एकीकडे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी जीव धोक्यात घालून कोरोनाशी लढत असतांना दुसरीकडे पराकोटीची असंवेदनशीलता आणि दायित्वशून्यता असणारे असे शासकीय अधिकारी कधीतरी जनहित साधू शकतील का ?
जालना : संभाजीनगर येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते (वय ४३ वर्षे) यांना ‘आरोग्य सेवा’ असा फलक लावलेल्या शासकीय वाहनातून ६ लाख ७० सहस्र रुपये रोख रक्कम आणि ६ सहस्र रुपयांचे विदेशी मद्य घेऊन जातांना पोलिसांनी जिल्ह्यातील वरूडी पडताळणी नाक्यावर पकडले. ही घटना १८ एप्रिल या दिवशी दुपारी १.३० वाजता घडली. वाहनाची कागदपत्रे, रोख रक्कम आणि विदेशी मद्य यांविषयी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे न दिल्यामुळे कायद्याचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला. प्राथमिक चौकशी करून त्यांची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी वाहनासह रोख रक्कम आणि विदेशी मद्य असा एकूण १२ लाख ७६ सहस्र रुपयांचा माल जप्त केला. या प्रकरणी जिल्हा विशेष शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शिवसिंग बहुरे यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. संभाजीनगर क्षेत्रातून पोलिसांनी त्यांना कसे सोडले ? संभाजीनगर आणि जालना संयुक्त पडताळणी नाक्यांवरूनही त्यांनी गाडी पुढे नेली कशी ? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. (यावरून पोलिसांनी डॉ. गिते यांचे वाहन योग्य पद्धतीने पडताळले नसल्याचे दिसून येते. यात जे कुणी दोषी असतील, तर त्यांच्यावर सरकारने कठोर कारवाई करायला हवी ! – संपादक)
आरोग्य विभागाचे दायित्व क्षमता असलेल्या व्यक्तीकडे देणार ! – जिल्हा परिषद
याविषयी संभाजीनगर येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोदावाले म्हणाले, ‘‘डॉ. गिते यांनी स्वतःहून मुख्यालय सोडून जात असल्याचे सांगितले नाही. प्राथमिक माहितीवरून ते शासकीय वाहनाने जात असल्याचे दिसून येते. आता आरोग्य विभागाचे दायित्व क्षमता असलेल्या व्यक्तीकडे देण्यात येईल. कोरोनामुळे आरोग्य विभागावर मोठे दायित्व आहे. त्यामुळे डॉ. गिते यांनी असे करायला नको होते.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात