सामाजिक माध्यमांतून झारखंड पोलिसांचा निषेध
#Hinduphobia_in_Jharkhand या हॅशटॅगद्वारे विरोध
- अशी कारवाई पोलिसांनी कधी अन्य पंथियांची नावे असलेल्या दुकानांवर केली आहे का ?
- झारखंडमध्ये कॉंग्रेसचे समर्थन असलेले झारखंड मुक्ती मोर्च्याचे सरकार असल्यामुळेच ते हिंदूंचा छळ करत आहे, हिंदूंच्या संघटनांवर जाणीवपूर्वक कारवाई करत आहे, हेच यातून लक्षात येते !
जमशेदपूर (झारखंड) : येथे फळांची विक्री करणार्या २ दुकानांवर ‘विश्व हिंदु परिषद अनुमोदित हिंदू फल दुकान’ असे लिहिण्यात आल्याचे एक छायाचित्र सामाजिक माध्यमांवरून प्रसारित झाले होते. त्यानंतर एका व्यक्तीने याची माहिती ट्वीट करून झारखंड पोलिसांना दिल्यावर जमशेदपूर पोलिसांनी त्वरित नोंद घेत या दुकानावरून हे फलक काढले आहे. तसेच कायदेशीर कारवाई केली.
१. पोलीस अधिकारी रंजीत कुमार यांनी येथील कदमा बाजारामध्ये असलेल्या या दुकानावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला असता, त्या वेळी दुकानदारांनी त्यास विरोध केला. विश्व हिंदू परिषद कदमा मंडलचे अध्यक्ष दीपल विश्वास यांना पोलिसांच्या या कारवाईविषयी माहिती मिळाल्यावर ते त्यांच्या समर्थकांसह तेथे पोचले. त्यांनीही पोलिसांना फलक काढण्यास विरोध केला. त्या वेळी त्यांच्यात वाद झाला.
२. तरीही पोलिसांनी कारवाई केली आणि नंतर ट्वीट करत कारवाई केल्याचे सांगितले, तसेच सी.आर्.पी.सी. कलम १०७ अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे, असेही सांगितले.
सामाजिक माध्यमांतून विरोध
पोलिसांनी कारवाई केल्याचे ट्वीट केल्यावर अनेक जणांनी सामाजिक माध्यमांतून पोलिसांच्या या कारवाईस विरोध केला. याविषयी २५ एप्रिलच्या रात्री ट्विटरवर #Hinduphobia_in_Jharkhand असा हॅशटॅग चालू करण्यात आला आणि तो राष्ट्रीय ट्रेंडमध्ये दुसर्या क्रमांकावर होता. याद्वारे अनेकांनी विचारले की, हिंदू फल की दुकान लिहिणे चुकीचे आहे का ? आणि पोलिसांनी कोणत्या कायद्यांतर्गत कारवाई केली आहे ? अशीच कारवाई हलाल किंवा मुस्लिम हॉटेल असे लिहिलेल्या हॉटेलांवर कारवाई केली जाणार आहे का ?, असे प्रश्न उपस्थित केले आहेत.
गुन्हे मागे घेतले नाही, तर भाजप आंदोलन करणार ! – माजी मुख्यमंत्री रघुवर दास
झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांनी या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी म्हटले की, फळ विक्रेत्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई निंदनीय आहे. उपजीविकेसाठी लहानसहान व्यापार करणार्यांना केवळ लांगूलचालनाच्या राजकारणासाठी त्रास देणे बंद करावे. त्यांच्यावर नोंदवलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत. जर हे गुन्हे मागे घेतले नाही, तर याविरोधात भाजप आंदोलन करील.
बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात याहून दुर्दैव ते काय ? – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात केवळ हिंदू फल की दुकान असे लिहलेल्या फळविक्रेत्यावर कारवाई करणे, हे निषेधार्ह आहे. देशात धर्माधारित पद्धतीने हलाल प्रमाणित केलेल्या वस्तू आणि मांसाची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यातून मुसलमानांवर कधी कारवाई झाल्याचे ऐकीवात नाही. तसेच अन्य पंथियांच्या दुकानांवर त्यांच्या श्रद्धास्थानांची नावे असतात, त्यावर आजपर्यंत निधर्मी म्हणवणार्या पोलिसांनी कधी आक्षेप घेतला आहे का ? फळाच्या दुकानाला हिंदू नाव न देण्याला हा काय पाकिस्तान आहे का ? अशा घटनांमधूनच देशात आता हिंदु राष्ट्राचीच आवश्यकता आहे, हेच दिसून येते, अशी प्रतिक्रिया हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी या घटनेवर दिली.