Menu Close

मूर्ती बनवण्यासाठी ‘प्लास्टर ऑफ पॅरीस’चा उपयोग करू नका : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने मार्गदर्शक नियमावली घोषित

  • मूर्तीसाठी ‘प्लास्टर ऑफ पॅरीस’चा वापर करू नये, हे योग्यच आहे; परंतु त्याचसमवेत शासनाने मूर्तीकारांना शाडूमाती किंवा भाविकांना शाडूमातीच्या मूर्ती तेवढ्याच प्रमाणात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध स्तरांवर पावले उचलायला हवीत. अन्यथा ‘पर्यावरणपूरक’च्या नावाखाली भाविक कोणत्याही वस्तूंपासून मूर्ती बनवतील, ज्यामुळे त्यांना उपासनेचा अपेक्षित लाभ मिळणार नाही !
  • प्रदूषण नियंत्रण मंडळाने शाडूची माती, तसेच नैसर्गिक रंगाचा उपयोग करून लहान आकारातील मूर्ती बनवण्यासाठी अनुदान दिल्यास ते अधिक योग्य ठरेल !
  • शाडूच्या मातीची श्री गणेशमूर्ती बनवण्याविषयी सनातन आणि समविचारी संघटना गेल्या २१ वर्षांपासून मोहीम राबवत आहेत. आता शासन त्या दृष्टीने काही कृती करत आहे, हेही नसे थोडके ! 

मुंबई : उत्सवांमध्ये ‘प्लास्टर ऑफ पॅरीस’च्या मूर्ती, थर्माकोल यांवर काटेकोरपणे कार्यवाही होण्यासाठी शासनाने संबंधित प्रशासकीय यंत्रणांना आदेश द्यावेत, तसेच प्लास्टिकचा उपयोग करू नये, अशा मार्गदर्शक सूचना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रक मंडळाद्वारे उत्सवांविषयी १३ मे या दिवशी एका नियमावलीद्वारे काही मार्गदर्शक तत्त्वे घोषित करण्यात आली असून यात मूर्ती विसर्जन करणे, मूर्ती बनवणे यांविषयीच्या अनेक सूत्रांचा समावेश आहे. (मूर्ती शाडूच्या मातीची असेल, तर त्यामुळे प्रदूषण होत नाही उलट आध्यात्मिक लाभच होतो. हे लक्षात घेऊन शासनाने शाडूच्या मातीपासून बनवलेल्या मूर्तीच्या विसर्जनाला प्रोत्साहन द्यावे, ही भक्तांची अपेक्षा आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने या सूचना सर्व राज्यांना देण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक नियमावलीमध्ये सार्वजनिक मंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था आणि घरगुती उत्सव यांविषयी मार्गदर्शक सूचनांचा समावेश आहे.

काही वर्षांपूर्वी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पर्यावरणपूरक उत्सवाच्या अनुषंगाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षांच्या नियंत्रणाखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या सूचनेनुसार वर्ष २०१० मध्ये मूर्ती विसर्जनासाठी मार्गदर्शक तत्त्वे घोषित करण्यात आली होती, त्यानंतर ही सुधारित नियमावली घोषित करण्यात आली आहे.

शासनाच्या निर्णयाचे स्वागत; मात्र यावर्षी सवलत द्यावी ! – नरेश दहिबावकर, अध्यक्ष, बृहन् मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निर्णय स्वागतार्ह आहे; मात्र गणेशात्सवाला ३ मास शिल्लक राहिले आहेत. अद्याप मूर्तीकारांना शाडूची माती किंवा प्लास्टर ऑफ पॅरीस हे दोन्ही उपलब्ध झालेले नाहीत. शाडूच्या मातीची मूर्ती वाळायला किमान २०-२२ दिवस लागतात. त्यामुळे यावर्षी या निर्णयामध्ये सवलत द्यावी. पुढील वर्षी यावर कार्यवाही करता येईल. याविषयी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना ‘ट्वीट’ करून कळवले आहे. लवकरच याविषयीचे पत्र त्यांना देणार आहोत. मुंबईमध्ये अनुमाने ११ सहस्र सार्वजनिक ठिकाणी, तर २ लाखांहून अधिक घरगुती श्री गणेशमूर्ती आणल्या जातात. आम्ही सर्व गणेशोत्सव मंडळांना छोटी मूर्ती आणण्याचे आवाहन केले आहे. दळणवळण बंदी असल्यामुळे केंद्रशासनाकडून ‘रस्त्यावर उत्सव साजरे करू नका’, अशी सूचना देण्यात आली आहे. यापूर्वी वर्ष १८९३ मध्ये प्लेगची साथ पसरली असतांना लोकांनी घरातच श्री गणेशाची पूजा केली होती. आताही अशी परिस्थिती असल्याने गणेशोत्सव मंडळांनी साधेपणाने उत्सव साजरा करण्याची मानसिकता ठेवावी. मोठ्या सार्वजनिक उत्सव मंडळांनी यावर्षी वर्गणी गोळा न करता मागील वर्षीच्या वर्गणीतून उत्सव साजरा करावा. सजावटीवर व्यय करून नये. कुणी स्वेच्छेने वर्गणी दिली, तरच घ्यावी. आगमन आणि विसर्जन यांसाठी मिरवणूक न काढता ठराविक जणांनी त्यात सहभाग घ्यावा.

राज्यशासन चर्चा करून याविषयी निर्णय घेईल ! – संजय भुस्कुटे, जनसंपर्क अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मार्गदर्शक सूचना आल्या असल्या, तरी कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अद्याप राज्यशासनाशी याविषयी चर्चा झालेली नाही. याविषयी काही खटलेही न्यायप्रविष्ट आहेत. महाराष्ट्रात ‘प्लास्टर ऑफ पॅरीस’च्या मूर्तीवर बंदी घालण्याविषयी कायदा नाही; मात्र अन्य मूर्तींच्या तुलनेत ‘प्लास्टर ऑफ पॅरीस’च्या मूर्तींमुळे होणारे प्रूदषण लक्षात घेता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने याविषयी जागृती केली जाते. यावर सविस्तर चर्चा करून मगच राज्यशासनाच्या वतीन निर्णय घेतला जाईल.

काय आहेत सूचना ?

१. केवळ नैसर्गिक, जैव विघटनक्षम, पर्यावरणास अनुकूल असा कच्चा माल यांपासून मूर्ती बनवण्याला अनुमती द्यावी.

२. मंडपउभारणी, सजावट यांसाठी ‘प्लास्टिक’,‘थर्माकोल’ यांचा उपयोग करू नये.

छोट्या मूर्ती घरी विसर्जित करण्याचे आवाहन !

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये ‘शक्य असल्यास छोट्या मूर्ती घरच्या घरी बालदीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये विसर्जित कराव्यात. बालदीत मूर्ती विसर्जित केल्यावर त्या मातीचा बगीच्यासाठी किंवा त्यापासून पुन्हा नवीन मूर्ती सिद्ध करण्यासाठी उपयोग करावा. यासह ठिकठिकाणी कृत्रिम तलाव निर्माण करून त्यामध्येही छोट्या मूर्ती विसर्जित कराव्यात’, असे आवाहनही केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने करण्यात आले.

धर्मशास्त्रानुसार पूजेतील मूर्तीमध्ये त्या देवतेचे तत्त्व आल्याने मूर्ती वहात्या जलाशयात विसर्जित कराव्यात. त्यामुळे मूर्तीमधील देवतेचे तत्त्व वहात्या पाण्यातून सर्वदूर पसरते आणि त्यांचा आध्यात्मिक लाभ सर्व सृष्टीला होतो ! दुष्काळ, जवळ जलाशय नसणे, कोरोनासारखे संकट अशा आपद्धर्मात मूर्तीविसर्जनाच्या संदर्भात अन्य पर्यायांचा विचार करू शकतो ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

संदर्भ  : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *