नवी देहली : जगभरात कोरोना पसरवल्यामुळे चीनवर सगळीकडूनच टीका होऊ लागली आहे. भविष्यात चीनमध्ये राहून उद्योग चालवणे कठीण जाऊ शकते, हे लक्षात घेऊने चीनमधील सहस्रो विदेशी आस्थापने तेथून त्यांचा गाशा गुंडाळून दुसरीकडे जाण्याच्या सिद्धतेत आहे. जपानने त्यांच्या देशातील चीनमध्ये गेलेल्या आस्थापनांना पुन्हा जपानमध्ये परतण्याचेआवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर चीनमधील अनुमाने १ सहस्र विदेशी आस्थापने भारतात येण्याच्या सिद्धतेत आहेत, असे वृत्त बिझनेस टुडे या नियतकालिकाने दिले आहे.
१. भारतात त्यांचे कारखाने उभारण्यासाठी या विदेशी आस्थापनांनी भारत सरकारमधील अधिकार्यांशी चर्चा चालू केली आहे. यांपैकी भ्रमणभाष संच, इलेक्ट्रॉनिक्स, मेडिकल डिव्हाइसेस, टेक्सटाइल्स आणि सिंथेटिक फॅब्रिक्स या क्षेत्रांतील अनुमाने ३०० आस्थापनांनी कारखाने उभारण्यासाठी केंद्र सरकारशी प्रत्यक्ष संपर्क करून चर्चाही केली आहे. या चर्चा यशस्वी झाली, तर चीनला याचा मोठा फटका बसेल, असे सांगितले जात आहे.
२. सरकारच्या एका अधिकार्याने सांगितले की, भारत हा आगामी काळात उत्पादन क्षेत्रासाठी पर्यायी केंद्र ठरू शकतो, असा या आस्थापनांचा दृष्टीकोन आहे. यामुळे सरकारकडे विविध पातळ्यांवर त्यांनी प्रस्ताव पाठवले आहेत. यात विदेशांतील भारतीय दूतावास आणि विविध राज्यांचे उद्योग मंत्रालय यांचा समावेश आहे. सध्या अनुमाने १ सहस्र आस्थापने चर्चा करत आहेत. यांपैकी ३०० आस्थापनांवर आम्ही अधिक लक्ष केंद्रित केले आहे. कोरोनाचे संकट नियंत्रणात आल्यावर भारतासाठी अनेक फलदायी गोष्टी समोर येतील. जपान, अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांसारखे देश चीनवर प्रमाणापेक्षा अधिक अवलंबून असल्याचेही या अधिकार्याने सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात