मंदिरांचे सरकारीकरण झाले की, मंदिरांचा पैसा सरकारजमा होतो आणि आता अर्थिक संकटाच्या वेळी मंदिरांवर स्वतःची संपत्तीही विकण्याची पाळी येते, हे लक्षात घेऊन मंदिरांचे सरकारीकरण रोखण्यासाठी हिंदूंनी कृतीशील व्हावे !
कोल्लम (केरळ) : कोरोना महामारीमुळे आलेल्या गंभीर आर्थिक संकटावर मात करण्यासाठी त्रावणकोर देवस्वम बोर्डाने (टीडीबीना) मंडळाच्या अधिपत्याखालील मंदिरांमधील सर्व अतिरिक्त दिवे आणि पारंपरिक पितळीची भांडी लिलावाद्वारे विक्री करण्याचा घाट घातला आहे. यांपैकी अनेक दिवे आणि भांडी विक्री करून मोठ्या प्रमाणात पैसे गोळा होईल, अशी देवस्वम बोर्डाची अपेक्षा आहे. विविध मंदिरांत दिवे आणि भांडी मोठ्या प्रमाणात आहेत. या दिव्यांची सुरक्षा आणि देखभाल करणे, ही मंडळासाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे; म्हणून मंडळाने त्यांची विक्री करण्याचा घाट घातला आहे. मंडळाने सर्व १ सहस्र २४८ मंदिरांमधून या मौल्यवान वस्तू गोळा करण्यास प्रारंभ केला आहे.
मंदिर सल्लागार समितीच्या काही सदस्यांचा विरोध
मंदिर सल्लागार समितीच्या काही सदस्यांनी भाविकांनी दान केलेल्या या मौल्यवान वस्तू विकण्यास विरोध केला आहे. या निर्णयाचा मंदिर सल्लागार समितीशी काही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया देवस्वम बोर्डाने व्यक्त केली. वर्ष २०१२ मध्येही देवस्वम बोर्डाने असाच निर्णय घेतला होता; मात्र मंदिर सल्लागार समितीच्या निषेधानंतर त्यांना हा निर्णय मागे घ्यावा लागला होता.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात