मुंबई : दळणवळण बंदीच्या काळात भाज्यांच्या गाड्यांमध्ये गोवंशाच्या मांसावर भाजी रचून त्यातून मांसाची अवैधरित्या वाहतूक होत असल्याचा प्रकार पुढे आला आहे. १६ एप्रिल या दिवशी गोवंडी येथे हा प्रकार लक्षात आला. याविषयी महाराष्ट्र शासनाचे मानद पशूकल्याण अधिकारी डॉ. विनोद कोठारी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीवरून १०३ गोवंशियांचे ३ टन मांस पकडण्यात आले. या प्रकरणी गोवंडी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगदीश शिवाजी यांनी गाडीचा चालक शेहजाद युनूस कुरेशी याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी कुरेशी याला अटक केली आहे.
या संदर्भातील माहिती डॉ. विनोद कोठारी यांना प्राप्त झाली होती. याविषयी कोठारी यांनी १५ एप्रिलला रात्री पोलिसांना १०० क्रमांकावर दूरभाष करून ही माहिती दिली. त्यानंतर ज्या ठिकाणी गाडी येणार होती, त्या ठिकाणी डॉ. कोठारी हे स्वत: गेले. त्यांना गाडी दिसली; मात्र गाडी बंद असल्यामुळे त्यामध्ये काय आहे, हे समजले नाही. त्यामुळे पोलीस त्या गाडीवर लक्ष ठेवून होते. १६ एप्रिलला सकाळी ८ वाजता शेहजाद कुरेशी नावाचा गाडीचा चालक तेथे आला असता पोलिसांनी त्याला कह्यात घेतले. या वेळी पोलिसांनी गाडीची पडताळणी केली असता त्यामध्ये कोबी आणि फ्लॉवर या भाज्यांच्या खाली गोवंशियांचे मांस असल्याचे आढळून आले. कुरेशी याने दिलेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील संगमनेर येथून हे मांस आणण्यात आले होते. (दळणवळण बंदीच्या काळात नाशिक येथून मुंबई येथे गोवंशियांच्या मांसाची वाहतूक होत असतांना याची पोलिसांना माहिती का मिळत नाही ? कि माहिती मिळून ते आर्थिक लाभासाठी याकडे दुर्लक्ष करतात ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्यास नवल ते काय ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
गोवंशियांच्या मांसाच्या वाहतुकीद्वारे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता ! – डॉ. विनोद कोठारी, मानद पशूकल्याण अधिकारी, महाराष्ट्र शासन
गोवंशियांच्या हत्या होत असलेल्या ठिकाणांच्या पोलीस अधिकार्यांना निलंबित करण्याची डॉ. कोठारी यांची मागणी
डॉ. विनोद कोठारी यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गोवंशियांच्या मांसाची वाहतूक चालू आहे. याविषयी शासनाने कठोर कारवाई करायला हवी. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनधिकृतरित्या पशूवधगृहे चालू आहेत. मानद पशूकल्याण अधिकारी या नात्याने मी याविषयी स्थानिक पोलिसांना कळवत असतो; मात्र याविषयी माझा अनुभव निराशाजनक आहे. माझ्या माहितीप्रमाणे संगमनेर, अकोला, दौड, जुन्नर, श्रीरामपूर, कोपरगाव, फलटण, इंदापूर, बारामती, धाराशीव, परांडा ही गोवंशियांची मोठ्या प्रमाणात हत्या होत असलेली ठिकाणे आहेत. गोवंशियांच्या मासांच्या वाहतुकीद्वारे मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना माझी विनंती आहे की, ज्या ठिकाणी गोवंशियांच्या अवैधरित्या हत्या होत आहेत, तेथील स्थानिक पोलीस अधिकार्यांना त्वरित निलंबित करण्यात यावे.’’