एकदा एका नातेवाइकाशी माझा पुढील संवाद झाला.
१. मराठा हा मराठ्यांमुळेच मागे राहिला !
नातेवाईक : ब्राह्मणांमुळेच बहुजन समाजावर अन्याय झाला. आपला मराठा समाज मागे राहिला. आज सर्व महत्त्वाच्या पदांवर ब्राह्मणच आहेत.
मी : गेली ६५ वर्षे संपूर्ण महाराष्ट्रावर मराठ्यांचेच राज्य आहे ना ? मग का नाही मराठ्यांची प्रगती झाली ? ब्राह्मण उच्च पदावर आहेत, ते त्यांच्या बुद्धीमुळे ! मराठ्यांना शिकायला कुणी अडवले होते का ? मराठा हा मराठ्यांमुळेच मागे राहिला.
नातेवाईक : अफझलखानाच्या बाजूने लढणारे ब्राह्मण होते. संभाजीराजांना ब्राह्मणी मनुवादामध्ये लिहिल्याप्रमाणे मारले गेले. ब्राह्मणांनीच औरंगजेबाला तसे सांगितले. त्यांनी राजांचे शीर भाल्याला लटकवून उत्सव साजरा केला. त्याचे प्रतीक म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो, तो ब्राह्मणांनीच चालू केला. (असे सांगून ते ब्राह्मणांना शिवी देत होते.)
मी : शिवाजी महाराजांचे अर्धे आयुष्य मराठ्यांशी लढण्यात गेले. त्या वेळी मराठ्यांनी साथ दिली असती, तर राजांनी देहली कधीच पादाक्रांत केली असती. महाराजांच्या विरोधात लढणार्या मराठ्यांची नावे घ्यायची म्हटली, तर पाने अपूर्ण पडतील. राहिला विषय संभाजीराजांचा ! त्यांना जिवंत पकडून देणारा त्यांचा सख्खा मेहुणा, येसूबाईचा भाऊ गणोजी शिर्के हा कोणत्या जातीचा होता ? तो मराठाच होता ना ? शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ ब्राह्मण होते, तर ब्राह्मणांना नेमणार्या महाराजांपेक्षा तुम्ही बिग्रेडवाले बुद्धीमान झालात का ?
२. संभाजीराजांच्या वधाचा सूड उगवल्यानंतर मराठ्यांनी गुढीपाडवा साजरा केला !
संभाजीराजांच्या वधाचा सूड उगवण्यासाठी मराठ्यांनी सतत ४ वर्षे संघर्ष केला. तोपर्यंत त्यांनी गुढीपाडवा साजरा केला नव्हता; मात्र सूड उगवल्यानंतर त्यांनी गुढीपाडवा साजरा करायला आरंभ केला. वधाचा सूड उगवून गुढीपाडवा साजरा करणार्या त्या वेळच्या निधड्या छातीच्या मराठ्यांपेक्षा आताचे मराठे हुशार म्हणायचे का ? गुढीपाडवा हा रामायण काळापासून आहे. इतिहास व्यवस्थित वाचा; पण एक हिंदू म्हणून मराठा म्हणून नव्हे !
३. शिवाजी महाराज जर निधर्मी होते, तर मुसलमान झालेल्या नेताजी पालकरांना त्यांनी हिंदु का बनवले ?
नातेवाईक : आपला धर्म हिंदु नाही. आपण सिंधु संस्कृतीवाले आहोत. मुसलमान आपले शत्रू नाहीत. ते आपलेच आहेत. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. त्याला हिंदवी स्वराज्य असे म्हणणे चूक आहे. ब्राह्मणांचे ऐकणे बंद करावे. ते आपल्यावरच पोट भरतात.
मी : आपली जात आधी आली कि धर्म ? आपण मराठा म्हणून जन्मलो आहोत कि हिंदु म्हणून ? शिवाजी महाराज जर निधर्मी होते, तर मुसलमान झालेल्या नेताजी पालकरांना त्यांनी हिंदु का बनवले ? राहू द्यायचे होते त्यांना मुसलमान ! महाराजांनी तर नेताजी पालकरांच्या मुलाला आपली मुलगी दिली होती.
प्रत्येक जातीत चांगले-वाईट लोक असतात. त्या वेळी जर काही ब्राह्मण चुकले असतील, तर तसे मराठेही चुकले आहेत. स्वराज्यासाठी आणि स्वराज्याच्या विरोधात लढणार्यांमध्ये मराठेही होते आणि ब्राह्मणही होते. एक आधुनिक वैद्य चुकला; म्हणून संपूर्ण वैद्यकशास्त्र बंद करणे जितके मूर्खपणाचे आहे, तितकेच हे मूर्खपणाचे आहे. जो जातीवंत मराठा आहे, कुलीन मराठा आहे, तो मुसलमानांची बाजू घेणार नाही. तो हिंदु धर्माचीच बाजू घेणार.
४. आपल्या पूर्वजांचा धर्मासाठी प्राण अर्पण करण्याचा इतिहास आहे !
एकीकडे तुम्ही म्हणता की, या सत्तेच्या लढाया होत्या. शिवाजी महाराज मुसलमानविरोधक नव्हते; पण त्याच वेळी तुम्हाला अफझलखानासमवेतच्या कृष्णाजी भास्करची जात मात्र दिसते. इतिहास सांगतो की, हे धर्मयुद्ध होते. संभाजीराजांनी इस्लाम स्वीकारावा, यासाठी त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करणारा औरंगजेब हा धर्मयुद्धच करत होता. इतके अत्याचार होऊनही संभाजीराजांनी हिंदु धर्म सोडला नाही. जर सत्तेसाठी लढाया असत्या, तर महाराजांनी तडजोड केली असती. आपल्या पूर्वजांचा धर्मासाठी प्राण अर्पण करण्याचा इतिहास आहे. त्याची आठवण ठेवून एक हिंदु मराठा म्हणून माझी सर्व मराठ्यांना विनंती आहे की, आपल्या निधड्या छातीच्या पूर्वजांप्रमाणेच हिंदु धर्माची बाजू सांभाळावी. पद, पक्ष आणि संप्रदाय यांमध्ये न अडकता धर्मरक्षणासाठी पुढे यावे.
– श्री. विजय पाटील, जळगाव (१३.१२.२०१४) (संदर्भ : दैनिक सनातन प्रभात)