नेपाळ नवीन मानचित्र (नकाशा) प्रकाशित करणार
चीनच्या सांगण्यावरूनच नेपाळ हे कृत्य करत आहे, हे वेगळे सांगायला नको ! याविषयी नेपाळला सुनावण्याऐवजी भारताने चीनला कसे प्रत्युत्तर देता येईल ?, याचा विचार करणे आवश्यक आहे !
काठमांडू (नेपाळ) : भारतातील लिपुलेख, लिपियाधुरा आणि कालापानी या भागांवर नेपाळने दावा सांगितला आहे. भारताचे हे तिन्ही भाग नेपाळचे असल्याचे मानचित्र (नकाशा) नेपाळ प्रकाशित करणार आहे. नेपाळच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
भारताने उत्तराखंडमधील घाटियाबागढ ते लिपूलेख असा ८० किलोमीटरचा रस्ता बांधला आहे. भारत, नेपाळ आणि चीन या ३ देशांच्या सीमा जिथे मिळतात त्या तिठ्याजवळ हा रस्ता आहे. या रस्त्यामुळे कैलास मानसरोवरला जाणार्या भारतीय यात्रेकरूंचा वेळ वाचणार आहे. भारताने बांधलेल्या या रस्त्यावर नेपाळने आक्षेप घेतला होता. यापूर्वी उत्तराखंड राज्यातील लिपियाधुरा या भागावरही नेपाळने दावा केला आहे.
नेपाळच्या नव्या मानचित्रामध्ये ७७ जिल्हे, तसेच लिपियाधुरा, लिपुलेख आणि कालापानीसह ७५३ स्थानिक प्रशासनिक मंडळेही दाखवण्यात येणार आहेत, असे नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप ज्ञानवली यांनी ट्वीट करून सांगितले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात