कोरोनाच्या जगभरातील प्रादुर्भावामागे चीनच आहे, हेच अशा घटनांतून स्पष्ट होते !
बीजिंग (चीन) : चीनच्या वुहानमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे उघड करणारे ३ पत्रकार गेल्या २ मासांपासून बेपत्ता आहेत. चेन क्यूशी, फेंग बिंग आणि ली जहुआ या तिन्ही पत्रकारांनी चीनमध्ये पसरत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावाविषयीची माहिती सामाजिक माध्यमांतून उघड केली होती. त्यांनी यू ट्युब आणि ट्विटर यांवर व्हिडिओ प्रसारित करून ही माहिती जगासमोर आणली होती. त्यानंतरच हे तिन्ही पत्रकार रहस्यमयरित्या बेपत्ता झाले आहेत.
१. ३४ वर्षांचे चेन हे ६ फेब्रुवारीला संध्याकाळी ७ वाजल्यापासून बेपत्ता आहेत. कृपया त्यांना वाचवा, अशी विनंती त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे.
२. फेंग बिंग यांनी ९ फेब्रुवारीला सामाजिक माध्यमांवर याविषयी व्हिडिओ प्रसारित केल्यापासून ते बेपत्ता झाले आहेत. या व्हिडिओमध्ये वुहानमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेले मृतदेह पहायला मिळत होते. बेपत्ता होण्यापूर्वी त्यांना चीनने अटकही केली होती. काही अधिकारी त्यांच्या शरिराचे तापमान तपासण्याच्या बहाण्याने आले आणि त्यांना घेऊन गेले. तेव्हापासून ते परतलेच नाहीत.
३. २५ वर्षीय ली जहुआ हेसुद्धा चीनमधील जाणकार पत्रकार होते. चीनमधील एका वृत्तवाहिनीसाठी ते काम करत होते. ते शेवटचे २६ फेब्रुवारीला पहाण्यात आले. त्यानंतर ते बेपत्ता आहेत.
४. वुहानमध्ये ज्या भागात कोरोनाचा प्रभाव सर्वाधिक होता, त्या भागांविषयी या पत्रकारांनी वार्तांकन केले होते. तेथील सगळी परिस्थिती या पत्रकारांना ठाऊक होती. त्यामुळे त्यांनी चिनी सरकारकडे ही आपत्ती जगासमोर उघड करण्याची मागणी केली होती. हे पत्रकार बेपत्ता असतांनाही चीनने त्यांच्याविषयी काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात