कोरोना विषाणूने संपूर्ण विश्वात धुमाकूळ घातला आहे. त्याच्यावर नियंत्रण मिळवणे विश्वातील सर्वच देशांसाठी अशक्यप्राय झाले आहे. त्यामुळे अनेक देश कोरोनावरील लस शोधण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. असे असतांना लस शोधण्याच्या शर्यतीत चीन हा देश सहभागी न झाल्यास नवल ते काय ? वुहान प्रांतात निर्माण झालेला कोरोना आता सगळीकडे मोठ्या प्रमाणात पसरल्याने सर्वच देशांनी चीनवर सडकून टीका केली होती. शेवटी रुग्णांना वाचवण्याच्या हेतूने नव्हे, तर असंख्य टीकांपासून स्वतःला वाचवण्यासाठी चीनमध्ये लस शोधण्याचे काम वेगाने चालू आहे. चीनमध्ये ४ आस्थापनांनी कोरोनाच्या लसीविषयी मानवी चाचण्या घेण्यास प्रारंभ केला आहे. ‘या चाचण्यांची संख्या अमेरिका आणि ब्रिटन या देशांपेक्षाही अधिक आहे’, असे म्हटले जात आहे. प्रत्यक्षात खराब प्रतीची गुणवत्ता आणि अन्य वादग्रस्त कारणे यांमुळे लसीच्या चाचण्या करणारी ही आस्थापने आधीपासूनच आरोपांच्या फेर्यात अडकली आहेत. मग ‘चीनमध्ये निर्माण झालेली लस उच्च प्रतीची असेल का ?’, यावर सर्वांकडूनच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. चीनमधील ‘गेट्स फाउंडेशन’चे रे यिप म्हणाले की, चीनच्याच नागरिकांना आपल्या देशात निर्माण होणार्या लसीवर विश्वास नाही. यामुळे भविष्यात अडचणी येऊ शकतात. हे जर असे असेल, तर फारच भयानक ठरेल. चीनमध्ये २ वर्षांपूर्वी लाखो मुलांना काही व्याधींसाठी चुकीच्या लसी देण्यात आल्या होत्या. तेव्हा पालकांनी त्याला विरोध केला होता. अशा प्रकारच्या २ प्रकरणांमध्ये तेथील वुहान इन्स्टिट्यूटला ७१ सहस्र ५०० डॉलर (भारतीय चलनानुसार ५४ लाख रुपये) संबंधित पीडितांना देण्यास सांगण्यात आले होते. या आस्थापनाच्या अधिकार्यांनी लस खरेदीसाठी स्थानिक प्रशासनाला लाचही दिली होती. अन्य आस्थापनांकडूनही कोरोनावरील लसीच्या चाचणीच्या वेळी अनैसर्गिक पद्धती वापरण्यात आल्याचे आरोप केले जात आहेत. लस बनवण्यासाठी येणार्या व्ययाविषयी चीनकडून माहिती देण्यात आलेली नाही. ‘प्रत्येक वेळी राजकीय आधार घेऊन आपले घोटाळे लपवण्याची चीनच्या आस्थापनांना सवयच झाली आहे’, अशीच चर्चा होत आहे. काही आस्थापनांनी संशोधनासाठी पुष्कळ व्यय केला; पण सर्वोपयोगी असे एकही उत्पादन सिद्ध केलेले नाही. ‘यातून एकप्रकारे भ्रष्टाचारच उदयास येत आहे’, असे म्हणता येईल. सर्वच देशांना अंधारात ठेवून पडद्यामागे चालू असणार्या चीनच्या या कुकृत्यांकडे कानाडोळा करून चालणार नाही. चीनचा कावेबाजपणा, धूर्त वृत्ती, स्वार्थ, अन्य राष्ट्रांशी चढाओढ करतांना केली जाणारी अपरिमित हानी याविषयी सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे लस मिळवण्यासाठी चीनकडून केला जाणारा आटापिटा आणि त्यातून होणारा काळाबाजार सर्वांसमोर आणून त्याचे पितळ उघडे पाडायलाच हवे. तसे वेळीच न केल्यास कोरोनापेक्षा अशा पद्धतीने सिद्ध होणार्या लसीच सर्व राष्ट्रांना आणखी मोठ्या विनाशाकडे नेतील, हे निश्चित !
प्रेतावरील टाळू खाण्याचा प्रकार !
टांझानियाचे राष्ट्राध्यक्ष जॉन मागुफुली यांनाही त्यांच्या देशात चीनकडून आलेल्या कोरोना विषाणूच्या पडताळणीच्या किटमध्ये काहीतरी गडबड असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी आता सैन्याला या किटच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अमेरिकेतील पिट्सबर्ग मेडिकल सेंटरमध्ये काम करणारे संशोधक डॉक्टर बिंग लिऊ यांनी कोरोना विषाणूविषयी पुष्कळ संशोधन केले होते. लवकरच त्याविषयी उपचारही मिळणार असल्याने तेे याविषयी संपूर्ण विश्वाला सांगणार होते; पण तत्पूर्वीच त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या सर्व घटना संशयास्पद आणि चिंताजनक आहेत. वास्तव दर्शवू पहाणार्या घटना लपवल्या किंवा नष्ट केल्या जात आहेत. यातून ‘कोरोनाचा संसर्ग वाढवण्यातच एकप्रकारे धन्यता मानली जात आहे’, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सर्वत्र आणीबाणीची स्थिती निर्माण झालेली असतांना खरेतर संयम आणि संतुलन राखणे आवश्यक आहे; मात्र चीनकडून मिळणारा प्रतिसाद उलट आहे. आपत्तीतील इष्टापत्ती न शोधता चीनकडून प्रेतावरील टाळू खाण्याचा प्रकार आहे. हे सर्व चित्र पहाता कोरोनाच्या संसर्गापेक्षाही आर्थिक स्वार्थाचा संसर्गच अधिक धोकादायक ठरू शकतो.
‘एकमेका साहाय्य करू’, या भूमिकेत रहा !
कोरोनाविरुद्धच्या लढ्याला प्रारंभ झाला आहे. युद्धाचे बिगुलच वाजले आहे. त्यामुळे कोरोनावर लस शोधणे आज क्रमप्राप्त आहे. प्रत्येक देश त्यासाठी प्रयत्नरत आहे; पण या प्रक्रियेला काही कालावधी लागू शकतो. लसीवर संशोधन होण्यापासून ती बाजारात येईपर्यंत अनेक टप्प्यांचा अभ्यास करणे आवश्यक असते. त्यात लसीची सुरक्षितता, लसीमुळे होणारे लाभ, तिचा मिळणारा प्रतिसाद, औषध प्रमाणित करणार्या संस्थांची मान्यता, लसींच्या संख्येच्या दृष्टीने करावयाचा विचार आणि लसींचा पुरवठा करण्यासाठीची सक्षम यंत्रणा अशा सर्वच पैलूंचा विचार करावा लागतो. ‘इंपिरिअल कॉलेज ऑफ लंडन’मधील जागतिक आरोग्य विभागाचे प्राध्यापक असलेले डेव्हिड नबारो यांनी म्हटले आहे, ‘कोरोनावर लस बनवणे सध्यातरी कठीण आहे. त्यामुळे विश्वाला भविष्यात कोरोनाचा सामना करावाच लागेल.’
एड्स, नागीण, सार्स आणि डेंग्यू यांवर अद्याप लस सापडलेली नाही. सर्वांच्याच अभ्यासानुसार कोरोनावरील लस काही मासांनी बनल्यास ते या लढ्यातील मोठे यशच म्हणावे लागेल; मात्र लस सिद्ध होईपर्यंत वाट न पहाता प्रत्येकाने कोरोनाच्या युद्धात अधिक सतर्क रहायला हवे. हाच काळ माणसाच्या माणूसपणाच्या खर्या परीक्षेचा काळ आहे. प्रत्येक संकट आपल्याला काहीतरी शिकवत असते. त्यामुळे प्रत्येकाने ‘एकमेका साहाय्य करू’, अशा भूमिकेत रहाणे आवश्यक आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात