ष महेश मयेकर, सर्वश्री अविनाश पाटणकर, विनायक सावंत, प्रसाद नवरे, संतोष कदम, मंदार बावधनकर, नरेंद्र पावसकर, प्रशांत लिंगायत, विवेक गुरव यांच्यासमवेत हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री बापूसाहेब पाटील आणि संजय माने करत आहेत.