प्रसिद्ध संशोधक आणि व्हायरोलॉजिस्ट डॉ. लॅन लिपकीन यांची चेतावणी
साथ येऊ न देण्यासाठी जीवनशैली पालटण्याचे सुतोवाच
जिनेव्हा (स्वित्झर्लंड) : सध्या जगात आलेली कोरोनाची साथ हे सर्वांत मोठे संकट आहे, असे मला वाटत नाही. निसर्गाशी संबंधित विषय आपण ज्या पद्धतीने हाताळत आहोत, त्यात वेळीच पालट केला नाही, तर अशाप्रकारची आणखी एखादी साथ येऊ शकते, तसेच अशी संकटे वारंवार येत रहातील, अशी चेतावणी कोलंबिया विद्यापिठातील प्रसिद्ध संशोधक आणि व्हायरोलॉजिस्ट डॉ. लॅन लिपकीन यांनी दिली.
डॉ. लॅन लिपकीन म्हणाले की,
१. वातावरणातील पालटांमुळे लोकांना स्थलांतरित व्हावे लागत आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून झपाट्याने आजार पसरत आहेत. आपल्याकडे असे अनेक लोक आहेत ज्यांना अन्नपदार्थांच्या माध्यमातून पोषक तत्त्वे मिळत नाहीत. असे लोक आता जंगली प्राणी खाऊ लागले आहेत. या प्राण्यांच्या माध्यमातून रोगांचा संसर्ग होत आहे. श्रीमंत लोकांकडे असणार्या पाळीव प्राण्यांच्या माध्यमातूनही मानवाला रोगांचा संसर्ग होऊ शकतो.
२. स्पॅनिश फ्लू नंतर जगभरामध्ये एड्स, निफा, चिकनगुनिया, सार्क-१, मर्स आदी साथीचे रोग येऊन गेले आहेत. मी अशा पद्धतीच्या जवळजवळ १५ रोगांचा अभ्यास केला आहे.
३. असे रोग वारंवार येऊ नये, यासाठी आपल्याला आपली जीवनशैली पालटावी लागेल, तसेच जागतिक स्तरावर माहितीची देवणघेवाण करणारी यंत्रणा सिद्ध करावी लागेल. असे केल्यास आपण अशा पद्धतीच्या संकटांना अधिक सक्षमपणे तोंड देऊ शकतो.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात