Menu Close

पाकच्या विरोधात निर्णायक लढा !

संपूर्ण विश्‍व कोरोनाच्या संकटाशी सामना करत असतांना भुकेकंगाल पाकिस्तानचे भारतद्वेषाचे शेपूट मात्र काश्मीरमध्ये वळवळत आहे. गेल्या ४ दिवसांत काश्मीर परिसरात भारतीय सैन्य आणि आतंकवादी यांच्यामध्ये ५ चकमकी झाल्या. अजूनही त्या चालू आहेत. यामध्ये जसे आतंकवादी मारले गेले, तसे काही भारतीय सैनिकांनाही वीरमरण आले. पाकिस्तानी सैन्य भारताचे लचके तोडू पहात आहे, तसे पाकिस्तानचे सर्वोच्च न्यायालयही काहीतरी फतवे सोडून भारताच्या अंतर्गत व्यवस्थेमध्ये ढवळाढवळ करू पहात आहे. नुकतेच पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने गिलगिट-बाल्टिस्तान या क्षेत्रांत निवडणुका घेण्याचा आदेश दिला. त्यावर भारताने त्वरित आक्षेप घेऊन पाकिस्तानला चेतावणी दिली, तसेच पाकव्याप्त काश्मीर रिकामे करण्यास सांगितले. आज भारत कोरोनाच्या युद्धाला प्राथमिकता देऊन ते लढत आहे; पण त्याच वेळी आतंकवादरूपी विषाणू डोके वर काढत असेल, तर भारताने त्या विषाणूवर असलेली ‘सर्जिकल स्ट्राईक’ किंवा तत्सम धडक कारवाईरूपी लस टोचायला हवी.

पाकिस्तानला मिळणारी भीक थांबवा

भारतद्वेष हाच पाकिस्तानच्या जन्मापासूनचा एकमेव ‘अजेंडा’ राहिलेला आहे. विकासाच्या नावाखाली पाकिस्तानने श्रीमंत राष्ट्रांकडून मिळालेले पैसे आतंकवादाची पाळेमुळे घट्ट करण्यासाठीच वापरले. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असून आणि ‘फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’च्या निशाण्यावर येऊनही पाकिस्तानला शहाणपण आले नाही. सध्या कोरोनाच्या संकटामुळे पाकिस्तान अक्षरशः कंगाल होण्याच्या मार्गावर आला आहे. तेथे कोरोनाबाधितांवर होणारे उपचार आणि पुरवल्या जाणार्‍या सुविधाही अत्यंत निकृष्ट आहेत. ‘दळणवळण बंदी’ लागू करता येत नसल्याचे सांगत पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी श्रीमंत देशांकडे पैशांसाठी पुन्हा झोळी पसरली. पाकिस्तानला आर्थिक साहाय्य मिळाले नाही, तर पाकिस्तानमध्ये अराजक माजेल. अशी सगळी परिस्थिती असतांनाही भारतामध्ये आतंकवादी कारवाया करण्याची पाकिस्तानची खुमखुमी काही अल्प होत नाही. अशा वेळी भारताने पाकिस्तानच्या कुरापती आंतरराष्ट्रीय व्यासपिठांवर मांडून पाकिस्तानला कोणी भीक घालणारच असेल, तर ती थांबवायला हवी. त्याच जोडीला पाकिस्तानला शाब्दिक चेतावण्या देण्यापेक्षाही धडक कृती करून पाकिस्तान नावाची डोकेदुखी कायमची संपवायला हवी. काश्मीरमध्ये २ मे या दिवशी हंदवाडा येथे झालेल्या चकमकीत २१ राष्ट्रीय रायफल्स बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल आशुतोष शर्मा, मेजर अनुज सूद यांच्यासह ५ सैनिकांना हौतात्म्य पत्करावे लागले. त्यानंतर ४ मे या दिवशी पुन्हा केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सी.आर्.पी.एफ्.) तुकडीवर झालेल्या आक्रमणात भारताचे ३ सैनिक मारले गेले. या आणि आतापर्यंत हुतात्मा झालेल्या असंख्य सैनिकांना खरी श्रद्धांजली अर्पण करायची असेल, तर पाकिस्तानला धडा शिकवलाच गेला पाहिजे.

या वर्षाच्या आरंभी भारतीय सैन्यदलप्रमुख मुकुंद नरवणे यांनी पदभार स्वीकारतांना भारतीय सैन्याचा दुर्दम्य आशावाद व्यक्त केला होता. ‘आदेश मिळतांच पाकव्याप्त काश्मीर कह्यात घेऊ’, असे वक्तव्य त्यांनी केले होते. आताच्या पाकिस्तानच्या कुरापतींविषयी भाष्य करतांनाही त्यांनी ‘जोपर्यंत पाकिस्तान सीमेपलीकडून आतंकवादाला प्रोत्साहन देण्याचे थांबवत नाही, तोपर्यंत त्यांना कठोर प्रत्युत्तर मिळतच राहील’, असे सांगितले. युद्धात केवळ प्रत्युत्तर देऊन चालत नाही, तर प्रसंगी आक्रमणाचा पवित्राही घ्यावा लागतो, हे लक्षात घ्यायला हवे. कोरोनाचे देशव्यापी संकट असतांना युद्धाची भाषा किंवा प्रत्यक्ष युद्ध परवडेल का ?, असे म्हणत काही महाभागांना पाकचा पुळका येऊ शकतो; पण अशा प्रकारच्या ‘ब्लॅकमेलिंग’ला सरकारने भीक घालण्याची आवश्यकता नाही. कोरोनाच्या वैश्‍विक संकटाशी सामना करत असतांना भारताला बेरोजगारी, महागाई यांच्याशी लढत अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचे मोठे आव्हान असणार आहे. कोरोना शांत होताच व्यापारयुद्ध आणि प्रत्यक्ष तिसरे महायुद्ध यांचा भडका उडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अमेरिकेने त्याविषयी सुतोवाच केलेच आहे. भारतालाही इच्छा असो वा नसो, या युद्धामध्ये  सहभागी व्हावेच लागणार आहे. अशा वेळी पाकिस्तानरूपी जखम किती वेळ भळभळत ठेवायची ? गेल्या ७० वर्षांत भारतातील सर्वपक्षीय सरकारांना पाकिस्तानच्या कारवायांवर अंकुश ठेवता आला नाही. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सत्तेत आल्यानंतर पाकिस्तानवर एक-दोन ‘सर्जिकल स्ट्राईक’ केले गेले आणि जम्मू-काश्मीरविषयी ठोस धोरणात्मक निर्णय घेतले गेले. असे असले, तरी त्यामुळे पाकिस्तान वठणीवर आल्याचे चित्र नाही. ‘मोठे प्रश्‍न हाताळण्यापूर्वी छोटे छोटे प्रश्‍न हातावेगळे करून टाकावेत’, असा व्यवस्थापनशास्त्राचा एक नियम आहे. भविष्यात भारताला मोठ्या समस्यांवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. अशा वेळी पाकिस्तानची भुणभुण कायमची संपवून टाकणे, हेच हितावह ठरेल.

चोहोबाजूंनी इस्लामी राष्ट्रांनी वेढले असूनही आज इस्रायल ताठपणे उभे आहे. याला इस्रायलचे आतंकवादाच्या विरोधातील कठोर धोरण कारणीभूत आहे. भारताने ‘आतंकवादाच्या विरोधात ‘शून्य सहनशीलते’चे धोरण राबवले जाईल,’ असे सांगितले आहे. या धोरणाचा अंतिम दृश्य परिणाम पहाण्याची भारतवासियांना इच्छा आहे. अस्तित्व टिकवून पुढे मार्गक्रमण करायचे असेल, तर एकाच वेळी अनेक आघाड्या सांभाळणे अनिवार्य ठरते. इतिहासकालीन लढायांतूनही हेच दिसून येते. त्यामुळेच कोरोनाशी लढाई चालू असतांना पाकिस्तानशी युद्ध कशाला ?, हे प्रश्‍न गैरलागू ठरतात; कारण शत्रू, तृण आणि अग्नि हे कायमचे नष्ट केले नाहीत, तर ते पुनःपुन्हा डोके वर काढतात.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *