संपादकीय
जगभरात सध्या कोरोना विषाणूमुळे अडीच लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३८ लाखांहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे. यावर अद्याप लस सापडलेली नाही. त्यामुळे रुग्णांची संख्या कधी न्यून होईल, हे सांगणे अशक्य आहे. कोरोनामुळे जगभरातील अनेक देशांत दळणवळण बंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा आघात झाला आहे. एकूणच दळणवळण बंदीमुळे जगाचे कंबरडे मोडल्याची स्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाची उत्पत्ती चीनमधून झाली. ‘येथील वुहान शहरातील मांस बाजारातून कोरोनाचा प्रादुर्भाव झाला’, असे सांगण्यात येत असले, तरी अमेरिका आणि युरोपमधील देश यांचा दावा आहे की, ‘हा विषाणू वुहानमधील एका प्रयोगशाळेत निर्माण करून तो जगभरात पसरवण्यात आला. हे एक जैविक आक्रमण आहे.’ यापूर्वीच या देशांकडून ‘चीनकडे जैविक आणि रासायनिक अस्त्रे आहेत’, असा दावा केला जात होता. त्याला ‘कोरोनामुळे बळकटी मिळाली’, असे जागतिक मत बनत चालले आहे. याला चीनही तितकाच कारणीभूत आहे; कारण चीनने याविषयी जितकी गुप्तता पाळली आहे आणि आजही तो याविषयी कोणतीही योग्य माहिती जगासमोर मांडण्याचे टाळत आहे अन् अन्य देशांनाही चीनमध्ये यावर संशोधन करण्यास येण्याची अनुमती नाकारत आहे. यावरून ‘जागतिक मत योग्यच आहे’, असे समजले जात आहे. ‘जर हे चीनचे जैविक आक्रमण असेल, तर तो यात पूर्णपणे यशस्वी झाला आहे’, असेच लक्षात येते. चीनचे शत्रू असणारे अमेरिका आणि युरोपमधील देश, तसेच भारत यांना याचा मोठाच फटका बसला आहे. त्या तुलनेत चीनची हानी झालेली नाही, हे लक्षात घ्यायला हवे. चीन यातून ज्या गतीने सावरला आणि त्याच्या एकाच शहरात याचा प्रादुर्भाव झाला, ते पहाता चीनने या आक्रमणाची मोठीच सिद्धता केली होती, असे दिसून येते. ‘तिसरे महायुद्ध अणूयुद्ध असेल’, असे म्हटले जात असतांना हे जैविक आक्रमण त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक महाभयानक आहे, हे लक्षात येते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही ‘हे आक्रमण ‘पर्ल हार्बर’ येथील आक्रमणापेक्षा महाभयंकर आहे’, असे म्हटले आहे. भविष्यात अनेक देश अणूबॉम्ब ऐवजी जैविक शस्त्र बनवण्याचा प्रयत्न करू लागले आणि शत्रूराष्ट्रावर त्याचा वापर करू लागले, तर युद्धाची रणनीतीच पालटून जाईल. भारतीय संस्कृतीमधील प्राचीन काळामध्ये विविध अस्त्रांचा वापर केला जात होता. उदा. पर्जन्यअस्त्र, वायूअस्त्र, अग्नीअस्त्र, सर्पअस्त्र आदींचा वापर केला जात होता. ही थेट जैविक अस्त्रे नसली, तरी त्या समांतरच होती, तसाच काहीसा प्रकार आज होत आहे. ज्याप्रमाणे या अस्त्रांना नष्ट करणारी अस्त्रे होती, तसे आता कोरोनासारख्या जैविक आक्रमणांवर मात करणारी औषधेही निर्माण करावी लागणार आहेत. ‘शत्रूराष्ट्र कोणत्या प्रकारची जैविक अस्त्रे बनवू शकतो’, त्याचा अभ्यास करून ही औषधे बनवावी लागणार आहेत. आर्य चाणक्यांच्या वेळी ‘विषकन्या’ हीदेखील एकप्रकारची जैविक अस्त्रेच होती. त्यांच्या माध्यमांतून राजा किंवा वरिष्ठ मंत्री यांना ठार करण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यासाठी अशा विषकन्यांना त्यांच्या लहानपणापासूनच थोडे थोडे विष पाजून सिद्ध केले जात होते. याला प्रत्युत्तर म्हणून आर्य चाणक्य चंद्रगुप्तालाही त्याच्या जेवणातून प्रतिदिन थोडे थोडे विष देत होते. जेणेकरून अशा विषप्रयोगावर तो सहज मात करू शकेल.
साधना करा !
शत्रूवर विषारी वायू सोडून त्याचा विनाश करण्याचा प्रयत्न म्हणजेच रासायनिक आक्रमण होय. ‘रासायनिक अस्त्रांचा वापर इराण आणि इराक युद्धात करण्यात आला होता’, असा दावा करण्यात येतो; मात्र त्याचे पुरावे समोर आले नाहीत. ‘सद्दाम हुसेन याच्याकडे रासायनिक अस्त्रे आहेत’, असा ठपका ठेवून अमेरिकेने त्याच्यावर कारवाई केली होती. हिटलरने दुसर्या महायुद्धाच्या काळात लक्षावधी ज्यू धर्मियांना विषारी वायूच्या खोलीत डांबून त्यांना ठार केले होते, हे रासायनिक आक्रमणच होते. सध्या ‘पेपर स्प्रे’चा स्वसंरक्षणासाठी होणारा वापर हेही एक रासायनिक अस्त्र म्हणूनच पाहिले जाते. तसेच पोलिसांकडून हिंसक जमावाला पांगवण्यासाठी वापर करण्यात येणार्या अश्रूधुराच्या नळकांड्या याही रासायनिक अस्त्रेच आहेत. जैविक आणि रासायनिक या दोन्ही अस्त्रांवर जागतिक बंदी आहे. त्यामुळे याची निर्मिती करणे अवैध आहे. जो कुणी त्याची निर्मिती करील त्याच्यावर आंतरराष्ट्रीय समुदायाकडून कारवाई करण्यात येऊ शकते. त्यामुळे कोणताही देश याची उघड निर्मिती किंवा चाचणी करत नाही. तिसरे महायुद्ध चालू झाल्यावर या दोन्ही अस्त्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जैविक अस्त्राचा वापर झाल्यावर काय होते, हे सध्या कोरोनामुळे संपूर्ण जग अनुभवत आहे. या विषाणूला ५ मास झाल्यानंतरही त्यावर योग्य औषध अद्याप सापडलेले नाही आणि त्याचा प्रादुर्भाव वाढतच आहे. अशी अनेक जैविक अस्त्रे एकाच वेळेस शत्रूदेशांनी एकमेकांच्या विरोधात वापरली तर किती हाहाःकार माजू शकतो, हे लक्षात येते. तसेच रासायनिक अस्त्रांविषयी होऊ शकतेे. यात लगेचच प्राणहानी होऊ शकतेे, त्यासाठी जैविक अस्त्राप्रमाणे वेळ लागणार नाही आणि बचावासाठीही वेळ मिळणार नाही. कालच विशाखापट्टणम् येथे विषारी वायूची गळती झाल्यानंतर ११ जणांचा मृत्यू झाला, तर १ सहस्र जणांना त्याची बाधा झाल्याने रुग्णालयात भरती करावे लागले. या वायूवर काही घंट्यांत नियंत्रण मिळवण्यात आले. भारतात यापूर्वी भोपाळमध्ये अशा प्रकारे एका आस्थापनातून विषारी वायूची गळती झाली होती आणि त्यात १५ सहस्रांहून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. आज देशासह जगात अशा अनेक विषारी वायूंचा वापर करण्यात येणारी आस्थापने आहेत, जर युद्धामध्ये त्यावर आक्रमण झाले किंवा भूकंपामुळे त्यांची हानी झाली, तर ही एक वेगळीच रासायनिक आपत्ती असेल आणि त्यावर काहीही करता येणार नाही. अशा स्थितीत स्वतःचे रक्षण करण्यासाठी सध्यातरी कोणतेही कवच उपलब्ध नाही; मात्र जर व्यक्ती साधना करणारी असेल, तर देव तिचे रक्षण करील, अशी श्रद्धा ठेवून अशा आपत्काळात आपल्याला टिकून रहायचे असेल, तर साधना करणेच आवश्यक आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात