संपूर्ण विश्वात कोरोनाचे भयंकर थैमान चालू आहे. रुग्णसंख्या तर प्रतिदिन चढता आलेखच गाठत आहे. ‘विकसित’ देश म्हणवल्या जाणार्या अमेरिकेत तर ही परिस्थिती दिवसेंदिवस आणखीनच भयंकर होत चालली आहे. कोरोनाबाधित जीवन-मरणाच्या दारात उभे आहेत. त्याही पुढे जाऊन त्यांच्यावर उपचार करणार्या आधुनिक वैद्यांची होणारी ससेहोलपट अतिशय हृदयद्रावक अशी आहे. कोरोनापेक्षाही आधुनिक वैद्यांवर ओढवलेले हे संकट आणखीन भीषण आणि तितकेच भयानकही आहे. अमेरिकेतील एका आधुनिक वैद्य महिलेच्या संदर्भातील एक अनुभव तिच्या वडिलांनी कथन केला. ते सांगतात, ‘एकूण १७० रुग्णांवर सतत उपचार करून आधुनिक वैद्य असलेल्या माझ्या मुलीचे मानसिक आरोग्य बिघडले होते. प्रत्यक्षात ती अतीदक्षता विभागाची प्रमुख होती. प्रारंभी तिला कोरोना झाला, त्यातून ती बाहेरही पडली; पण नंतर ती निराशेच्या गर्तेत गेली होती. यातूनच तिने आत्महत्येसारखेे टोकाचे पाऊल उचलले.’ अमेरिकेत एका परिचारिकेच्या मैत्रिणीने एका व्हिडिओच्या माध्यमातून तिचा अनुभव सांगितला. तिने म्हटले, ‘अमेरिकेतील रुग्णालयांतील प्रकार एखाद्या भयपटासारखा आहे. येथे रुग्णांवर गांभीर्याने उपचार केले जात नाहीत. उलट रुग्णांचा जीवच घेतला जात आहे. त्यामुळे आपापल्या रुग्णांची तुम्हीच काळजी घ्या.’ या सर्व घटना मन हेलावून टाकणार्या आहेत. ही स्थिती पहाता रुग्णांवर उपचार करणारे आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांचेच जर मानसिक स्थैर्य बिघडले, तर निर्माण होणार्या महाभयंकर संकटाला आपण कसे सामोरे जाणार ?
प्रतिदिनची लढाई
महासत्ता असणार्या अमेरिकेतच नव्हे, तर अन्य देशांमध्येही अशा प्रकारे दु:स्थिती ओढवलेली आहे. मग भारत तरी त्यातून कसा सुटेल ? भारतात अनेक रुग्णालये कोरोनाबाधितांवर उपचार करत आहेत. कोरोनाबाधित बरे होऊन घरीही परतत आहेत; पण या उपचारांमागील भीषण वास्तव कुणीही भीतीपोटी उघड करत नाही. त्यामुळे आधुनिक वैद्य, पारिचारिका किंवा वॉर्डबॉय यांनाच निष्कारण त्रास सोसावा लागत आहे. एका शासकीय रुग्णालयातील कनिष्ठ निवासी आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘मी गेले १ मास प्रतिदिन २५० कोरोनाबाधितांवर उपचार करत होतो; पण या काळात आम्हाला भयंकर शारीरिक आणि मानसिक विवंचनांना सामोरे जावे लागले. ‘पीपीई किट’ घातल्यानंतर ते सांभाळून संपूर्ण परिस्थितीचा सामना करणे, म्हणजे आमच्यासाठी एक प्रकारे युद्धच असायचे. किट घातल्यावर किमान ७ ते १० घंट्यांपर्यंत आम्हाला खाणे तर सोडाच, साधे पाणीही पिता यायचे नाही. कर्तव्यावर असतांना नैसर्गिक विधींसाठी जाणेही अशक्य असायचे. तरुण असलेल्यांनी हे सर्व कसेतरी सहन केले; पण आमच्यासमवेत वयस्कर किंवा मधुमेह, उच्च रक्तदाब अशा व्याधींनी ग्रस्त असलेले कर्मचारी, आधुनिक वैद्य किंवा परिचारिकाही होत्या. त्यांच्या त्रासाची कल्पनाही करू शकत नाही. वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याने किटच्या आत आमची दिवसभर घामाची अंघोळच झालेली असायची. श्वास घेता न येणे, गुदमरल्यासारखे होणे, डोकेदुखी यांसह अन्य समस्यांचाही आम्हाला प्रतिदिन सामना करावा लागत होता.’’ ही भयंकर स्थिती ऐकून डोके आणि मन सुन्न होते. प्रत्येकाच्याच मनात विलक्षण भीती आहे. आधुनिक वैद्य तर ताणात राहूनच रुग्णांवर उपचार करत आहेत. ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करायचा आणि जीवन-मृत्यूची लढाई लढत रहायची’, अशी आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांची स्थिती झाली आहे. काही ठिकाणी तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी उपलब्ध नसल्याने आधुनिक वैद्यांनाच रुग्णांना सलाईन लावणे, नैसर्गिक विधींसाठी भांडे उपलब्ध करून देणे, त्यांच्या चादरी-कपडे पालटणे इत्यादी कृती उपचारांच्या जोडीला कराव्या लागतात. हे अल्प म्हणून कि काय, रुग्णालयात कोरोनाबाधित म्हणून भरती होणार्या धर्मांधांनी आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांच्या नाकीनऊ आणले. प्रत्येक वेळी मनावर सतत ताण घेऊन अशा रुग्णांवर उपचार करावे लागतात. ते कधी आक्रमण करतील किंवा अश्लीलतेची परिसीमा गाठतील, हे सांगता येत नाही. काही ठिकाणी तर आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांना रुग्णांच्या शिव्याशापालाही सामोरे जावे लागते. या सर्वच प्रकाराची वरिष्ठांकडे तक्रार केल्यास ‘वेतन बुडेल कि काय ?’ किंवा ‘आपल्या निवृत्ती वेतनावर परिणाम झाला तर…?’ अशी भीती मनात असते. त्यामुळे कुणीही त्याविषयी ‘ब्र’ काढत नाही. आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांचीही प्रतिदिन तारेवरची कसरत होत असल्याने त्यातून होणार्या उद्वेगाचा परिणाम चिडचिडेपणा, राग येणे, त्रस्तता अशा स्वरूपात व्यक्त होतो. या तणावातून मुक्ती मिळावी, तसेच आपत्कालीन परिस्थितीत मनोबल वाढावे, यासाठी आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांनी देवाची आराधना अन् साधना करायला हवी. हाच या परिस्थितीवरील एकमेव उपाय आहे.
नागरिक आणि रुग्ण यांचे कर्तव्य
आधुनिक वैद्यांच्या माध्यमातून रुग्णांच्या मनाला उभारी येते. आरोग्यसेविका म्हणून सर्व कर्तव्ये दायित्वाने पार पाडणार्या परिचारिकाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकानेच त्यांना समजून आणि सांभाळूनही घ्यायला हवे; मात्र दुर्दैव म्हणजे आज तसे होत नाही. जिवांना जीव देणारेच उपेक्षित म्हणून गणले जात आहेत. शासनाकडूनही ही दु:स्थिती पालटण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे अन्यथा अमेरिकेप्रमाणे भारतातही आधुनिक वैद्यांनी टोकाचे पाऊल उचलल्यास नवल वाटणार नाही. कोरोनाच्या संकटाचा सामना करतांना वैद्यकीय क्षेत्रातील आधारस्तंभ डळमळीत होऊ नयेत, यासाठी प्रयत्न करणे, हे नागरिक आणि रुग्ण यांचे कर्तव्य आहे. ‘जीवो जीवस्य जीवनम् ।’ याचा अर्थ ‘प्रत्येक जीव दुसर्या अनेक जिवांवर स्वतःच्या अस्तित्वासाठी निर्भर असतो’, याचे भान प्रत्येकानेच बाळगावे. तसे झाल्यासच कोरोनाच्या संकटाला आपण लवकरात लवकर आणि सक्षमरित्या परतवून लावू शकतो, हे निश्चित !