पाकिस्तानमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. असे असतांना एका बाजूला पाकिस्तान शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे, तर दुसर्या बाजूला इराणच्या सीमेतूनच पाकिस्तानमध्ये प्रवेश करणार्या नागरिकांमुळे कोरोना विषाणूचा सिंधमध्ये सर्वाधिक प्रादुर्भाव वाढत आहे. परिणामी तेथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून पाकमधील आरोग्य व्यवस्थेची दयनीय स्थिती आणि रुग्णांची हेळसांड होत आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे पाकमध्ये कोरोनाचा प्रकोप वाढण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने तेथील सद्यःस्थितीवर प्रकाश टाकणारा लेख येथे देत आहोत.
१. भारतीय सैन्यप्रमुखांकडून पाकिस्तानची निंदा !
भारतासह संपूर्ण जग सध्या कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी लढत असतांना पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार करण्यात येत आहे. या सूत्रावरून सैन्यप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी तीव्र शब्दांत निंदा केली. या कठीण प्रसंगातही पाकिस्तानने स्वतःच्या वृत्तीत किंचितही पालट केलेला नाही. जनरल नरवणे म्हणाले की, कोरोना संक्रमणामुळे जगातील सगळेच देश या विषाणूविरोधात लढा देत आहेत; पण पाकिस्तानने याही स्थितीत स्वतःच्या कारवाया करणे चालूच ठेवले आहे. या कठीण प्रसंगात भारत जगातील इतर देशांना वैद्यकीय साहाय्य करत आहे, तो औषधे आणि वैद्यकीय साधने निर्यात करत आहे; पण दुसर्या बाजूला पाकिस्तानकडून आतंकवाद निर्यात करण्याचे काम वेगाने चालूच आहे. काश्मीर खोर्यात ५ एप्रिलला झालेल्या चकमकीत ५ आतंकवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले; पण या वेळी ५ सैनिकही हुतात्मा झाले. आतंकवादी घुसखोरी करून भारतात शिरण्याच्या प्रयत्नात होते.
२. कोरोना पसरवण्याचा एक आंतरराष्ट्रीय कट !
भारतात कोरोना पसरवण्याचा एक आंतरराष्ट्रीय कट उघडकीस आला आहे. नेपाळमधील परसा जिल्ह्यातील जग्गनाथपूर गावातील रहिवासी ‘जालिम मुखिया’ याने भारतात कोरोना पसरवण्याचा कट आखला आहे. तो नेपाळमधून ४० ते ५० कोरोना संक्रमित भारतात पाठवण्याच्या सिद्धतेत आहे. जालिम मुखिया याचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय.एस्.आय.शी संबंध आहेत. भारतात खोट्या (बनावट) नोटा आणि अमली पदार्थ पोचवण्यात त्याचाच हात होता. सर्वत्र चिनी कोरोना विषाणूचा उद्रेक झाला असतांना धार्मिक मेळाव्यांवर बंदी घालण्याच्या विरोधात पाकिस्तानातील ५० हून अधिक ज्येष्ठ धर्मगुरूंच्या गटाने सरकारला १४ एप्रिलला चेतावणी दिली आहे. ‘अल्लाला क्षमा मागण्यासाठी अधिक उपासकांना मशिदीत जाण्याची मुभा द्यावी’, अशी मागणी त्यांनी केली आहे, असे वृत्त ‘डॉन न्यूज’ने दिले. पाकिस्तानमध्ये ८ सहस्र लोकांना संसर्गित करणार्या प्राणघातक चिनी कोरोना मृतांची संख्या १५९ पर्यंत गेली आहे. अनेक ठिकाणी हा संसर्ग तिसर्या टप्प्याला, म्हणजेच सामाजिक प्रसारापर्यंत गेला आहे. वुहानमध्ये जेव्हा कोरोनाचा संसर्ग झाला, तेव्हा विविध देशांनी तेथे अडकलेल्या आपल्या नागरिकांना सोडवून परत आणले होते. याला अपवाद होता पाकिस्तानचा ! अनुमाने ८०० पाकिस्तानी विद्यार्थी वुहान आणि ह्युबै भागात शिकत आहेत. ‘आपल्याला विशेष विमानाने परत आणावे’, यासाठी त्यांनी पाकिस्तान सरकारकडे कळकळीची विनंती केली; पण आर्थिक चणचणीमुळे विशेष विमान पाठवणे पाकला परवडेना. त्यामुळे पाकिस्तानने स्वतःच्याच देशातील या विद्यार्थ्यांना वार्यावर सोडले.
३. चीनकडून पाकला ‘चिनी कोरोना विषाणू’ची देणगी !
अपुरे वैद्यकीय मनुष्यबळ, सोयीसुविधांचा अभाव आणि त्यातच डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेमुळे पाकिस्तान या संकटाचा सामना करण्यासाठी समर्थ नाही. चीनच्या देशांतर्गत हालचाली हा चिंतेचा विषय आहे; कारण पाकिस्तानचे चीनशी मोठ्या प्रमाणावर व्यापारी संबंध आहेतच. यानिमित्ताने खूप मोठ्या प्रमाणात चिनी लोकसंख्याही पाकिस्तानात स्थायिक झाली आहे. त्यांच्या चीनमध्ये येण्या-जाण्याच्या प्रवासामुळेही कोरोनाचा धोका आणखीन वाढत आहे. त्यामुळे चिनी कोरोनाने सर्वाधिक त्रस्त देशांमध्ये पाकिस्तानचा क्रमांक लागण्याची शक्यता आहे.
४. इराणमधून पाकिस्तानमध्ये कोरोनाचा प्रवेश !
पाकिस्तानमध्ये सौदी अरेबियातील मक्केला, तसेच इराणमधील मशाद आणि कोमसारख्या ठिकाणी तीर्थयात्रांना जाऊन परत आलेल्या लोकांमुळे चिनी कोरोनाचा प्रसार झाला. पाकिस्तानची अनुमाने ९५९ कि.मी.ची सीमा असून प्रतिवर्षी १ लाखांहून अधिक पाकिस्तानी तीर्थयात्रेसाठी इराणला जातात. पाकिस्तान सरकारचे म्हणणे आहे की, इराण सीमेतूनच पाकिस्तानमध्ये प्रवेश करणार्या नागरिकांमुळे कोरोना विषाणूचा सिंधमध्ये सर्वाधिक प्रादुर्भाव झाला. इराण सीमेवरून पाकिस्तानात दाखल होणार्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. काही काळ त्यांना सीमेवरील अलगीकरण शिबिरात थांबवून नंतर त्यांच्या त्यांच्या प्रांतात सोडण्यात आले, तसेच काही जणांना पाकिस्तानातच कोरोनाचे निदान आणि उपचार यांसाठी स्थानांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला; परंतु पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या कक्षात संशयितांची योग्य प्रकारे कोरोना चाचणी करण्यात आली नाही आणि त्यांच्यावर करण्यात येणार्या उपचारांमध्येही अभाव दिसून आला. सोशल मिडियावर पाकिस्तानातील अलगीकरण कक्षातील काही व्हिडिओही प्रसारित झाले. त्यामध्ये रुग्णांना चक्क तंबूत ठेवले जात असून तिथे स्वच्छतागृह, शौचालये या मूलभूत सुविधेचाही अभाव आहे. काही संशयितांना चक्क सरकारी इमारतींच्या फरशीवर झोपण्याची वेळ आली आहे.
५. कोरोनाचा प्रकोप पाकिस्तानमध्ये वाढण्याची शक्यता !
पाक सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार फेब्रुवारीनंतर पाकिस्तानात ९ लाख ७५ सहस्र ६३४ हून अधिक नागरिकांनी देशात प्रवेश केला. असंरक्षित पश्चिमी सीमा, मरणासन्न अवस्थेत असलेली रुग्णालये आणि मोठ्या प्रमाणात असलेल्या अशिक्षित लोकसंख्येने कोरोनाच्या महामारीत अधिकच भर घातली आहे. मोठ्या प्रमाणात शरणार्थींची ये-जा, शिया तीर्थयात्रींचा इराणमधील प्रवास, वाढती तस्करी आणि कामाच्या शोधार्थ पाकिस्तानात इतर देशांमधून येणारे नागरिक यांसारख्या कारणांमुळे कोरोनाचा प्रकोप पाकिस्तानमध्ये कैकपटीने वाढत आहे. आधीच कंबरडे मोडलेली अर्थव्यवस्था, गगनाला भिडलेली महागाई आणि त्यात जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमती यांमुळे पाकिस्तानी जनतेसमोर जगण्याचे संकटच उभे ठाकले आहे. कोरोनाच्या या भीषण महामारीनंतर चीनमध्येही उद्भवणार्या मंदीच्या लाटेचा तडाखा पाकिस्तानलाही बसण्याची शक्यता आहे.
६. अल्पसंख्यांक हिंदु-ख्रिश्चनांना रांगेतून बाहेर काढल्याची घटना !
पंतप्रधान इम्रान खान यांनी दूरचित्रवाणीवरून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात ‘चीनप्रमाणे ‘कर्फ्यू’ (संचारबंदी) लावण्याचा पाकिस्तान विचारही करू शकत नाही’, असे सांगितले. देशातील २५ टक्क्यांहून अधिक जनता दारिद्य्ररेषेखाली असून त्यांना आर्थिक साहाय्य पुरवणे पाकिस्तानसाठी अवघड आहे. त्यामुळे ‘सोशल डिस्टन्सिंग’चे (एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे) दायित्व इम्रान यांनी जनतेच्याच गळ्यात मारले. पाकिस्तानात मास्क, ‘व्हेंटिलेटर्स’ आणि अन्य सुरक्षा उपकरणे यांचाही प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. संपूर्ण देशात जेमतेम २ सहस्र २०० ‘व्हेंटिलेटर्स’ असून त्यात दीड कोटी लोकसंख्येच्या बलुचिस्तानमध्ये अवघे ४९ ‘व्हेंटिलेटर्स’ आहेत. जर मुसलमानांमध्येच प्रांत आणि पंथ यांनुसार भेदभाव असेल, तर अल्पसंख्यांक हिंदूंची काय कथा ?
कराचीमध्ये गरिबांना रेशन वाटणार्या एका धर्मादाय संस्थेने हिंदूंना रांगेतून बाहेर काढल्याची घटना समोर आली आहे. या परिस्थितीत साहजिकच देशातील सर्व नागरिकांना मग ते कुठल्याही धर्माचे का असेना, पूर्ण साहाय्य मिळणे अपेक्षित आहे; पण सिंध प्रांतातील कराचीत मात्र सरकारी रेशनच्या दुकानावर हिंदु आणि ख्रिश्चन यांना पूर्णपणे साहाय्य नाकारण्यात आले. का ?, तर ते पाकिस्तानचे नागरिक असले, तरी शेवटी सरकारच्या लेखी त्यांचा दर्जा कायमच दुय्यम आहे. अशा कठीण समयी अल्पसंख्यांकांशी अशा प्रकारच्या द्वेषपूर्ण आणि भेदभावजनक वागणुकीविषयी अमेरिकेनेही पाकचे कान उपटले आहेत; पण त्याचा कुठलाही परिणाम पाकिस्तानवर होईल, याची शक्यता नाहीच. त्यामुळे ‘बाहेरील देशांसमोर आर्थिक साहाय्यासाठी पदर पसरणार्या इम्रान खान यांचे साहाय्य केवळ मुसलमानांसाठीच आहे का ?’, असा प्रश्न आहे. खान यांनी कोरोनाशी लढ्याच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांकडून पाकिस्तानवरील कर्जे माफ करण्याची मागणीही केली आहे, तसेच जागतिक आरोग्य संघटनेकडेही अर्थसाहाय्यासाठी पाकिस्तान डोळे लावून आहेच; पण जर ते साहाय्य पाकिस्तानातील सर्व जातीधर्माच्या नागरिकांपर्यंत पोचणारच नसेल तर ? आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानला सढळ हस्ते साहाय्य करण्यापूर्वी ते अल्पसंख्याकांपर्यंतही पोचेल, याची आधी खातरजमा करून मगच त्यांनी ती घोषित करावी. पाकिस्तानकडून या साहाय्याच्या पै न पैचा हिशोब घ्यावा, जेणेकरून ‘या साहाय्यता निधीचा वापर हा देश आतंकवादी कारवायांना बळकटी देण्यासाठी तर करत नाही ना ?’, याची निश्चिती होईल.
७. भारत-नेपाळ आणि भारत-पाकिस्तान सीमा ‘सील’ करा !
पाकिस्तानच्या चुकांपासून भारताने शिकण्यासह देशाच्या सीमा अधिक चांगल्या पद्धतीने ‘सील’ (बंद) करण्याची आवश्यकता आहे. पाकिस्तान-इराण आणि पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमांप्रमाणे भारत-बांगलादेश आणि भारत-नेपाळ सीमा खुल्या आहेत. नेपाळच्या सीमेवरून प्रतिदिन अक्षरशः सहस्रो नागरिकांची नेपाळमधून भारतामध्ये आणि भारतामधून नेपाळमध्ये वेगवेगळ्या कारणांकरता ये-जा होते. ज्याप्रमाणे विमानतळावर चिनी कोरोनाकरता चौकशी केली जाते, तशी जमिनी सीमांवर केली जात नाही. हे अर्थात्च भारताकरता धोक्याचे आहे. यासाठी भारत-नेपाळ, भारत-पाकिस्तान, भारत-बांगलादेश सीमा सील करा. पाकिस्तान सरकार अल्पसंख्यांक धर्मीय आणि पंथीय यांचे रक्षण करू शकत नाही. अशा घटनांमुळे ‘भारतातील नागरिकत्व सुधारणा कायद्याची किती आवश्यकता आहे’, हेच समोर येते.
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.