Menu Close

वाधवान आणि व्यवस्था !

संपादकीय

‘दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड’चे (डी.एफ्.एच्.एल्.चे) प्रमुख कपिल वाधवान आणि त्यांचा भाऊ धीरज वाधवान यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने येस बँक घोटाळ्याच्या प्रकरणी अटक केली आहे. भारतात दळणवळण बंदी असतांनाही वाधवान कुटुंबियांनी नियमांचे उल्लंघन करत खंडाळा ते महाबळेश्‍वर असा प्रवास केला होता. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठल्यावर अनेक धक्कादायक गोष्टी पुढे आल्या. राज्याचे मुख्य सचिव (कायदा आणि सुव्यवस्था) अमिताभ गुप्ता यांनी वाधवान कुटुंबियांना प्रवास करण्याची लेखी अनुमती दिल्याचे पुढे आले. आयपीएस् अधिकारी असणारे गुप्ता यांनी स्वतःच्या अधिकारक्षेत्राच्या बाहेर जाऊन ही अनुमती दिल्याचे पुढे येत आहे. यावरून पुन्हा एकदा कायदे, नियम आणि अटी हे सर्वसामान्य नागरिकांसाठीच असतात, वाधवान यांच्यासारख्या धनाढ्य लोकांच्या ते खीजगणीतही नसतात, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. वाधवान आणि त्यांच्या २३ जणांच्या कुटुंबियांवर असे कोणते संकट कोसळले होते, ज्यामुळे त्यांना खंडाळ्यावरून महाबळेश्‍वरला प्रवास करावा लागला ? स्वतःचे नोकर, चाकर, स्वयंपाकी, अंगरक्षक आदी लवाजम्यासह हे वाधवान कुटुंबीय सहलीसाठी फिरत होते. अशांना मात्र तात्काळ आपत्कालीन परिस्थितीच्या नावाखाली या प्रवासाला अनुमती देण्यात आली. पालघर येथे स्वतःच्या गुरूंच्या अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या दोन साधूंना जमाव मारहाण करत असतांनाही पोलिसांनी त्यांना मरण्यासाठी जमावाच्या हवाली केले. साधूंच्या आयुष्यातील एवढ्या महत्त्वाच्या कारणासाठी ते प्रवास करत असतांना जमावाने अडवल्यावर त्यांना अभय देण्याऐवजी पोलिसांनी त्यांना मारतांना बघ्याची भूमिका घेतली. दुसरे म्हणजे महाराष्ट्रात असे अनेक परप्रांतीय कामगार आहेत, जे दळणवळण बंदीमुळे घरी जाण्यासाठी आसुसले आहेत; मात्र त्यांना ‘आहे, तेथे थांबा’, असे सांगत प्रशासन त्यांच्यावर कडक दृष्टी ठेवून आहे. याउलट दळणवळण बंदीच्या काळात वाधवान कुटुंबीय मौजमजा करण्यासाठी बाहेर पडले असतांना त्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी राज्यातील सचिव स्तरावरील एक आयपीएस् अधिकारी जातीने त्यांच्यासाठी पत्र लिहून त्यांना अभय देतो. असे भेदभाव करणारे प्रशासनातील घटक, हीच व्यवस्थेतील मोठी त्रुटी आहे. जोपर्यंत व्यवस्थेत ‘वाधवानप्रेमी’ अस्तित्वात आहेत, तोपर्यंत ती जनताभिमुख होणार नाही.

घोटाळेबहाद्दरांविषयी कणव !

‘गुन्हेगारांना कायद्याचे भय राहिले नाही’, असे वारंवार सांगितले जाते. त्याची प्रचीती वाधवान प्रकरणातून समोर येते. डी.एफ्.एच्.एल्.चे वाधवान बंधू हे काही सचोटीने व्यवहार करणारे उद्योजक नाहीत. त्यांचे नाव प्रथम पुढे आले, ते येस बँकेच्या घोटाळ्याच्या प्रकरणात. याच बँकेने कपिल वाधवान यांना ३ सहस्र ७०० कोटी रुपयांचे नियमबाह्य कर्ज दिले होते. त्या प्रकरणात चौकशी चालू आहे. कपिल वाधवान यांचे ‘कर्तृत्व’ एवढ्यावरच थांबत नाही. कुख्यात गुंड इक्बाल मिर्ची याची मालमत्ता वाधवान कुटुंबियांनी विकत घेतली होती. त्यानंतर या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने वाधवान कुटुंबियांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करून त्यांची चौकशी आरंभली होती. या प्रकरणात कपिल वाधवान यांना अटकही झाली होती. वाधवान कुटुंबियांची पार्श्‍वभूमी पहाता त्यांची जागा एव्हाना कारागृहात हवी होती; मात्र या कुटुंबातील सदस्य मुक्तपणे समाजात संचार करत आहेत आणि दळणवळण बंदीच्या काळात सहलीचा आनंद घेत आहेत.

खंडाळा ते महाबळेश्‍वर असा प्रवास करून कपिल वाधवान यांनी केवळ दळणवळण बंदीचे उल्लंघन केले नाही, तर न्यायालयाने त्यांना घोटाळ्याच्या प्रकरणात ज्या अटींवर जामीन दिला होता, त्या अटी-शर्थींचेही उल्लंघन केले. एवढेच नव्हे, तर येस बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर यांना अटक केल्यानंतर कपिल वाधवान यांना अंमलबजावणी संचालनालयाने चौकशीसाठी समन्स धाडले होते; मात्र वाधवान यांनी याला केराची टोपली दाखवली. न्यायालयाचाही अवमान करण्याचे दुःसाहस अशांमध्ये कसे येते ? एका सामान्य आरोपीने न्यायालयाच्या अटी-शर्थींचा भंग केल्यास पोलीस तात्काळ कारवाई करतात. येथे तर आयपीएस् दर्जाचे अधिकारीच वाधवान यांच्यासारख्या गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांच्या दिमतीसाठी बांधले गेले आहेत. दळणवळण बंदीच्या काळात वाधवान यांच्या सहलीविषयी बोभाटा झाल्यामुळे सुरक्षायंत्रणा कामाला लागली. जर याविषयी काही बोललेच गेले नसते, तर एव्हाना वाधवान कुटुंबियांनी दळणवळण बंदीच्या काळात महाराष्ट्रातील सर्वच थंड हवेच्या ठिकाणांना भेटी दिल्या असत्या.

घोटाळेबहाद्दरांवर कारवाई हवी !

सध्या दळणवळण बंदीमुळे सरकारी तिजोरीवर ताण आला आहे. एका अहवालानुसार भारताला ९ लाख कोटी रुपयांचा फटका बसल्याचेही समोर आले आहे. अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी केंद्र सरकार विविध पावले उचलेल, यात वाद नाही; मात्र त्यासह वाधवान, ९ सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा करणारे विजय मल्ल्या, १८ सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा करणारे निरव मोदी यांच्यासारख्या घोटाळेबहाद्दरांकडून भ्रष्टाचाराचा पैसा वसूल करून तो सरकारी तिजोरीत जमा करणे आवश्यक आहे. आतापर्यंत देशात ७२ सहस्र कोटी रुपयांचे बँक घोटाळे झाल्याचेही उघडकीस आले होते. ‘थेंबे थेंबे तळे साचे’, त्याप्रमाणे या घोटाळेबहाद्दरांकडून पैसे वसूल केल्यास अर्थव्यवस्थेला उभारी येण्यास साहाय्य होईल. ‘असे होईल का ?’, असाही प्रश्‍न आहे; कारण मल्ल्या, निरव मोदी हे व्यवस्थेला ठेंगा दाखवून विदेशात पसार झाले. वाधवानही असे करणार नाहीत कशावरून ? या पूर्ण प्रकरणात वाधवान कुटुंबीय ज्या निर्धास्तपणे वावरले, त्यावरून तरी त्यांना ‘आपण यातून बाहेर पडू’ याची पूर्ण खात्री आहे, असेच वाटते. त्यामुळे आताही जरी या दोघांना अटक झाली असली, तरी त्यांच्यावर कारवाई होऊन त्यांना अद्दल घडण्याविषयी जनता साशंक आहे !

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *