बीजिंग (चीन) : सिक्किममध्ये भारत आणि चीन यांच्या सैनिकांत झालेल्या घटनेला संरक्षण तज्ञ गिलगिट आणि बाल्टिस्तान याविषयीच्या प्रकरणाला जोडून पहात आहेत.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीनचे अस्तित्व
चीनकडून पाकव्याप्त काश्मीरमार्गे पाकच्या पश्चिमेकडील ग्वादर बंदरापर्यंत आर्थिक महामार्ग बनवण्यात येत आहे. हा मार्ग गिलगिट आणि बाल्टिस्तान येथून जातो. भारत या मार्गाला सातत्याने विरोध करत आहे, तर चीन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. पाकव्याप्त काश्मीरवरून भारत आणि पाक यांच्यात वाद आहेत. त्यामुळे येथे अन्य कोणत्याही देशाला बांधकाम करता येणार नाही. असे असतांनाही पाकने चीनला महामार्ग बांधण्यास अनुमती दिली आहे. यावर भारताचा अक्षेप आहे. भारताच्या हवामान खात्याने नुकतेच गिलगिट आणि बाल्टिस्तान, तसेच मुझफ्फराबाद यांना त्याच्या सूचीमध्ये जोडले आहे. त्यास पाकने विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर चीनने भारताला संदेश देण्यासाठी सिक्किममध्ये भारतीय सैन्याशी जाणीवपूर्वक प्रसंग घडवला आहे.
संरक्षण तज्ञ कमर आगा यांनी सांगितले की, या घटनेद्वारे चीन सांगू इच्छित आहे की, जर भारताने पाकव्याप्त काश्मीरविषयी कोणतेही पाऊल उलचले, तर चीन सिक्किममध्ये कारवाई करू शकतो. चीन सातत्याने सिक्किम त्याचा भाग असल्याचा दावा करत आहे, म्हणजेच पाकव्याप्त काश्मीरला सिक्किम हे उत्तर असेल, असे चीनला सांगायचे आहे.
जनतेचे लक्ष राष्ट्रवादाकडे वळवण्याचा चीनच्या प्रयत्न
आगा पुढे म्हणाले की, सध्या कोरोनामुळे चीनची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. जागतिक दळणवळण बंदी असल्याने त्याचा माल कुणीही विकत घेत नाही. अशा वेळी चीन देशात राष्ट्रवादाला प्रोत्साहन देत आहे. त्यासाठीच तो सीमेवर अशा प्रकारे कुरापती करून चिनी जनतेला युद्धाची भीती दाखवत आहे. त्याद्वारे जनतेचे लक्ष गरिबी आणि नोकरी या संकटापासून दूर जाईल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात