Menu Close

इटली कोरोनाग्रस्त होण्याला तेथील चीनधार्जिणे साम्यवादीच उत्तरदायी !

कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झालेल्या देशांत आजमितीस इटली तिसर्‍या क्रमांकावर आहे. ‘चीनपासून इटली सहस्रो कि.मी. दूर असतांना तेथे कोरोनाचा प्रादुर्भाव झाला कसा ?’, असा प्रश्‍न प्रत्येकालाच पडला. हे एकाएकी झालेले नाही. त्यामागे फार मोठी आणि महत्त्वाची पार्श्‍वभूमी दडलेली आहे. इटलीतील चीनधार्जिण्या साम्यवाद्यांची सत्ता आणि विस्ताराची आसुरी महत्त्वाकांक्षा बाळगणार्‍या चीनला इटलीने घातलेल्या पायघड्या, ही त्यामागील काही महत्त्वाची कारणे आहेत. त्यावर प्रकाश टाकणारा हा लेख…


१. चीनचा इटलीतील वाढता हस्तक्षेप !

‘इटलीतील ‘डेमॉक्रॅटिक पार्टी’ या साम्यवादी (कम्युनिस्ट) पक्षाचे नेते तथा फ्लॉरेन्सचे माजी महापौर मात्तेओ रेंत्सी बर्‍याच खटाटोपानंतर फेब्रुवारी २०१४ मध्ये इटलीचे पंतप्रधान झाले. कमालीचे डाव्या विचारसरणीचे असलेले पंतप्रधान रेंत्सी यांच्या काळात एकीकडे इटली आणि चिनी सरकारमध्ये अनाकलनीय साटेलोटे दिसत असतांना दुसरीकडे इटलीत आर्थिक पोरखेळ चालू होता. बँका बंद झाल्या नाहीत; पण कोसळल्या. निवृत्तीवेतन निधीला आहोटी लागली. इटलीचे कायदे, तसेच युरोपीय संघाचे अमेरिका आणि ब्रिटन यांच्याशी झालेले व्यापार करार यांना जराही न जुमानता चिनी लोकांनी इटलीच्या उत्तर भागात स्थावर मालमत्ता अन् स्थानिक व्यापार-व्यवसाय विकत घेण्याचा सपाटा चालू केला. इटलीमधील दूरसंचार, कारखानदारी, फॅशन उद्योग यांसारख्या क्षेत्रांमध्ये चीनने मुसंडी मारली. चीनच्या या कृत्याकडे पंतप्रधान रेंत्सी यांचे सरकार जाणूनबजून कानाडोळा करत होते. दुसरीकडे ‘चीन व्यापार कराराला जुमानत नाही’, हे दिसत असतांनाही अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून ‘ब्र’देखील काढत नव्हते. चीनच्या इटलीतील वाढत्या हस्तक्षेपाच्या घडामोडी जनतेसमोर येऊच दिल्या गेल्या नाहीत.

२. इटलीतील उद्योगधंदे एकामागून एक कह्यात घेणारा विस्तारवादी चीन !

मधल्या कालावधीत इटालियन आस्थापनांपैकी २७ टक्के, म्हणजेच ३०० हून अधिक आस्थापने चीनच्या घशात गेल्या होत्या. ज्यांचे मूल्यांकन १०० दशलक्ष युरोपेक्षा (८३१ कोटी ५४ लाख रुपये) अल्प होते, अशी आस्थापने कह्यात घेऊन चीनने इटलीच्या अर्थव्यवस्थेत ५ अब्ज युरो (४१ सहस्र ५८६ कोटीहून अधिक रुपये) इतकी रक्कम ओतली. ‘फियाट-क्रायस्लर’, ‘प्रिझमायन’ आणि ‘टेरना’ या प्रमुख इटालियन आस्थापनांचे नियंत्रणही आता चीनच्या हाती गेले आहे. आज इटलीतील उद्योगधंद्यांची अशी स्थिती आहे की, मोटारीला नवा ‘पिरेल्ली’ टायर जरी बसवण्यात आला, तरी त्याचा लाभांश चीनच्या तिजोरीत जमा होतो ! इटलीतील दूरसंचार सेवा देणारी कंपनी आणि ‘ईएन्आय’ यांसारखी प्रमुख ग्राहक सेवा देणारी आस्थापने आता चीनमधील सरकारी संस्थांच्या मालकीच्या आहेत. इटलीतील मिलानच्या सेग्रेट या उपनगरात ‘हुआवेई’ या चिनी दूरसंचार आस्थापनाने पहिले संशोधन केंद्र उभारून ‘मायक्रोवेव्ह’च्या संशोधनातून ‘५ जी’ भ्रमणभाष तंत्रज्ञान विकसित केले. इटलीतील ५ प्रमुख बँका सध्या चीनच्या मालकीच्या आहेत ! चीनने सर्वाधिक पैसा इटलीच्या फॅशन उद्योगात गुंतवला. ‘पिंको पॅलिनो’, ‘मिस सिक्स्टी’, ‘सर्जिओ ताच्चनी’, ‘रॉबर्टा डी कॅमेरिनो’ आणि ‘मरिएल्ला बुर्रानी’ हे आघाडीचे फॅशन ब्रँड आता १०० टक्के चीनच्या मालकीचे बनले आहेत. चीन इटलीतील आस्थापने एकामागोमाग एक विकत घेत असतांना इटलीचे पंतप्रधान रेंत्सी हाताची घडी घालून शांतपणे सर्व पहात होते. या चिनी अस्थापनांना अनेक वेळा ‘कस्टम्स्’ तपासणीतूनही जावे लागले नाही. सहस्रो चिनी मिलानमार्गे इटलीत अवैधरित्या घुसले आणि जातांना पैसा, तंत्रज्ञान अन् इटालियन आस्थापनांची व्यापारी गुपिते लूटन नेली. देशात नाचक्की झाल्याने डिसेंबर २०१६ मध्ये इटलीचे पंतप्रधान मात्तेओ रेंत्सी यांना पदच्युत करण्यात आले. तोपर्यंत चीनने इटलीतील अर्थकारणात शिरकाव करत तेथील सर्व बाजारपेठच कह्यात घेतली होती.

३. इटलीतील चीनविरोधी नेतृत्वाने ड्रॅगनला हुसकावण्याचा केलेला प्रयत्न औटघटकेचाच !

इटलीमध्ये सत्तांतर होऊन ‘लेगा नॉर्ड’ या चीनविरोधी समाजवादी पक्षाचे मात्तेओ सॅल्विनी सत्तेवर आले. त्यांनी अवैधरित्या देशात शिरलेल्या चिनी लोकांचे अड्डे बंद करून त्यांना देशाबाहेर काढण्याची पद्धतशीर मोहीम हाती घेतली. चिनी लोकांचे इटलीमधील मुक्त येणे-जाणे बंद केले; पण सॅल्विनी यांची सत्ता अल्पजीवी ठरली. साम्यवादी असलेल्या इटलीच्या ‘डीएन्ए’मध्येच समाजवाद भिनलेला असल्यामुळे सॅल्विनो सत्तेवरून पायउतार होताच अपक्ष नेते ज्युसेप कॉन्ते यांनी सत्तेत येताच पुन्हा चीनधार्जिणी भूमिका घेतली. त्यांच्या सांगण्यावरून देशाची बंदरे चीनसाठी पुन्हा सताड उघडी केली गेली. मध्य पूर्व आणि पूर्व आफ्रिकन देशांतून कोणतीही वैध कागदपत्रे नसलेल्या स्थलांतरितांचे अनिर्बंध लोंढे पुन्हा इटलीमध्ये येऊ लागले.

४. चीनच्या वुहानमधूनच कोरोनाचा इटलीत शिरकाव !

इटलीत आता पुन्हा एकदा मुक्त प्रवेश मिळाल्यामुळे प्रामुख्याने चीनच्या वुहान प्रांतातून मोठ्या संख्येने लोक इटलीतील मिलानमध्ये आले. डिसेंबर २०१९ मध्ये बहुसंख्य चिनी लोकांची वस्ती असलेल्या इटलीतील लोम्बार्डीच्या भागात ‘कोरोना’चा शिरकाव झाल्याची कुणकुण लागली. ‘कोरोना विषाणू चीनच्या वुहानमधूनच इटलीमध्ये आला’, यावर वैद्यकीय तज्ञांमध्ये जराही दुमत नाही. आता तर इटलीतील आरोग्य व्यवस्था पार कोलमडून गेली आहे. आधी रेंत्सी आणि नंतर कॉन्ते यांच्या सरकारांनी अवैध स्थलांतरितांचे चोचले पुरवण्यावर अतोनात व्यय केल्यामुळेच इटलीत आरोग्य सेवेसाठी पैशांचे पाठबळच उरलेले नाही. परिणामी इटलीतील आरोग्य व्यवस्थाच आज ‘व्हेंटिलेटरवर’ आहे.

५. भ्रष्टाचार आणि उधळपट्टी यांमुळे इटलीतील बेरोजगारीत वाढ !

वर्ष २०१५ मध्ये इटलीची राजधानी रोमच्या पूर्वेस असलेल्या अमाट्राईस येथे प्रलयकारी भूकंप आला होता. या भूकंपामुळे या परिसरातील गावेच्या गावे जमीनदोस्त झाली होती. तेव्हा जगभरातून साहाय्य म्हणून आलेला बराच पैसा भ्रष्टाचाराने बरबटलेल्या इटलीतील रेंत्सी सरकारमुळे भूकंपग्रस्तांपर्यंत पोचलाच नाही. तो पैसा स्थलांतरितांच्या लोंढ्यावर व्यय करण्यात आला ! सरकारचा अवास्तव आणि बेशिस्त व्यय, तसेच अवैध स्थलांतरितांचा भार अन् अकार्यक्षमता, यांमुळे इटलीत बेरोजगारीचे प्रमाण ३५ ते ४० टक्क्यांवर गेले आहे. तेथे प्रत्येकाला चरितार्थासाठी काही ठराविक रक्कम देण्याचे ‘फॅड’ सरकारने चालू केले आहे. तुम्ही जर डेमोक्रॅटीक पक्षाचे असाल, तर तुम्ही काम करा अथवा करू नका, तुम्हाला सरकारकडून ठराविक रक्कम दिली जातेच. याउलट जे प्रामाणिकपणे काम करतात, त्यांच्यावर मात्र सरकार कर वाढवत आहे. उदाहरणार्थ तुम्ही ज्या इमारतीत रहाता, तिला असणार्‍या बाल्कनीची (गच्चीची) सावली खालील भूमीवर पडते, म्हणून त्यासाठी ‘सावली कर’ही इटलीत आकारला जातो !

६. इटलीतील कायदाद्रोही सरकार विसर्जित होणेच आवश्यक !

चिनी लोकांनी कोरोना विषाणू इटलीत आणि जगात इतरत्र आणला. अतीडावे राजकारण आणि त्यांचे चीनधार्जिणे धोरण यांनी त्यास सतत खतपाणी घातले. १३ एप्रिलपर्यंत इटलीत कोरोनामुळे २१ सहस्र ६७ लोकांचा बळी गेला. १ लाख ६२ सहस्र ४८८ लोक कोरोनाबाधित आहेत. त्यांपैकी ३७ सहस्र १३० व्यक्ती आतापर्यंत बर्‍या झाल्या आहेत. आल्प्स पर्वतरांगांमध्ये उंचावर वसलेल्या शहरांपासून ते सिसिलिया आणि सार्देनिया या प्राचीन समुद्र किनार्‍यापर्यंतची इटलीतील बहुतांश घरे ओस पडली नसली, तरी ती भुताटकीची शहरे होण्याच्या मार्गावर आहेत. प्रतिदिन दैनंदिन जीवनाची गजबज तेथे दिसत नाही. व्हॅटिकन सिटीनेही स्वतःची प्रवेशदारे बंद करून घेतली आहेत. तेथे सशस्त्र पहारेकरी पहारा देत आहेत. एकूण ६ कोटी नागरिक दळणवळण बंदीमध्ये आहेत. ज्यांना या विषयाची माहिती होती किंवा माहिती असायला हवी होती, असेही काही लोक आहेत. त्याचा दोष कुणाला द्यायचा, याचा सखोल अभ्यास केल्यानंतर ‘हा कोरोना इटलीत आणि जगभर पसरला तो साम्यवाद्यांमुळेच’, हे आता स्पष्ट झाले आहे. कोरोनाशी लढणार्‍या अमेरिकेनेही यातून धडा घेण्याची वेळ आली आहे. त्यासाठी भविष्यात अगदी साध्या आणि सोप्या उपायांची कार्यवाही करावी लागेल. ‘राज्यघटना गुंडाळून ठेवणार्‍या आणि कायद्यांचे पालन न करणार्‍या इटलीतील राजकीय नेत्यांचे सरकार विसर्जित करणे’, हीच ती कार्यवाही !’

– लेखक जिआकोमिनो निकोलाझो, इटली

(साभार : दैनिक लोकमत, नवी देहली आवृत्ती (१६.४.२०२०))

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *