संपादकीय
न्यूझीलंडच्या कार्यसंस्कृतीने पुन्हा एकदा सर्व जगासमोर एक आदर्श प्रस्थापित केला. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न त्यांच्या परिचितासह उपाहारगृहात न्याहारी करण्यासाठी गेल्या होत्या; मात्र उपाहारगृहामध्ये जागा नसल्याने त्यांना आत सोडण्यात आले नाही. त्यांनीही सर्वसामान्यांप्रमाणे उपाहारगृहात जाण्यासाठी प्रतीक्षा केली. ‘उपाहारगृहामध्ये बसण्यासाठी जागा नसल्याने मालकाने पंतप्रधानांनाही सर्वसामान्यांना जो नियम आहे, तोच लागू करणे’, हे जेवढे वैशिष्ट्यपूर्ण आहे, तेवढेच ‘पंतप्रधान जेंसिंडा अर्डर्न यांनीही सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे उपाहारगृहाच्या बाहेर प्रतीक्षा करणे’, हेही महत्त्वपूर्ण आहे. भारतामध्येही अशी तत्त्वनिष्ठा होती. सायंकाळनंतर गडाचे दरवाजे कोणासाठी न उघडण्याचा नियम पहारेकरी मावळ्याने स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांनाही लावल्याचा इतिहास आहे; पण गेल्या काही दशकांमध्ये भारतात तत्त्वनिष्ठतेचा गडच ढासळत गेला. त्याच्या जागेवर चापलूसगिरी, वशिलेबाजी आणि घमेंड यांचा डोंगर उभा राहिला. न्यूझीलंडमध्ये मात्र नियमांची काटेकोर कार्यवाही करण्याकडे विशेष लक्ष दिले जात असल्याचे दिसून येते. साधारण दीड मासांपूर्वी न्यूझीलंडचे आरोग्यमंत्री डॉ. डेव्हिड क्लार्क दळणवळण बंदीचे नियम मोडून समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले होते. ही चूक उघडकीस आल्यावर त्यांनी ती तात्काळ मान्य करून त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले होते. या चुकीविषयी स्वतः क्लार्क यांनी स्वतःचीच ‘मूर्ख’ (इडियट) अशी निर्भत्सना केली. पंतप्रधान अर्डर्न त्यांचे त्यागपत्र स्वीकारले गेले नाही; पण त्यांची पदावनती करून त्यांचे अधिकार न्यून केले गेले. या उलट महाराष्ट्रात कोणा सचिवाच्या वशिलेबाजीने पत्र घेऊन ‘येस बँके’च्या घोटाळ्यातील संशयित आणि जामिनावर असलेले वाधवान कुटुंबीय दळणवळण बंदीचे नियम मोडून महाबळेश्वरला सहलीला गेल्याचे जनतेने पाहिले. त्याविषयी गाजावाजा झाल्यावर त्यांना अटक करण्यात आली; पण पुढे काय ? त्यांना शिक्षा झाल्याची बातमी ऐकायला मिळायला कदाचित् अजून काही पावसाळे जावे लागतील.
लोकप्रतिनिधींनी त्यांच्या वागणुकीतून समाजासमोर आदर्श प्रस्थापित करायचे असतात; भारतात मात्र बहुतांश वेळा लोकप्रतिनिधी ‘कसे वागू नये’, याचे लोकांना धडे देतात. ‘मी सर्वसामान्यांपेक्षा वेगळा आहे’, ही भावना उच्चपदस्थांपासून सामान्यजनांपर्यंत प्रत्येकाच्या मनात पक्के घर करून राहिलेली असल्याने सहजतेने आणि कोणताही आव न आणता वागणे अवघड होऊन बसते. नियमांची बंधने उल्लंघून मनमानी कारभार केला जातो. न्यूझीलंडमध्ये ‘नियम म्हणजे नियम’ हे समीकरण आहे, तर आपल्याकडे ‘नियम म्हणजे पळवाटा’, असे रुजले गेले आहे. हे चित्र पालटायचे असेल, तर देवळातील दर्शनरांगेपासून मंत्रालयातील कामांपर्यंत रुजलेली ‘व्हीव्हीआयपी’ (अतीमहनीय) संस्कृती बंद व्हायला हवी.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात