भाविकांनी श्रद्धेने मंदिरांमध्ये अर्पण केलेल्या पैशांची मागणी करण्यापेक्षा राजकारण्यांनी भ्रष्टाचार करून देशाचा लुटलेला पैसा गोरगरिबांना वाटण्याची मागणी का केली जात नाही ?
मुंबई : देशातील धार्मिक स्थळे ही शासनाची मालमत्ता आहे. शासनाने धारिष्ट्य दाखवावे आणि धार्मिक स्थळांतील पैसा कह्यात घेऊन तो गरिबांच्या उपजीविकेसाठी व्यय करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. (कोरोनाच्या संकटकाळात हिंदूंच्या अनेक मोठ्या देवस्थानांनी मंदिरांतील पैसा गरिबांसाठी व्यय केला आहे. देशावरील संकटकाळाचे भान हिंदूंना आहे, हे अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांनी लक्षात घ्यावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात )
या वेळी अधिवक्ता प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशाची अर्थव्यवस्था पूर्ण उद्ध्वस्त केली आहे. जगात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जानेवारीपासून दळणवळण बंदीची प्रक्रिया चालू झाली; मात्र भारतात दळणवळण बंदी करायला मार्च मासाचा तिसरा आठवडा उजाडला. परदेशातून येणार्या लोकांची योग्य पडताळणी करून त्यांना १४ दिवस क्वारंटाइन केले असते, तर आपल्या देशात कोरोना पसरला नसता. कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कलम ३०२ चा गुन्हा नोंदवावा.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात