डहाणू (जिल्हा पालघर) परिसरात जमावाने संतांवर आक्रमण केल्याचे प्रकरण
ठाणे : narendraया प्रकरणाचे लवकरात लवकर अन्वेषण करून या दोन्ही संतांची हत्या करणार्या आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे २०० हून अधिक जणांच्या जमावाने कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सूरतच्या दिशेने जाणार्या सुशीलगिरी महाराज (वय ३० वर्षे), चिकने महाराज कल्पवृक्षगिरी (वय ७० वर्षे) आणि त्यांचा चालक नीलेश तेलगडे (वय ३० वर्षे) यांच्या चारचाकी वाहनावर १६ एप्रिलला रात्री १० वाजण्याच्या सुमारास लाठ्या, काठ्या, दगड यांनी आक्रमण केले.
या प्रकारामुळे सर्व साधू-संतांमध्ये तीव्र अप्रसन्नता असून झालेला प्रकार संतापजनक आहे. या वेळी येथे पोलिसांच्या समक्ष हे आक्रमण झाले असून संबंधितांवर कठोर कारवाई न झाल्यास दळणवळण बंदी संपल्यावर मोठ्या संख्येने साधू, संत महाराष्ट्र सरकारला घेराव घालतील, अशी चेतावणी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी दिली आहे.
कठोर कारवाई न झाल्यास दळणवळण बंदीनंतर लाखोंच्या संख्येने नागा साधू महाराष्ट्र सरकारला घेराव घालतील !
एखाद्या आखाड्याचे साधू पोलीस संरक्षणात गुरूंच्या अंत्ययात्रेसाठी सुरतच्या दिशेने जात असतांना त्यांच्यावर हे आक्रमण झाले. या वेळी पोलिसांनी हवेत गोळीबार करणे अपेक्षित होते; मात्र तसे झाले नाही आणि ग्रामस्थांनी केलेल्या आक्रमणात त्यांचा मृत्यू झाला. आक्रमणर्ते आणि याला उत्तरदायी असलेले पोलीस यांच्यावर कठोर कारवाई न झाल्यास दळणवळण बंदीनंतर लाखोंच्या संख्येने नागा साधू महाराष्ट्र सरकारला घेराव घालतील. कट्टर हिंदुत्वनिष्ठ असलेले उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या राज्यात साधू-संतांवर आक्रमण होते, ही गंभीर गोष्ट आहे, असे महंत नरेंद्र गिरी यांनी सांगितले.