नेपाळमधील भारतीय राजदूताला जाब विचारला
चीनचा बटिक बनलेला नेपाळ भारतावर डोळे वटारण्याचे धाडस करत आहे ! नेपाळचा साम्यवादी पक्ष आणि सरकार यांनी कितीही उसने अवसान आणून भारताला विरोध करण्याचा प्रयत्न केला, तरी नेपाळी जनता भारताच्याच बाजूने आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे !
काठमांडू (नेपाळ) : भारताने नुकतेच १७ सहस्र फूट उंचावरील उत्तराखंड येथील धारचुलामधील लिपुलेख खिंडीतून ८० कि.मी. अंतराच्या बांधण्यात आलेल्या रस्त्याचे उद्घाटन केले. यास नेपाळने विरोध दर्शवला असून भारताकडे निषेध नोंदवला आहे. याशिवाय नेपाळमधील भारतीय राजदूतांना बोलावून त्यांना जाब विचारला आहे. काही नेपाळी लोकांनी काठमांडू येथील भारतीय दूतावासाबाहेर निदर्शनेही केली. भारताने बांधलेल्या या रस्त्यामुळे कैलास मानसरोवरला जाणे अधिक सोपे झाले असून वेळेची बचत होणार आहे, तसेच चीनशी युद्धस्थितीत या मार्गाचा वापर महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
१. लिपुलेख आणि कालापानी या भागांवरून नेपाळशी वाद आहेत. हे दोन्ही भाग आमचे आहेत, असा नेपाळचा दावा आहे. त्यात भारताने तेथे हा रस्ता बनवल्याने नेपाळने त्यास विरोध दर्शवला आहे. नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप कुमार ग्यावली यांनी भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा यांना बोलावून त्यांना याविषयी जाब विचारत एक निवेदनही दिले. ग्यावली म्हणाले की, आम्ही भारताशी चर्चा करून हा वाद सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत.
२. नेपाळमधील अनेक कम्युनिस्ट खासदारांनी यापूर्वीच कालापानी, लिम्पियाधुरा आणि लिपुलेख हे नेपाळी प्रदेश परत घेण्याची मागणी केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात