वॉशिंग्टन (अमेरिका) – प्रशासनाला मी जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखण्याचा आदेश दिला आहे. ‘कोरोनाच्या प्रसाराची माहिती लपवणे आणि गैरव्यवस्थापन यांमध्ये जागतिक आरोग्य संघटनेची नेमकी काय भूमिका आहे ?’, याची पडताळणी चालू आहे, अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत दिली. ‘जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाविषयी पारदर्शकपणे माहिती जगासमोर ठेवली नाही’, असा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.
काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी या संघटनेचा निधी रोखण्याचे सुतोवाच केले होते. संयुक्त राष्ट्रांशी संलग्न असलेल्या या संघटनेला अमेरिकेकडून सर्वाधिक निधी दिला जातो. अमेरिकेने गेल्या वर्षी या संघटनेला ४० कोटी अमेरिकी डॉलर (३०६ कोटी १५ लाख रुपये) इतका निधी दिला होता.