गडचिरोली : जिल्ह्यातील दुर्गम आणि अतीदुर्गम भागातील ग्रामस्थ हे नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या बंदला तीव्र विरोध करत आहेत. नक्षलवादी सृजनक्का हिने ३४ निष्पाप आदिवासींची हत्या केल्यामुळे तिच्यासाठी म्हणून आम्ही बंद का पाळायचा ? असा संतप्त प्रश्न उपस्थित करत नागरिकांनी नक्षलवाद्यांच्या फलकांची होळी केली आहे.
काही दिवसांपूर्वी नक्षलवादी आणि पोलीस यांच्या झालेल्या चकमकीत कसनसूर दलम्ची डीव्हिसी सृजनक्का या नक्षलवादी महिलेला पोलिसांनी ठार केले होते. यानंतर २० मे या दिवशी नक्षलवाद्यांनी या हत्येच्या निषेधार्थ बंद पुकारला होता. सृजनक्का हिच्यावर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत एकूण १४४ गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. यामध्ये ३४ निष्पाप आदिवासींच्या हत्यांसह जनतेच्या पैशातून उभारलेल्या अनेक शासकीय मालमत्तांची जाळपोळ करणे आदींचाही समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दुर्गम आणि अतीदुर्गम भागातील ग्रामस्थांकडून नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या बंदला तीव्र विरोध करण्यात आला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात