संयुक्त राष्ट्राने या महिलेचे रक्षण करण्यासाठी चीनवर दवाब निर्माण करावा , तसेच चीनने जगापासून ज्या गोष्टी लपवल्या त्याची माहिती देण्यासाठीही चीनला बाध्य करावे !
नवी देहली : चीनमधील ज्या वुहान शहरातून कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण जगात झाला, त्या वुहानमधील फँग फँग नावाची महिला प्रतिदिन दैनंदिनी लिहून ती ऑनलाईन प्रसारित करत होती. यातून ती वुहानमध्ये पाहिलेल्या घटनांचे सत्य विवरण करत होती. त्यातून चीन जे काही जगापासून लपवत आहे, ते समोर येत होते. प्रथम ही महिला चिनी भाषेत लिहीत होती. नंतर या लिखाणाचे जर्मनी आणि इंग्रजी भाषेत भाषांतर प्रसारित होऊ लागल्यावर तिला चीनमधूनच ठार मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या आहेत.
१. वुहानमधील दळणवळण बंदीच्या ७६ दिवसांतील ही दैनंदिनी आहे. यात वुहानमधील परिस्थिती, चीन प्रशासनाचा हलगर्जीपणा, रुग्णालयांमधील रुग्णांची दुर्दशा, स्मशानभूमी आणि कब्रस्तान आदींविषयी तिने यात लिहिले आहे.
२. दैनंदिनीच्या ऑनलाईन आवृत्तीत फँग फँगने एकूण ६४ पोस्ट्स केल्या आहेत. जेव्हा जगाला कोरोना नीट ठाऊक नव्हता, तेव्हा त्यांनी जगाला डॉक्टरांच्या हवाल्याने सांगितले की, हा आजार संसर्गजन्य आहे.
३. फँग फँग यांनी १३ फेब्रुवारी दिवशी एका कब्रस्तानाचे छायाचित्र प्रसारित करून लिहिले होते, माझ्या एका डॉक्टर मित्राने मला हे छायाचित्र पाठवले होते. या ठिकाणी चहुबाजूला भ्रमणभाष संच विखुरलेले आहेत. जेव्हा चीन सरकार मृत्यूची संख्या लपवत होता, तेव्हा फँग-फँगने विखुरलेल्या भ्रमणभाष संचाद्वारे मृत्यू किती वेगाने येत आहे, हे दाखवून दिले.
४. १७ फेब्रुवारीला फँग-फँगने लिहिले की, रुग्णालये काही दिवस मृत्यू प्रमाणपत्रांचे वितरण करत रहातील आणि कित्येक मृतदेह रुग्णवाहिन्यांमध्ये स्मशानभूमीत नेले जातील. ही वाहने दिवसात अनेक फेर्या मारत आहेत.
५. फँग-फँग यांनी रुग्णालयांच्या दुर्दशेविषयीही लिहितांना, रुग्णालयात जागा नाही, डॉक्टर रुग्णांना पाहू शकत नाहीत, कुणालाही कुणाची चिंता नाही, असे सांगितले आहे.
६. पाश्चात्य देशांमधील उपग्रह असे दाखवत होते की, वुहानमध्ये काळे धूर वाढले होते त्या वेळी बरेच मृतदेह जाळण्यात आले होते. हवेत सल्फरच्या प्रमाणावरून मृतांचा आकडा किती असेल ?, याचा अंदाज उपग्रहाला येऊ शकतो; मात्र चीनने केवळ ३ सहस्र ८०० हून अधिक जणांचाच मृत्यू झाल्याचे सांगितले. फँग फँगने डोळ्यांनी जे पाहिले ते जगाला सांगितले. त्यावरून चीन जगापासून सत्य लपवत आहे, हेे सिद्ध होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात