चीनने यापूर्वीही अनेक देशांना अशा प्रकारच्या निकृष्ट वस्तूंचा पुरवठा केल्याचे उघड झालेले आहे आणि आता भारतानेही त्याचा अनुभव घेतला ! एकूणच कोरोनाविषयी चीनची भूमिका संशयास्पद आहे, हेच लक्षात येते त्यामुळे संपूर्ण जगाने आता चीनवर बहिष्कार घालणेच योग्य ठरील !
नवी देहली : भारताने कोरोनावर उपचार करणारे डॉक्टर आणि अन्य कर्मचारी यांच्यासाठी चीनकडून १ लाख ७० सहस्र पी.पी.ई. (पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट) किट्स मागवल्या होत्या; मात्र यांतील ५० सहस्र किट्स गुणवत्ता चाचणीत निकृष्ट ठरल्या आहेत. ग्वाल्हेरच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या प्रयोगशाळेत या किट्सची चाचणी घेण्यात आली, तसेच यापूर्वी काही खासगी आस्थापनांनी देणगी स्वरूपात दिलेल्या अशा प्रकारच्या किट्सही निकृष्ट ठरल्या होत्या. याआधी चीनने अनेक देशांना बनावट आणि निकृष्ट दर्जाचे मास्कही पाठवले होते.
सरकारी अधिकारी म्हणाले की, मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपल्याकडे अधिक किट्स असतील. त्यानंतर आणखी मागणी देण्यात येईल. सरकारच्या अंदाजानुसार भारताकडे २० लाख पी.पी.ई. किट्स उपलब्ध असल्यास देशाची स्थिती चांगली असेल. सध्या भारत या किट्सच्या उत्पादनावर अधिक भर देत आहे.
पीपीई किट्स म्हणजे काय ?
वैयक्तिक संरक्षणासाठीच्या (Personal Protection Equipment (पीपीई)) उपकरणांमध्ये संरक्षक कपडे, हेल्मेट, चष्मा, रेनकोट, ओव्हरकोट, गॉगल, स्लीपिंग बॅग, पायमोजे, प्लास्टिक शूज, चामडी बूट, रबरी गमबूट, यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो. शारीरिक दुखापतीपासून किंवा संसर्गापासून बचाव करणे हा ही उपकरणे परिधान करणार्या व्यक्तीचा हेतू असतो. सध्या कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर्स स्वतःला कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी अशा प्रकारचे कपडे वापरतात.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात