कोलकाता (बंगाल) : पूर्व आणि पूर्वोत्तर भारतातील झारखंड, बंगाल, आसाम, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांतील हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावरून जोडलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या ‘ऑनलाईन’ बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यात बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा राज्यांसाठी बंगाली आणि झारखंड येथील हिंदुत्वनिष्ठांसाठी हिंदी भाषांतून ही बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये समितीचे श्री. सुमंत देबनाथ यांनी समितीच्या कार्याचा परिचय करून दिला. तसेच समितीकडून करण्यात येणार्या ऑनलाईन धर्मजागृतीच्या उपक्रमांविषयी म्हणजे नामसत्संग, धर्मसवांद आदी विषयांची माहिती देण्यात आली.
बैठकीत हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या सुगंधा आणि समितीचे पूर्व अन् पूर्वोत्तर राज्यांचे समन्वयक श्री. शंभू गवारे यांनी हलाल प्रमाणपत्राद्वारे भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि हिंदु धर्मावर करण्यात येत असलेल्या आघाताविषयीची माहिती दिली. हा विषय ऐकल्यावर ऑनलाईन उपस्थित असलेल्या हिंदुत्वनिष्ठांनी ‘आम्ही हलाल प्रमाणित उत्पादने विकत घेणार नाही आणि आमच्या भागात याविषयी जागृती करू’, असे सांगितले.
सामाजिक माध्यम कार्यशाळा
सध्याच्या कोरोनाच्या काळात सामाजिक माध्यमांद्वारे हिंदु धर्म आणि अध्यात्म प्रसारासाठी कशा प्रकारे प्रयत्न करता येतील, या अनुषंगाने हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून सामाजिक माध्यमांच्या २ ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या. यात झारखंड आणि बंगाल येथील हिंदुत्वनिष्ठांनी सहभाग घेतला. या वेळी टि्वटरच्या माध्यममातून आपण हिंदु धर्म सेवेच्या कार्यात कसे सहभागी होऊ शकतो, याविषयी माहिती देऊन टि्वटरचे प्रशिक्षण देण्यात आले.
युवकांसाठी व्यक्तीमत्व विकास आणि अध्यात्म यांवर ऑनलाईन मार्गदर्शन
युवकांसाठी व्यक्तीमत्व विकास आणि अध्यात्म या विषयांवर ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ‘अध्यात्म काय आहे ?’, ‘जीवनामध्ये वेळेचे नियोजन करण्याचे महत्त्व’ आणि ‘मनाची एकाग्रता आणण्यासाठी कसे प्रयत्न करावे ?’ यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी त्यांच्या युवावस्थेत अध्यात्मामुळे कोणते लाभ झाले, याचे अनुभव सांगितले. सर्व युवकांना हे अनुभव ऐकून प्रेरणा मिळाली.
क्षणचित्रे
१. समितीच्या बैठका नियमित आयोजित करण्याची मागणी उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी केली.
२. बैठकीला उपस्थित झारखंडमधील हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रकाश कुमार केवट आणि कोलकाता येथील श्री. सुजित कुमार पांडये यांनी सांगितले की, समितीचे कार्य पूर्ण देशभरात आणि हिंदु समाजाला अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आम्ही अधिकाधिक लोकांना या कार्यात सहभागी होण्यासाठी प्रयत्न करू.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात