वॉशिंग्टन (अमेरिका) : चीनच्या वुहान येथील इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या प्रयोगशाळेतच कोरोना विषाणूची निर्मिती झाली, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधील पत्रकार परिषदेत केला. या वेळी त्यांना पत्रकारांनी याचे पुरावे आहेत का ?, अशी विचारणा केल्यावर त्यांनी हो, मी पुरावे पाहिले आहेत; मात्र त्याविषयी मी तुम्हाला सांगू शकत नाही असे उत्तर दिले. या प्रयोगशाळेने तिच्यावर याविषयी होत असलेले आरोप यापूर्वीच फेटाळून लावले आहेत. वुहानमधील मांस बाजारातून कोरोना विषाणूचा प्रसार झाला, तर प्राण्यांमधून हा आजार माणसांमध्ये आला, असे काही तज्ञांचे मत आहे. या प्रयोगशाळेत काम करणार्या कर्मचार्यांकडून अपघाताने कोरोना विषाणू पसरला असावा, असे वृत्त काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील फॉक्स न्यूजने दिले होते.
(सौजन्य : Live Hindustan)
जागतिक आरोग्य संघटनेला लाज वाटली पाहिजे ! – ट्रम्प यांची टीका
जागतिक आरोग्य संघटना ही चीनचीजनसंपर्क यंत्रणा असल्याप्रमाणे काम करत आहे. अमेरिकेकडून जागतिक आरोग्य संघटनेला वर्षाला ५० कोटी डॉलरचा निधी दिला जातो, तर चीनकडून वर्षाला केवळ ३८ लाख डॉलर्स दिले जातात. लोक भयंकर चुका करतात, तेव्हा त्यांनी कुठल्याही सबबी किंवा कारणे देऊ नयेत. त्या चुकांमुळे लाखो लोक प्राण गमावत आहेत. माझ्या मते जागतिक आरोग्य संघटनेला स्वत:ची लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत डोनाल्ड ट्रम्प यांनी या संघटनेवर टीका केली.
या संघटनेने कोरोनाचा होणारा प्रसार आणि त्याचे परिणाम वेळीच जगाच्या लक्षात आणून दिले नाहीत, असा ट्रम्प यांचा आरोप आहे. अमेरिकेने या संघटनेला देण्यात येणारा निधी रोखला आहे. कोरोनाच्या संकटात या संघटनेने नेमके काय काम केले ? तिची भूमिका काय होती ? त्याची चौकशी ट्रम्प शासनाने चालू केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात