संपादकीय
वर्ष २००६ मध्ये आतंकवाद्यांचा आदर्श असलेला कट्टर धर्मांध डॉ. झाकीर नाईक याने जिहादच्या नावाखाली तरुणांची माथी भडकावण्यासाठी ‘पीस (शांती) टीव्ही’ ही दूरचित्रवाहिनी चालू केली. या माध्यमातून समाजात द्वेषाचे बीज रुजवले जात असल्याचे लक्षात आल्यावर केंद्र सरकारने वर्ष २०१२ मध्ये भारतात ‘पीस टीव्ही’वर बंदी घातली. वर्ष २०१६ मध्ये बांगलादेशातील ढाका येथे झालेल्या बाँबस्फोटातील आरोपींनी डॉ. झाकीर नाईक याच्याकडून प्रेरणा घेेऊन ते कृत्य केल्याचे सांगितले. त्यानंतर बांगलादेशात आणि श्रीलंकेत झालेल्या बाँबस्फोटांनंतर श्रीलंकेतही या वाहिनीवर बंदी घालण्यात आली. नुकतेच प्रसारमाध्यमांवर लक्ष ठेवणार्या ब्रिटन सरकारच्या ‘ऑफकॉम’ या संस्थेने ‘पीस टीव्ही’ आणि ‘पीस टीव्ही उर्दू’ या वाहिन्यांना द्वेष पसरवल्याच्या प्रकरणी पावणे तीन कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. भारताने ‘पीस टीव्ही’वर बंदी घातल्यानंतरही त्याचे अवैधरित्या प्रसारण होत असल्याची वृत्ते प्रसारित झाली होती; पण प्रशासनाने किंवा माहिती प्रसारण विभागाने ‘पीस टीव्ही’ला दंड ठोठावल्याचे ऐकिवात नाही.
‘पीस टीव्ही’चा कर्ता, धार्मिक उपदेशाच्या नावाने कट्टर जिहादी निर्माण करू पहाणारा आणि भारतातून पळून गेलेला झाकीर नाईक सध्या मलेशियामध्ये आहे. विद्वेषी भाषणे केल्याविषयी, तसेच ‘मनी लाँडरिंग’ प्रकरणी भारतीय अन्वेषण यंत्रणा त्याच्या मागावर आहेत. झाकीर नाईक याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्याविषयी केंद्र सरकारने नुकतीच मलेशिया सरकारकडे अधिकृतरित्या मागणी केली आहे. आतंकवाद्यांचा आदर्श असलेला झाकीर नाईक याला स्थायी नागरिकत्व देणारे, भारताच्या नागरिकत्व सुधारणा कायद्यावर आक्षेप घेणारे आणि जम्मू-काश्मीर भारताने अवैधरित्या कह्यात घेतल्याचे वक्तव्य करणारे मलेशिया सरकार भारताच्या या मागणीला कशा प्रकारे प्रतिसाद देते, ते भविष्यात कळेल; पण झाकीर नाईक ही व्यक्ती आणि त्याला पाठीशी घालणारे कट्टर इस्लामी देश हे जागतिक शांतता धोक्यात आणत आहेत, हे निश्चित ! अशा देशांच्या आर्थिक नाड्या भारताने आवळायला हव्यात.
काही दिवसांपूर्वी झाकीर नाईकने मुसलमानेतरांविषयी विखारी फुत्कार सोडले होते. ‘भारतामध्ये जे इस्लामवर प्रश्न उपस्थित करतात, त्यांची माहिती गोळा करा. जर कुणी मुसलमानेतर सामाजिक माध्यमांतून इस्लामच्या विरोधात लिहीत असेल, तर त्याला इस्लामी देशांत आल्यावर लगेच अटक करून कारागृहात टाका’, असे चितावणीखोर आवाहन केले होते. फतवा नाईक याने सोडला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, एवढ्या पराकोटीच्या असहिष्णू आणि अतिरेकी विधानावर भारतातील यच्चयावत् पुरोगामी, साम्यवादी, तबलिगी समर्थक, ‘पुरस्कारवापसी’वाले, तसेच धार्मिक स्वातंत्र्य अन् मानवाधिकारवाल्या संघटना आणि आयोग गप्प होते. या घटकांची मौनरूपी शांतताच (‘पीस’) जगामध्ये विद्वेषाचा भडका पसरवते, हे लक्षात घ्यायला हवे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात