आखाती देशांतील सामाजिक माध्यमांमधून भारतात मुसलमानांचा छळ होत आहे असा अपप्रचार
नवी देहली : भारताचे आखाती देशांशी असलेले चांगले संबंध बिघडवण्यासाठी काही भारतविरोधी देश आखाती देशांतील सामाजिक माध्यमांना हाताशी धरून भारताच्या विरोधात प्रचार करत आहेत. या सामाजिक माध्यमांनी भारतात मुसलमानांचा छळ होत आहे अशा आशयाचा अपप्रचार नुकताच केला. हा अपप्रसार कुवेतने झिडकारला. यापूर्वी असा भारतविरोधी प्रचार सौदी अरेबिया, कतार आणि ओमान या आखाती देशांनीही झिडकारला आहे.
कुवेती सरकारच्या निर्णयाचे भारताकडून कौतुक करण्यात आले आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देतांना भारतीय परराष्ट्र खात्याचे अधिकृत प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले, कुवेतमध्ये अधिकृत नसलेल्या सामाजिक माध्यमांतील एका खात्यावर आम्ही भारताविषयी काही संदर्भ पाहिले. त्यात भारतावर अल्पसंख्यांकावरून टीका करण्यात आली होती. कुवेत सरकारने आम्हाला असे आश्वासन दिले आहे की, ते भारताशी मैत्रीपूर्ण संबंधांसाठी वचनबद्ध आहेत, तसेच भारताच्या अंतर्गत व्यवहारात कोणत्याही हस्तक्षेपाचे समर्थन करणार नाही.
कुवेतच्या विनंतीवरून भारताने नुकताच कोरोनविरुद्धच्या लढ्यात त्या देशाला साहाय्य करण्यासाठी तेथे रॅपिड रिस्पॉन्स पथक पाठवले होते.
कुवेत येथे २ आठवड्यांच्या मुक्कामाच्या वेळी या पथकाने पीडित व्यक्तींची चाचणी करणे, त्यांच्यावर उपचार करणे, तसेच त्यांच्या कर्मचार्यांना प्रशिक्षण देणे, असे मोलाचे वैद्यकीय साहाय्य केले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात