शनिशिंगणापूर येथे महिलांनी चौथर्यावर चढून शनिदेवाची पूजा करण्याचा विषय सध्या माध्यमातून गाजत आहे.
१. प्रत्येक स्थळाचे नियम पाळणे, हे समाजहिताच्या दृष्टीने प्रत्येकाला बंधनकारक असते !
एखाद्या स्त्रीने शनिशिंगणापूरच्या शनिदेवांची पूजा स्वतः करण्याचा आग्रह धरणे, यात काही तथ्य नाही. यामागे भाव तर नाहीच, उलट हट्ट आणि समाजात फूट पाडणे हे आहे. येथे लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे त्या त्या क्षेत्राचे नियम, रूढी आणि परंपरा पाळल्याच पाहिजेत, उदा. ताजमहाल हे काही प्रार्थनास्थळ नाही. ती शासकीय मालकीची जागा आहे; पण तेथे पादत्राणे काढून अनवाणी प्रवेश करावा लागतो. परदेशी प्रेक्षकांसाठी बुटांवर अनावरण घालावे लागते. गुरुद्वारात डोक्यावर टोपी, रूमाल किंवा पदर घ्यावा लागतो. हे नियम पाळायचे नसतील, तर सामाजिक स्थळी व्यक्तीने हट्टाने जाऊ नये. इतरांचे हक्क, अधिकार, मते तुडवणे म्हणजे लोकशाही नव्हे. मला नमाज पढायचा आहे, असे म्हणून एखाद्या स्त्रीने मशिदीत जाऊन तिचे काय होते ते पहावे.
२. शनि या ग्रहाचे कार्य
शनि हा सूर्यमालेतील एक ग्रह आहे. आपल्या पृथ्वीचा तो आधार आहे. पृथ्वीभोवती हवेचे जे वातावरण आहे, त्यावर शनीचा प्रभाव पडतो, अशी आपल्या नारद इत्यादी ऋषींची धारणा आहे. शनीची आराधना करतांना त्याचे गुण काय आहेत ?, हे लक्षात घ्यावे. शनि हा एक पदार्थ, वस्तू, object आहे आणि ग्रह असल्यामुळे त्यात काल हे द्रव्य आहे. कालदर्शकता हे त्याचे substone होते. आकाशातील एकेक नक्षत्रांतून ग्रह पुढे पुढे जातांना नक्षत्रात ठेवलेले कालगुण स्वीकारून ते आपल्याकडे पाठवतात. ते गुण ग्रहण करतात; म्हणून या सात प्लॅनेटस्ना आपण ग्रह म्हणतो. प्लॅनेट म्हणजे फिरणारे पदार्थ. तारे फिरत नाहीत. सूर्यादी सात ग्रह आणि चंद्रासह पृथ्वी आकाशातील ज्या मार्गाने भ्रमण करतात, त्याला क्रांतीवृत्त किंवा नक्षत्रचक्र म्हणतात. भ्रमणमार्गावर येणार्या तारकांना नक्षत्र म्हणतात. ही नक्षत्रे आणि राशी यांच्यावर अग्नी, पृथ्वी, वायू आणि जल या मूर्त द्रव्यांचे गुण असतात. शनीमध्ये वायूतत्त्वाचे गुण आहेत. वायूचा स्पर्श हा विशेष गुण आहे. वायूला आयुर्वेदात बाह्यप्राण म्हणतात. गर्भधारणा म्हणजे शुक्राणू आणि बीजाणूचे मीलन धनंजय नावाचा उपप्राण घडवून आणतो. बालक उदरातून बाहेर आल्यावर ते प्रथम उच्छ्वास सोडते, त्या वेळी बाह्यप्राण अंतःप्राणाला उद्दिपित करतो अन् देहाची हालचाल चालू होते. हे कार्य शनीतील कालद्रव्याने पुढे चालू रहाते. वायूमध्ये जे गुण आहेत, त्यामुळे सृष्टीतील उष्णतामान, पावसाळा इत्यादी ऋतू, शरिरातील चयापचय क्रिया, सप्तधातू आणि उपधातू, मलप्रक्रिया सुरळीत चालते, तसेच मन, बुद्धी, कर्मेद्रिये यांना गती देणे इत्यादी कार्ये चालतात. वायूमध्ये लघुता (हलकेपणा) शीत, रुक्ष, खर (खरखरीतपणा), विशदकर, सूक्ष्म आणि चल हे गुण आहेत.
३. शनि हा वायूतत्त्व उद्दिपित करत असल्यामुळे स्त्रियांसाठी अनारोग्यकारक स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी स्त्रियांनी शनीची पूजा करू नये, असा दंडक घातला जाणे
शनिशिंगणापूरच्या शनिमूर्तीची पूजा महिलांनी का करू नये ?, याची वैद्यकीय, शारीरिक, मानसिक कारणे आहेत. शनि हा प्राणशक्तीशी निगडीत आहे. स्त्री आणि पुरुष यांत भेद काय आहेत ? आपण जे अन्न घेतो, त्याचे पचन करून रस नावाचा पहिला धातू सिद्ध होतो. रसवाहिन्यांतून रस शरिरातील पेशीत वायूकडून पोचवला जातो. या गतीमुळे रसातील अग्नी वाढून त्याचे रूपांतर रक्तात केले जाते. मुलगी जशी मोठी होते, तसे तिच्या देहात रसातून स्तन्य (दूध) आणि रज (विटाळ) यांपैकी एक उपधातू निर्माण होतो. हा रजस्राव स्त्रीच्या गर्भाशयात काही दिवस साठवला जातो. तारुण्यात ही प्रक्रिया चालू झाली की, बीजांडकोशातून (ओव्हरीतून) आळीपाळीने एक बीजांड सिद्ध होऊन बीजवाहक नलिकेतून (फिलोपियन ट्यूब) पुढे गर्भाशयात येते आणि शुक्राणूशी फलन झाले नाही, तर बीज आणि रजस्राव चालू होतो. हे चक्र चंद्राच्या नक्षत्रचक्राच्या सुमारे २८ दिवसांशी निगडित असते.
मानवी शरिरातील दहा द्वारांपेक्षा स्त्रीदेहात स्तन्य स्रावाची दोन आणि गर्भस्रावाचे एक अशी तीन द्वारे पुरुषांपेक्षा अधिक असतात. स्त्रीदेहात रसधातू म्हणजे पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यांचे डोळे पाणीदार, टपोरे आणि प्रेमळ असतात. शनि वायूतत्त्व उद्दिपित करतो आणि त्यामुळे स्त्रीदेहातील अपान वायू विनाकारण उद्दिपित होतो. ही अनारोग्यकारक स्थिती टाळण्यासाठी स्त्रियांनी पूजा करू नये, असा दंडक घातला.
४. शनीमुळे स्त्रियांमध्ये मासिक पाळीचे चक्र अनियमित होणे
अपान वायू हा मानसिक स्थितीवरही कार्य करतो. शाळेत एका मुलाला शू लागली की, इतर मुलांमध्ये ती प्रवृत्ती होते. इतर प्राण्यांना शू-शीचे भान, धारणाशक्ती नसते. माणसांमध्ये शी-शूवर संस्कार केले जातात; पण मासिक पाळीत धारणा नसते. ती नकळत थोडी थोडी; पण सारखी स्रवत असते. शनीच्या गुणांमुळे हे २८ दिवसांचे चक्र अनियमित होते. जुन्या काळी घातलेल्या परंपरा म्हणजे मागासलेपणा आणि निर्बुद्धपणा, असे मानण्याची जी वृत्ती आहे, ती व्यक्ती आणि समाज दोघांनाही घातक आहे.
५. महिलांनी विज्ञापने आणि व्यक्तीस्वातंत्र्याचे खूळ यांपासून दूरच रहावे !
मासिक पाळीच्या वेळी स्त्रीने समाजात मिसळू नये; कारण इतरांचा अपान उद्दिपित होतो. धावपळ, उन्हात हिंडणे टाळावे. पाळीच्या वेळी स्त्रिया वापरतात ते कापड वापरले, म्हणजे शारीरिक आणि मानसिक मरगळ दूर होते, असे नाही. अंधश्रद्धेप्रमाणेच विज्ञापने आणि व्यक्तीस्वातंत्र्याचे खूळ, यापासून दूरच रहावे.
– श्री. श्री. भट, ३/६, एव्हरेस्ट सोसायटी, डोंबिवली (प.) (संदर्भ : धनुर्धारी, मार्च २०१६) (दैनिक सनातन प्रभात)
0 Comments