कोरोनाचा प्रादुर्भाव न्यून झाला, तरी पूर्वीप्रमाणे सर्व काही सुरळीत होण्याची शक्यता अल्पच !
जिनिव्हा (स्वित्झर्लंड) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांनी घोषित केलेली दळणवळण बंदी आता शिथील केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ही बंदी आताच सरसकट मागे घेतल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊन नंतर ती पुन्हा लागू करावी लागेल, अशी चेतावणी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस घेबरेयेसस यांनी दिली.
घेबरेयेसस पुढे म्हणाले, aसर्व देशांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. दळणवळण बंदी सरसकट शिथील न करता ती टप्प्याटप्प्याने शिथील करण्याची आवश्यकता आहे. निर्बंध शिथील झाल्यानंतरही लोकांवर लक्ष ठेवण्याची आवश्यकता असून आरोग्य यंत्रणाही सतर्क असल्या पाहिजे. जरी कोरोनाचा प्रादुर्भाव न्यून झाला, तरी पूर्वीप्रमाणे सर्व काही सुरळीत होण्याची शक्यता अल्पच आहे. लोकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही; परंतु त्याचवेळी सिद्ध रहाणे आवश्यक आहे. जगभरातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची ही चांगली संधी आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून आरोग्य यंत्रणेकडे दुर्लक्षच करण्यात आले आहे. आता आरोग्य सेवेत गुंतवणूक केली, तरच आपण कोरोनाच्या संकटातून काही तरी शिकलो, असे होईल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात